Home > News Update > ऐन दिवाळीत राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा; खरीप, रब्बी पिकांचं मोठं नुकसान

ऐन दिवाळीत राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा; खरीप, रब्बी पिकांचं मोठं नुकसान

ऐन दिवाळीत राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा; खरीप, रब्बी पिकांचं मोठं नुकसान
X

राज्यभर दिवाळी मोठ्या आनंदात साजरी केली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी अंधारात आहे. अति पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास आस्मानी संकटानं हिरावून घेतला आहे. नेते सरकार स्थापनेसाठी गुंग आहे, तर अधिकारी आणि कर्मचारी वर्ग दिवाळी नंतर नुकसानीचे पंचनामे करू असं असंवेदनशीलतेनं सांगत आहे. नेते आणि अधिकाऱ्यांची दिवाळी गोड झाली असली तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात ऐन दिवाळीत पाणी आलं आहे.

https://youtu.be/bs8G0W2O2iA

कापणीवर आलेली ज्वारी, मका, सोयाबीन, उडीद, मूग, तूर जमीनदोस्त तर झालीच आहे. कापून पडलेल्या पिकांना अक्षरश: कोंब फुटले आहेत. कोंब फुटलेले पीक फेकून दयायलाही शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. जनावरांच्या चाऱ्यासाठीही या पिकांचा उपयोग होणार नाही. अशी भयावह परिस्थिती आहे.

खान्देश, विदर्भ, मराठवाडा भागात कापसाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली, मात्र अती पावसामुळे कापूस खराब झाला आहे. कापसाचे बोंड काळी पडली असून त्यात अळ्याही पडल्या आहेत. सोयाबीनचीही तीच परिस्थिती आहे.

शेतकरी दर वर्षी दिवाळीपूर्वी खरीप हंगामाचं पीक काढल्यानंतर बाजारात विक्रीस आणतो आणि आपली दिवाळी साजरी करतो, यंदा शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारातच जाणार आहे. सततच्या पावसामुळे पीकच वाया गेल्यानं हाती काहीच आलं नाही. उलट कोंब फुटलेल्या पिकांची कापणी आणि आता फेकण्यासाठीही शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत.

https://youtu.be/OCELLuQbBeQ

गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. प्रशासन निवडणूक कामात व्यग्र असल्याने अद्यापही नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

या परतीच्या पावसाचा फटका मराठवाडा खान्देश या भागांना मोठ्या प्रमाणावर बसला. मराठवाड्याच्या अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. परतीच्या पावसाने दुष्काळाचे सावट दूर केले असले तरी खरिपातील काढणीस आलेल्या पिकांचं मात्र मोठं झालंय.

खान्देशात सरासरीच्या १३० टक्के पाऊस झाल्याने कापूस, मका, ज्वारी, सोयाबीन ही पिके हातची गेली. पश्चिम विदर्भात पावसाने सोयाबीन, ज्वारी, तीळ आदी हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झालंय. पावसामुळे सोयाबीनमध्ये आर्द्रता निर्माण झाल्याने या सोयाबीनचे दर किमान २१०० रुपये घसरल्याने शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसला आहे.

https://youtu.be/xhEvmiKZdco

परभणी जिल्ह्यात मागचे ८ दिवस पावसाने दमदार हाजेरी लावली होती. या परतीच्या पावसाने नदी-नाले दुथडी भरुन वाहत असले तरी पिकांचं मोठं नुकसान झालंय.

बुलडाण्यात तर ऐन दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं. ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टीरी ५० हजार रुपये मदतीची मागणी या शेतकऱ्यांनी केली. जळगाव जामोद तहसील कार्यालयासमोर ठेचा-भाकर आंदोलन करत शेतकऱ्यांनी शासनाला धारेवर धरलं.

https://youtu.be/s_u_eD2ywAo

या भागात सतत चार-पाच वर्षांपासून दुष्काळ आहे. यावर्षी चांगला पाऊस होईल आणि त्यातून आर्थिक परिस्थीती सुधारेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, अतिवृष्टीनं पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे आधी कोरडा दुष्काळ आणि आता ओला दुष्काळ अशा दुहेरी कोंडीत शेतकरी सापडला आहे.

नगर शहर आणि जिल्ह्यात झालेल्या पावसाने बाजरी, मका, सोयाबीन, कापूस यांसह झेंडूच्या फुलांचे अतोनात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर खरिपाच्या पिकांची काढणी सुरू असतानाच या पावसामुळे सोयाबीन आणि कापसाचं मोठं नुकसान झालंय. प्रशासन पीक विमा कंपन्यांकडे बोट दाखवत आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला नाही. त्यांच्यासमोर या नुकसानीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या २० वर्षांपासून कृषी पत्रकारिता करणारे तसंच ऍग्रोवल्ड या कृषीमासिकाचे संपादक शैलेंद्र चव्हाण यांनी सांगितलं की, “हंगामी मुख्यमंत्र्यांनी तातडीनं पंचनाम्याचे आदेश देऊन हेक्टरी नुकसान भरपाई त्वरित जाहीर करावी. जेणे करून ऐन दिवाळीत प्रचंड आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी वर्गाला न्याय द्यावा. सरकारही शेतकऱ्यांच्या या संकटकाळात पाठीशी आहे असा संदेश देखील जाईल. मात्र, शेतकऱ्यांकडं कोणालाही पाहायला वेळ नाही.’’

ज्येष्ठ कृषी पत्रकार आणि संपादक निशिकांत भालेराव यांनी सांगितलं की,

खरीपामध्ये हाताशी आलेली पिकं ४० ते ५० टक्के वाया गेली आहेत. सुरुवातीच्या ९० दिवसांच्या फेऱ्यात ४० दिवस पाऊसच पडला नाही आणि नंतर एवढा आला की पिकांना कोंब फुटले आहेत. राज्यात हरभरा अडचणीत आहे. मका, कापूस, सोयाबीन या पिकांचं पावसामुळे आणि रोगांमुळे मोठं नुकसान झालंय. गाई, म्हशी यांचंही नुकसान झालंय. असं असलं आणि अजूनही पावसाचा धोका कायम आहे. त्यामुळे कडधान्यांवर मोठा परिणाम होणार असल्याचं भालेराव यांनी सांगितलं.

या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं असलं तर निवडणुका आणि आचारसंहिता यामुळे अद्याप पंचनामे झालेले नाहीत. नवीन सरकारने पंचनामे करुन नुकसान भरपाई देणं आणि पिकविम्याचे दावे निकाली काढणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

अनेकदा पिकविम्याचे दावेच निकाली काढले जात नाहीत असा इतिहास राहीलेला अँग्रीकल्चरल इन्श्योरेन्स कंपनी हवामान केंद्र असलेल्या ठिकाणावरुन सर्व ठिकाणचे हवामान गृहीत धरते. म्हणजे हवामान केंद्र पुण्यामध्ये आहे. ज्यादिवशी पुण्यामध्ये पाऊस पडतो, तितकाच पाऊस मराठवाड्यातही पडला असं गृहीत धरलं जातं आणि प्रत्यक्षात पाऊस पडलेलाच नसतो. त्यामुळे एआयसी पीकविम्याचे दावे मान्य करत नाही. ही पद्धत बदलावी यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.

पावसाबद्दल हवामानाचे अंदाज चुकले आहेत. पिकवीमा हा हवामानावर आधारित असतो. हवामानाचे सर्व अंदाज चुकलेले आहेत. त्यामुळं ही जबाबदारी शासनानं झटकून चालणार नाही. यावर राजकीय निर्णयच घ्यावा लागेल असं भालेराव म्हणाले.

Updated : 28 Oct 2019 1:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top