Home > News Update > धक्कादायक: डबल महाराष्ट्र केसरीकडून तहसिलदाराला मारहाण

धक्कादायक: डबल महाराष्ट्र केसरीकडून तहसिलदाराला मारहाण

धक्कादायक: डबल महाराष्ट्र केसरीकडून तहसिलदाराला मारहाण
X

वाळू वाहतुकीच्या गाड्यांवर कारवाई केल्याच्या रागातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगलीच्या विटा येथे तहसीलदारांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चंद्रहार पाटील यांच्यासह दोघांच्यावर विटा पोलीस ठाण्यात तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी गुन्हा दाखल केला आहे.

विटा तहसील कार्यालयाच्या आवारातच चंद्रहार पाटील यांनी तहसीलदार शेळके यांना आपल्या साथीदाराच्या मदतीने मारहाण केली आहे. काही दिवसांपूर्वी विट्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांच्यावर कारवाई केली होती. त्यामध्ये चंद्रहार पाटील यांच्याही वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा समावेश होता. आणि या गाड्यांच्यावर तब्बल साडे सात लाख रुपयांचा दंड तहसीलदार शेळके यांनी केला होता.

तहसीलदार ऋषिकेश शेळके

तर हा दंड कमी करावा अशी मागणी वारंवार चंद्रहार पाटील यांच्याकडून तहसीलदार शेळके यांच्याकडे करण्यात येत होती. मात्र, तहसीलदार शेळके यांनी चंद्रहार पाटील यांच्या मागणीला दाद न देता, सर्व दंड भरा अशा सूचना दिल्या होत्या.आणि हाच राग मनात धरून आज दुपारी चंद्रहार पाटील हे विटा तहसील कार्यालयात पोहचले.आणि तहसीलदार ऋषिकेश साळुंके यांना पुन्हा दंड कमी करण्याच्या मागणी करू लागले.

यातून चंद्रहार पाटील आणि तहसीलदार शेळके यांच्यात वादावादी झाली, त्यातून चंद्रहार पाटील आणि त्यांच्या साथीदाराने तहसीलदार शेळके यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत शेळके यांनी विटा पोलीस ठाण्यामध्ये पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह त्यांच्या साथीदारांच्या विरोधात फिर्याद दाखल केली, त्यानुसार चंद्रहार पाटील आणि अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated : 3 May 2020 5:07 PM GMT
Next Story
Share it
Top