औरंगाबादमध्ये कोरोनाचं अर्धशतक; आज नव्या २ जणांना लागण

Courtesy : Social Media

औरंगाबाद शहरात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. आज शहरातील २ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता शहरातील बाधित रुग्णांची संख्या ५१ वर पोहोचली आहे. आज पहाटे आसेफिया कॉलनीतील ३५ वर्षीय महिला आणि समतानगर येथील ६५ वर्षीय वृद्धेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झालंय.

शहरात १५ मार्चला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर तब्बल १५ दिवस शहरात नवा रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. पण त्यानंतर शहरात सातत्याने रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या ४८ तासांत शहरात ११ नव्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय.

शहरातील कोरोनाबधितांचा मृत्युदर ९.८० टक्के आहे तर बरे होणाऱ्यांचे प्रमाण ४३.१४ टक्के आहे. आतापर्यंत ५ रुग्णांचा मृत्यू झालाय तर २२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.