Home > News Update > महाविद्यालयीन निवडणुकांमुळे घराणेशाही मोडीत निघेल !!!

महाविद्यालयीन निवडणुकांमुळे घराणेशाही मोडीत निघेल !!!

महाविद्यालयीन निवडणुकांमुळे घराणेशाही मोडीत निघेल !!!
X

महाराष्ट्रात विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थी परिषदेसाठीच्या निवडणुकांचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नव्याने छेडल्यामुळे सदरच्या निवडणुका लवकरच होऊ शकतील, असे संकेत आहेत. विद्यार्थी नेत्यांनी निवडणुकांचं स्वागत केलं असून, राजकारणात नवं नेतृत्व उभारण्यासाठी व राजकारणातील घराणेशाही मोडीत काढण्यासाठी महाविद्यालयीन निवडणुका महत्त्वपूर्ण आहेत, अशी प्रतिक्रिया मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना दिल्या आहेत.

मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिर येथे आयोजित केलेल्या ‘संवाद साहेबांशी’ या कार्यक्रमात पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी पवारांनी महाविद्यालयीन निवडणुकांचा मुद्दा छेडला. महाविद्यालय आणि विद्यापीठात आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना मिळायलाच हवा. त्यासाठी या निवडणुका पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही पवारांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिली.

देशाचे भवितव्य घडविण्याची ताकद युवा पिढीत आहे. त्यांची कुवत व ताकद लक्षात घ्यायला हवी. आत्ताच्या पिढीबद्दल गैरसमज निर्माण होत आहेत. परंतु त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे सांगतानाच महाविद्यालयीन निवडणुका बंद करून लोकशाहीमधील निवडणुकीची प्रक्रिया थांबवणे योग्य नाही. त्यामुळे या निवडणुका सरकारने पुन्हा सुरू कराव्यात, असं पवार म्हणालेत.

सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावर खुल्या विद्यार्थी निवडणुका घेण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. काही लोकांना निवडणुका हव्या आहेत, तर काहींना नको आहेत. विद्यार्थी निवडणुकीबाबतचा गेल्या सरकारचा निर्णय योग्य नव्हता. सध्याच्या परिस्थितीत महाविद्यालयीन निवडणुका होणे योग्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया तंत्र व उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गेल्याच महिन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्यक्त केली होती. पण आता पवारांनीच महाविद्यालयीन निवडणुकांबाबत सकारात्मकता दाखवल्याने महाराष्ट्रात विद्यार्थी परिषद अस्तित्वात येण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील यांनी मॅक्समहाराष्ट्र ला सांगितलं की निवडणुका व्हायला हव्यात ही आमची जुनी मागणी आहे. शरद पवारांसहित भारतातील अनेक दिग्गज नेत्यांच्या राजकारणाची सुरूवात विद्यार्थी दशेपासूनच झालेली आहे. राजेश टोपे मंत्री असताना आम्ही निवडणुकांची मागणी केली होती. त्यासाठीची प्रक्रिया सुरू असतानाच सरकार बदललं. त्यानंतरच्या सरकारातसुद्धा निवडणुका झाल्या नाहीत. आता त्या होणार असतील तर आम्हाला आनंदच होईल. महाविद्यालयीन निवडणुकांच्या माध्यमातून समाजातील अगदी गोरगरीब स्तरातील विद्यार्थ्यांनाही नेतृत्वाची संधी मिळेल. कदाचित त्यातूनच उद्याचं महाराष्ट्राचं किंवा भारताचं नेतृत्व घडेल.

महाविद्यालयीन निवडणुकांतील हिंसक प्रकारांमुळे निवडणुका बंद करण्यात आल्या होत्या याकडे लक्ष वेधल्यावर अजिंक्य राणा पाटील म्हणाले की निवडणुका रद्द करणे हा त्यावर उपाय नाही. आचारसंहिता आखून हिंसक प्रकारांना आळा घातला गेला पाहिजे. राजकीय पक्षांच्या हस्तक्षेपाबद्दल विचारलं असता पाटीलांनी स्पष्ट सांगितलं की महाविद्यालयाच्या आवारात निवडणुक काळात राजकीय हस्तक्षेप असता कामा नये.

हिंसक घटनांमुळे सार्वत्रिक निवडणुका कायमच्या बंद पडल्या का असा सवाल करीत, लिंगदोह समितीच्या शिफारशी आता मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने देशभर लागू झाल्यापासून आता महाविद्यालयीन निवडणुकांना आचारसंहिता लाभली आहे. त्यांची जर काटेकोर अंमलबजावणी झाली तर हिंसक प्रकारांची जी भीती व्यक्त केली जाते तशी शक्यता कमी असल्याचं मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष स्वप्नील बेगडे यांनी व्यक्त केलंय.

महाविद्यालयीन निवडणुकांमुळे घराणेशाहीला आळा बसेल व नवनेतृत्वाला राजकारणात शिरकाव करायला वाव मिळेल, असं बेगडे यांनी मॅक्समहाराष्ट्र ला सांगितलं. महाराष्ट्रात लागू असलेल्या विद्यापीठ कायद्यात विद्यार्थी परिषदेची रीतसर तरतूद असल्याने सरकारला निवडणुका घेणं भाग आहे. शरद पवारांना हे माहित आहे. त्याआधीच वक्तव्य करून पवार श्रेय घेऊ पाहताहेत, असाही आरोप बेगडे यांनी केला. सरकारने निवडणुका घ्यायचं टाळलं तर आम्ही न्यायालयात दाद मागू, असा इशाराही बेगडे यांनी दिला आहे.

Updated : 25 Feb 2020 12:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top