तिहेरी तलाक विरोधी विधेयक संसदेत, विरोधकांचा गोंधळ 

तिहेरी तलाक विरोधी विधेयक शुक्रवारी पुन्हा लोकसभेच्या पटलावर सादर करण्यात आले. मात्र, या विधेयकावरून काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत त्यातील तरतुदींवर आक्षेप घेतला. यामुळे सभागृहात काहीवेळ गदारोळ झाला. विशेष म्हणजे तिहेरी तलाक विरोधी विधेयक तिसऱ्यांदा मांडले. 

केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सभागृहात तिहेरी तलाक विधेयक सादर केले. सरकारच्या मागील कार्यकाळात तिहेरी तलाक विधेयक आणले होते. मात्र, हे विधेयक राज्यसभेत मंजुरीविना लटकले होते. यावेळीही या विधेयकाला ‘काँग्रेस’सह अन्य विरोधी पक्षांनी विरोध दर्शविला. या विधेयकातील अनेक तरतुदी संविधानाच्या विरोधात असल्याची भूमिका विरोधकांनी घेतली.