Home > News Update > शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा
X

क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षकांना दरवर्षी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. 2018-19 वर्षासाठी पुरस्कार विजेत्यांची घोषणा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार आणि क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

शिवछत्रपती पुरस्कारासाठी जीवन गौरव, मार्गदर्शन, संघटक, कार्यकर्ते, खेळाडू अशा एकूण पाच गटामध्ये तब्बल 289 अर्ज राज्याच्या क्रीडा विभागाकडे दाखल झाले होते. यातून 63 व्यक्तींची पाच गटातून पुरस्कारासाठी निवड झाली. त्याचप्रमाणे ज्यांच्या शिष्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केले अशा 5 मार्गदर्शकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले.

पुरस्कार वितरण समारंभ :

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ व खेलो इंडिया युथ गेम्स 2020 गुवाहटी आसाम मधील पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दि. 22 फेब्रुवारी, 2020 रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे सायं.5.00 वा होणार असल्याचे सुनिल केदार यांनी सांगितले.

यावर्षीपासून खेलो इंडिया खेलो मधील विजेत्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. पुरोगामी महाराष्ट्रात खेळांना महत्त्व देण्याकरिता विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. समाजमाध्यमात गुंतलेल्या नवीन पिढीला खेळात प्रोत्साहन देण्याकरिता पायाभूत सुविधा देण्यावर भर देण्यात येणार आहे. खेळामुळे जातीभेद, लिंगभेद दूर होऊन यशस्वी होण्याची क्षमता निर्माण होते. जगात विकसित राष्ट्रही खेळाला प्राध्यान्य देत आहेत. महाराष्ट्रातील गाव खेड्यातील खेळात प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती यावेळी त्यांनी सांगितली.

क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी, खेळामध्ये मुलींचा सहभाग वाढविण्याकरिता ‘गो गर्ल गो’ अशा खेळांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याची यावेळी माहिती दिली. मुलींनाही आरोग्यसंपन्न राहण्याकरिता खेळ महत्त्वाचा आहे. याकरिता राज्यशासन ग्रामीण भागातील मुलींना खेळाच्या सुविधा पुरविण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविणार आहे. शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळ्यात खेलो इंडिया खेलो स्पर्धेतील खेळाडूंसह राज्यातील जवळपास 400 खेळाडूंचा पहिल्यांदाच सन्मान करीत आहे. शिवछत्रपती पुरस्कार प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यात नियमित वितरित करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

Updated : 19 Feb 2020 5:38 AM GMT
Next Story
Share it
Top