Home > News Update > समाजवादी नेते रमेश जोशी यांचे निधन

समाजवादी नेते रमेश जोशी यांचे निधन

समाजवादी नेते रमेश जोशी यांचे निधन
X

समाजवादी चळवळीत अभ्यासू आणि आक्रमकपणे छाप पाडणारे, शिक्षकांची संघटना बांधून त्यांचे प्रश्न ऐरणीवर आणणारे, समाजवादी नेते रमेश जोशी यांचे आज दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने समाजवादी चळवळीतील एक अत्यंत उमदं, अखेरपर्यंत समाजवादी विचारांशी बांधिलकी असलेलं लढाऊ व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याच्या भावना व्यक्त होत आहे.

गोरेगाव हा मुंबईतील एकेकाळचा समाजवाद्यांचा बालेकिल्ला. रमेश जोशी यांनी त्या पलिकडे जात मुंबई महापालिकेच्या शिक्षकांचे प्रश्न उचलून धरत त्यांची संघटना बांधली. पण महापालिकेच्या शाळांचेही ते सतत पुरस्कर्ते राहिले. शिक्षकांतर्फे ते महापालिकेवर निवडून गेले आणि मग केवळ शिक्षक, महापालिका शाळा इथपर्यंत मर्यादित न राहता मुंबईतल्या सामान्य नागरिकांचा महापालिका सभागृहातील बुलंद आवाज बनले. महापालिकेत येणाऱ्या विविध प्रस्तावांचा बारकाईने अभ्यास करत रमेश जोशी प्रशासनाला धारेवर धरत.

तुम्हाला तुमची मुलं जात असलेल्या शाळांचा दर्जा खालावलाय असं वाटत असेल, तर त्यांना महापालिकेच्या शाळांत घाला' असा जाहीर सल्ला त्यांना तथाकथित नेत्यांना दिला होता. महापालिका शाळांतील शिक्षकांनी मुंबईच्या गरीब वस्त्यांमध्ये राबविलेल्या प्रयोगांची माहितीही त्यांनी दिली होती. महापालिका शिक्षकांचा दर्जा हा कुठल्याही खासगी शाळांतील शिक्षकांच्या दर्जापेक्षा सरस असतो, असा त्यांचा ठाम दावा होता.

महापालिका शाळा आणि त्यातील शिक्षक यांची आयुष्यभर संघटना बांधणाऱ्या या नेत्याच्या हातातून ही संघटना जाताना बघण्याचं दुःखही त्यांच्या वाट्याला आलं. ती सल त्यांच्या मनात कायम राहिली. आयुष्यभर साथ देणाऱ्या पत्नीचं काही वर्षापूर्वी निधन झालं. त्यानंतर मुलगा साहिल आणि सुन प्रिया यांनी रमेश जोशी यांची काळजी घेतली.

Updated : 3 Oct 2022 1:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top