Home > News Update > प्रा. हरी नरके म्हणतात 'आण्णाभाऊ दारिद्र्यात जगले आणि त्यातच कुपोषणाने गेले....'

प्रा. हरी नरके म्हणतात 'आण्णाभाऊ दारिद्र्यात जगले आणि त्यातच कुपोषणाने गेले....'

प्रा. हरी नरके म्हणतात आण्णाभाऊ दारिद्र्यात जगले आणि त्यातच कुपोषणाने गेले....
X

तिस-या परिच्छेदात प्रा. नरके म्हणतात, राज्य शासनाकडून त्यांना (आण्णांना) लेखक-कलावंताचे तुटपुंजे मानधन मिळे, ते दर आठवड्याला मिळावे म्हणजे आपली चूल पेटेल, असे सांगत ते मंत्रालयातील अधिका-यांना भेटले. मात्र, तसे मानधन मिळाले नाही, आण्णाभाऊ गेले तेव्हा त्यांना किमान चार दिवसांचा उपवास घडलेला होता.

प्रा. हरी नरके जे म्हणतात. आण्णाभाऊ दारिद्र्यात जगले आणि त्यातच कुपोषणाने गेले. या त्यांच्या विधानात तथ्य नाही. आण्णाभाऊ दारिद्र्यात जगले हे विधान अर्धसत्य आहे. कॉ. आण्णाभाऊ कम्युनिस्ट पक्षात सक्रीय असतानाच्या काळात म्हणजे १९६४-६५ पर्यंत त्यांच्या कुटूंबाची आर्थिक स्थिती तशी हलाखीची होती. त्यांच्या द्वितीय पत्नी जयवंताबाई मोलमजुरी करायच्या आणि मुलगी शांताबाई ठाण्याच्या औषधी कंपनीत कामगार म्हणून नोकरी करुन मिळणा-या कमी पगारावर घर चालवायच्या पण अपार दारिद्र्य, रोजच्या जेवणाची मारामार अशी स्थिती नव्हती. किमान दोन वेळचे जेवण मिळत होते. कुपोषण होण्याएवढी बिकट अवस्था मुळीचं नव्हती. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांच्या योगदानामुळे ते १९६० नंतर एवढे लोकप्रिय व प्रसिद्धीस आले होते. की, त्यांच्या शाहीर, साहित्यिक म्हणून चहातावर्ग मुंबई-महाराष्ट्रभर निर्माण झाला होता. जो त्यांना प्रेमाने जेऊ-खाऊ घालायचा त्यांच्या फकिरा व अन्य कादंब-यांवर व्यवसायिक चित्रपट निर्माण झाले होते. व त्यामधून त्यांना थोडे -बहुत पैसेही मिळत होते.

वाचा प्रा. हरी नरके यांनी डॉ. सुबोध मोरे यांच्या या लेखाला दिलेले उत्तर

१९६१ साली कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकराने व सहकार्याने कॉ. आण्णाभाऊ रशियालाही जाऊन आले होते. १९६८ साली आण्णाभाऊंना राज्य शासनातर्फे कलावंत कोट्यामधील बेडरुम, हॉल, किचन व गॅलरी असलेले छान घरही गोरेगावच्या सिद्धार्थनगर नंबर-२ मध्ये हौसिंग बोर्ड वसाहतीत दिले होते. तसेच १९६८ सालीच आण्णाभाऊंना शासनाने साहित्यिक कलावंत म्हणून मासिक ३०० रुपये असे घसघशीत मानधनही सुरू केले होते. तत्कालीन रुपयाची किंमत पाहता ही मानधनाची रक्कम नक्कीच मोठी होती. त्यामुळे तुटपुंजे मानधन अण्णांना मिळत होते, असे जे प्रा.हरी नरके लेखात म्हणतात. ते खोटे आहे. सत्याचा विपर्यास करणारे आहे. किती तुटपुंजे मानधन होते. हे प्रा.नरकेंनी सांगावे? वरील गोष्टींवरुन एक बाब स्पष्ट होते की, अखेरच्या दोन-चार वर्षात अण्णाभाऊंची आर्थिक स्थिती, राहणीमान ब-यापैकी सुधारत होते. त्यांच्यावर अपार दारिद्रयाची उपासमारीची पाळी आली नव्हती. प्रा.हरी नरके म्हणतात. तसे आठवड्याला मानधन मिळावे. म्हणजे आपली चूल पेटेल. असे सांगत मंत्रालयातील अधिका-यांना भेटण्याची पाळी अण्णाभाऊंवर आली. हे म्हणजे खोटे व अवास्तव, अतिरंजित आहे, आणि प्रसिद्ध शाहीर, कॉ. अण्णाभाऊ यांचा अपमान करणारेही आहे. प्रा.नरकेंच्या विधानाला कुठलाही आधार नाही. त्यांच्या परिच्छेदात प्रा.नरके जे म्हणतात. अण्णाभाऊ गेले. तेव्हा त्यांना किमान चार दिवसांचा उपवास घडलेला होता. आणि म्हणून प्रा.नरकेंचा निष्कर्ष की अण्णाभाऊ कुपोषणाने, उपासमारीने गेले. पण या अखेरच्या दिवसांची खरी वस्तुस्थिती व सत्य प्रा.नरकेंच्या म्हणण्यापेक्षा वेगळच आहे. ज्याचा मी स्वतः साक्षिदार आहे. अण्णाभाऊ चार दिवस उपाशी होते. हे प्रा.नरकेंचे म्हणणे साफ खोटे आहे. या त्यांच्या म्हणण्याला कुठलाही आधार वा पुरावा त्यांनी दिलेला नाही. व अण्णाभाऊ कुठे वारले हेही सांगितले नाही. कॉ. अण्णाभाऊ दि-१८ जुलै १९६९ यकृताच्या (लिव्हरच्या) विकाराने वारल्याचा डॉक्टरांचे निदान आहे. कुपोषणाचा कुठेही उल्लेख नाही. कॉ.अण्णाभाऊ त्याच दिवशी म्हणजे १७ जुलै १९६९ ला अण्णाभाऊ साठे मानधनाची रक्कम घेण्यासाठी मंत्रालयात गेले होते. व मंत्री बाबुराव भारस्करांना तेथे भेटले व त्यांच्या सहकार्यामुळे मानधनाची ३०० रु रक्कमही दिल्याचा उल्लेख भारस्करांनी अण्णाभाऊंवर जो आदरांजलीपर लेख नंतर लिहला त्यात उल्लेख केला आहे. त्याच दरम्यान अण्णाभाऊंच्या 'आवडी' या कादंबरीवर 'टिळा लावते मी रक्ताचा' हा चित्रपट ही मुंबईत व गोरेगावच्याच 'अनुपम' थिएटरमध्ये लागला होता. त्या चित्रपटाची तिकिटे ही अण्णाभाऊंनी काढून जयवंताबाई व मुलींसाठी पाठवली होती. एवढेच नाहीतर दि-१७ जुलैलाच ते मंत्रालयातून मानधन घेऊन एका चित्रपटाच्या समारंभाला मुंबईत गेले होते, व तो समारंभ उरकून ते टॅक्सीने गोरेगावला आले, मी व काही मित्र त्यांच्या घराजवळील चौकात बसलो असताना, टॅक्सीवाला आमच्या जवळ आला व यांना ओळखता का? म्हणून विचारले, मी टॅक्सीत डोकावलो. असता अण्णाभाऊ मागच्या सिटवर मान टाकून शुद्ध हरपल्याच्या अवस्थेत पडले होते. मग मी पुढे टॅक्सीत बसून त्यांच्या घरापर्यंत टॅक्सी नेली. व टॅक्सीवाल्याच्या मदतीने अण्णाभाऊंना त्या रात्री घरात सोडले. नंतर दुस-या दिवशी दि-१८ जुलैला सकाळी ११च्या सुमारास अण्णाभाऊ वारले. जी व्यक्ती स्वतः सिनेमाची तिकिटे काढून पत्नीला पाठविते, स्वतः मंत्रालयापर्यंतचा प्रवास करते. चित्रपट समारंभाला उपस्थित राहते. आणि टॅक्सीने मुंबईतून गोरेगावला परतते. त्या अण्णाभाऊंनी मानधनाचे पैसे खिशात असताना चार दिवसांपासून उपाशी असताना काहीच खाल्ले नसेल का? असे होऊ शकते का ? याचा तर्कशुद्ध पद्धतीने विचार करावा, व स्वतःच्या मनाने प्रमाणिकपणे उत्तर द्यावे.

प्रा.नरके लेखात म्हणतात, मंत्री भारस्करांनी खिशातून ५००रुपये काढले व कार्यकर्त्यांना अंत्यविधीचे सामान आणण्यासाठी दिले, पण ते परतलेच नाही. व दारुची पार्टी करीत बसले. पहिली गोष्ट म्हणजे त्यावेळेस अंत्यविधीच्या सामानासाठी एवढे जास्त ५०० रु यासाठी लागायचे का ? आजच्या तुलनेत त्या ५००रुपयांची किंमत खूप मोठी असेल, एवढी जास्त कोणी देईल का? हा ५०० रु रक्कमेचा आकडा प्रा.नरकेंना कुठून कळाला याचा खुलासा होईल का? आणि कार्यकर्ते कुठल्या पक्षाचे याचा उल्लेख का नाही? तेव्हा मातंग समाज तर राजकीय दृष्ट्या सजग, जागृत नव्हता. मग कार्यकर्ते कोण होते? अर्धवट माहितीची विधाने करण्यामागे लेखकाचा हेतू काय ? पुढे याच लेखात प्रा.नरके म्हणतात. अण्णाभाऊंच्या अंत्यविधीला हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढेच लोक उपस्थित होते. व ही माहिती अंत्यविधीला उपस्थित असणा-या तिघा मान्यवरांकडून मिळाली आहे. प्रा.नरकेंच्या मते हाताच्या बोटावर मोजता येतील, अवघे दहा-बरा लोक अंत्यविधीला उपस्थित होते. माझ्या मते प्रा.नरके यांची ही माहिती ऐकिव प्रचाराचा भाग व बिनबुडाची खोटी आहे. कॉ. अण्णाभाऊंच्या अंत्यविधीला शाहीर कॉ.अमर शेख, बाबुराव बागूल, नारायण सुर्वे, दया पवार, अर्जुन डांगळे, प्रा.श्री.नेरुरकर, राजा ढाले, वामन होवाळ, डॉ. सदाक-हाडे, प्रल्हाद चेंदवणकर, राजा राजवाडे, शाहीर चंदू भरडकर, बी.निलप्रभा, बा.स.हाटे, आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक रमेश शिंदे, इप्टाचे सुप्रसिद्ध कलावंत ए.के.हंगल, अभिनव प्रकाशनचे वा.वि.भट, कम्युनिस्ट पक्षाचे नेते व माझे आजोबा कॉ.आर.बी.मोरे, वडील कॉ.सत्येंद्र मोरे, कॉ.जी.एल.रेड्डी, मंत्री बाबुराव भारस्कर, अॅड.काकासाहेब आळेकर, जयवंताबाई साठे व त्यांच्या दोन मुली आदी मान्यवर साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते धरुनच सुमारे पंचविसच्या आसपास लोक होतात. व कम्युनिस्ट पक्षाचे आणि अन्य कार्यकर्ते नातेवाईक, नागरिक धरुनच सुमारे अडीचशे-तीनशे लोक अंत्ययात्रेला उपस्थित होते. याचा मी स्वतः साक्षिदार आहे. प्रा.नरके या संदर्भात ज्या तीन मान्यवरांची नावे घेतात. ती त्यांनी जाहीर करावी.

प्रा.नरके लेखात शेवटचा आरोप असा करतात. की, ज्या "डाव्या चळवळीच्या जागरणात अण्णाभाऊंचे मोठे योगदान होते. त्या चळवळीच्या तत्कालीन उच्चभ्रू नेतृत्वाने अण्णाभाऊंची घोर उपेक्षा केली". प्रा.नरके यांचा डाव्या चळवळीवरील हा आरोपही त्यांच्या कम्युनिस्ट विरोधी प्रचाराचा भाग आहे. त्यांच्या म्हणण्यात अजिबात तथ्य नाही. वास्तव हे आहे.की कॉ. अण्णाभाऊ, कॉ.अमर शेख यांसारख्या तळागाळातील जात-वर्गातून आलेल्या रुढार्थाने निरक्षर असलेल्या कलावंत-लेखक कार्यकर्त्यांना घडविण्यात शोषित वर्गाच्या कम्युनिस्ट चळवळीच्या नेतृत्वाचे मोठे योगदान आहे. ज्या ब्राम्हणी-भांडवली, जात-वर्ग व्यवस्थेच्या, संस्कृतीच्या समर्थकांनी कॉ. अण्णाभाऊ, कॉ. अमर शेखांची उपेक्षा केली. त्या कॉ. अण्णाभाऊंचे गाणी, पोवाडे, नवे तमाशे, कथा, कादंब-या, नाटके कम्युनिस्ट पक्षाशी, विचारांशी संबंधित असलेल्या तथाकथित उच्च जातीतील स.ह.मोडकांच्या लोकसाहित्य व वा.वि.भटांच्या अभिनव प्रकाशनाने प्रथम पुस्तक रुपात प्रकाशित केले. कम्युनिस्ट पक्षाने ज्येष्ठ नेते कॉ.डांगे यांनी अण्णाभाऊंच्या 'शाहीर' पुस्तकाला प्रस्तावना लिहून त्यांचा गौरव केला. कम्युनिस्ट पक्षाने कॉ. अण्णाभाऊंना 'इप्टा' या अखिल भारतीय नाट्य संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष केले. कॉ. अण्णाभाऊंचे साहित्य जगातील अनेक भाषांत अनुवाद करुन त्यांना सन्मानाने सोविएत रशियाला पाठविले, त्यांच्या फकिरा कादंबरीवर इप्टाच्या मदतीने चित्रपट बनविला ज्याचे निर्माते कॉ. द.ना.गव्हाणकर जे तथाकथित उच्चवर्णिय होते, आणि त्यांनीच अण्णाभाऊ, अमर शेखांच्या गाण्यांना चालीही लावल्या व गाणीही गाऊन लोकप्रिय केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील 'जग बदल घालुनि घाव' हे गाणे कॉ. गव्हाणकरांनीच गाऊन लोकप्रिय केले आहे.

तेव्हा प्रा.हरी नरकेंनी अण्णाभाऊ व कम्युनिस्ट चळवळीबाबतचे खरे वास्तव समजून घ्यावे. इतिहासाचे स्वतःच्या सोईने वा पुर्वाग्रहाने नव्हे. तर वस्तुनिष्ठपणे विश्लेषण व संशोधन करावे. व उथळ शेरेबाजी टाळावी ही नम्र विनंती.

अधिक महितीसाठी दि-२८जुलै २०१९ चा लोकसत्तामधील माझा लेख पाहावा.

- सुबोध मोरे

Updated : 8 Aug 2019 7:49 AM GMT
Next Story
Share it
Top