Home > News Update > "सामाजिक कृतज्ञता निधी" आर्थिक सहकार्यासाठी मान्यवरांचे आवाहन

"सामाजिक कृतज्ञता निधी" आर्थिक सहकार्यासाठी मान्यवरांचे आवाहन

सामाजिक कृतज्ञता निधी आर्थिक सहकार्यासाठी मान्यवरांचे आवाहन
X

दिवसेंदिवस महाराष्ट्रातील शोषित समूहाचे प्रश्न अधिक गंभीर होत आहेत. पण हे प्रश्न गंभीर होताना शोषित समुहासाठी काम करणाऱ्या संस्थाही कमी होत आहेत. त्यातही शोषित समूहांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर संविधानाच्या मार्गाने संघर्ष करणाऱ्या संस्था तर खूपच कमी आहेत.

अनाथ मुले, वृद्ध यांच्यासाठीचे काम, शैक्षणिक मदत करणे, दवाखाना चालविणे याला समाज खूप मदत करतो. या सर्व कामांचे मूल्य मोठेच आहे. पण तशी मदत गरिबांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा म्हणून संघर्ष करणाऱ्या संघटनांना होत नाही. संघर्ष करणे म्हणजे सामाजिक काम समजले जात नाही. वास्तविक शांततेच्या मार्गाने दबावगट म्हणून काम करणाऱ्या जनचवळींच्या माध्यमातून गरीब, शोषित समूहाचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटत असतात.

शिक्षण, रेशन, घरकुल, वनजमिनी, न्यायाधारित पुनर्वसन, रोजगार हमी, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा या साठीच्या यशस्वी संघर्षांमुळे हजारो नागरिकांना फायदा होतो, होऊ शकतो. समाज या संघर्षशील आंदोलनांना मदत करीत नाही. त्यामुळे या संघटनांना आंदोलनं करणे, आंदोलनांच्या विस्तारासाठी अधिक कार्यकर्ते नेमणे कठीण होते. या संघटनांकडे कार्यकर्ते आकर्षित होतात.

पण त्यांना अत्यल्प मानधनावर काम करावे लागते. या सर्व आर्थिक अडचणींमुळे सामाजिक आंदोलने कमी कमी होत आहेत. काही कार्यकर्ते स्वत: होऊन हे काम करीत राहतात. पण उदरनिर्वाहाचे साधन नसल्यानं हळूहळू त्यांचे काम मर्यादित होत जाते.

खरे तर हे सारे कार्यकर्ते समाजासाठी काम करीत असल्यानं त्यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी घेणे. ही समाज म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे.

आपल्या सर्वांना या कामात वेळ देणे शक्य नसते. त्यामुळे आपण किमान या आंदोलनांना आर्थिक मदत करून पाठबळ दिले पाहिजे. त्यातून ही आंदोलनं सशक्त होतील आणि समाजाचे प्रश्न सुटायला मदत होऊ शकेल. आज मध्यमवर्गात दातृत्वाची भावना वाढते आहे. ही समाधानाची बाब आहे. सोशल मिडीयात याचा नेहमीच प्रत्यय येतो. काय आहे ‘सामाजिक कृतज्ञता निधी’

“सामाजिक कृतज्ञता निधी” हा याच भावनेतून स्थापन झालेला विश्वस्त निधी आहे. १९८० च्या दशकात विषमता निर्मुलन शिबिरांमध्ये महाराष्ट्रातील विविध जनचळवळीतील संघर्षरत कार्यकर्ते एकत्र येत असत. एकमेकाचे अनुभव ऐकून, समजून घेऊन पुन्हा नव्या उमेदीने आपापल्या कार्यक्षेत्रात परतत असत. अशाच एका विषमता निर्मुलन शिबिरात कार्यकर्त्यांसाठी काही संघटनात्मक आधार (सपोर्ट सिस्टीम) उभा करावा या उद्देशाने “सामाजिक कृतज्ञता निधीचा जन्म झाला.

डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, रोहिणी हत्तंगडी, रीमा लागू, सदाशिव अमरापूरकर अशा दिग्गज व संवेदनशील कलाकारांनी आणि डॉ. बाबा आढाव, डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. अनिल अवचट, गजानन खातू, पुष्पा भावे अशा ज्येष्ठ नेत्यांसोबत महाराष्ट्रातील विविध पूरोगामी संघटनांच्या अनेक कार्यकर्त्यांनी या निधीला वाढविण्यासाठी आपले योगदान दिलेले आहे.

या विश्वस्त निधीकडे जमा झालेल्या रकमेच्या व्याजातून महाराष्ट्रातील हमाल कष्टकरी, शेतमजूर, कचरावेचक महिला, रिक्षाचालक, भटके विमुक्त जमाती, आदिवासी, शरीरविक्रय करणाऱ्या महिला इ. संवेदनशील घटकांसाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्याचबरोबर अंधश्रध्दा निर्मुलन, युवक संगठन अशा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या चाळीस कार्यकर्त्यांना दरमहा दोन हजार रुपयांचे आर्थिक सहकार्य पाठविले जाते.

या सर्व कार्यकर्त्यांच्या क्षमता विकासासाठी वर्षातून एकदा प्रशिक्षण शिबीर घेतले जाते. प्रभावी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानित केले जाते. या विश्वस्त निधीचा व्यवस्थापनाचा खर्च शून्य आहे. महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या कार्यालयातून कामकाज चालविले जाते. ठेवीवर मिळणारे सर्व व्याज कार्यकर्त्यांचे मानधन, प्रशिक्षण आणि पुरस्कार कार्यक्रमासाठी खर्च केले जातात.

मात्र, राष्ट्रीयकृत बँकांचे व्याजदर कमी कमी होत चालल्यामुळे कार्यकर्त्यांना समाधानकारक मानधन देण्यात अडचण येते. तेव्हा आपण जर या सामाजिक कृतज्ञता निधीला आर्थिक मदत केली. तर त्या माध्यमातून महाराष्ट्रात संवेदनशील सामाजिक प्रश्नावर काम करणाऱ्या आंदोलनांना आणि कार्यकर्त्यांना तुमची मदत पोहोचू शकेल.

निधीच्या विश्वस्त मंडळाने सध्याचा सव्वा कोटी रुपयांचा निधी किमान दुपटीने वाढवायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या कार्यकर्त्यांना जे दरमहा दोन हजार रुपये पाठवले जातात. ती रक्कम ही दुप्पट करणे शक्य होईल. आम्ही सा.कृ.नि. च्या मित्रांनीही याकामी सहकार्य करण्याचे ठरवले आहे. या निधीला मदत करण्यासाठी आपल्या नियमित उत्पन्नातील काही हिस्सा या प्रामाणिक व जिद्दी कार्यकर्त्यांसाठी आपण देतो आहोत या भावनेने आपण ही मदत करावी असे आमचे नम्र आवाहन आहे.

एका कार्यकर्त्याचे एक वर्षाचे मानधन किंवा सहा महिन्यांचे मानधनाएवढी रक्कम आपण पाठवू शकता किंवा आपणास जेवढे शक्य आहे तेवढे आर्थिक सहकार्य करू शकता. नवीन वर्ष सुरु झाले आहे. नवीन वर्षाचा संकल्प म्हणून सामाजिक कृतज्ञता निधीच्या खाली दिलेल्या बँक खात्यावर मदत पाठवावी व ९३२५०४६१४२ या क्रमांकावर एसएमएस करून रक्कम पाठविल्याची कल्पना द्यावी ही विनंती.

नव्या वर्षात या सामाजिक अभियानाचा आपण भाग बनावे असे आपणास विनंती वजा आवाहन आहे. आपला मित्रपरिवार आणि नातेवाईक यांनाही त्यांच्या जीवनातील कौटुंबिक आनंदाच्या प्रसंगी या सामाजिक अभियानाला मदत करण्याची विनंती करावी.

सामाजिक कृतज्ञता निधीमध्ये काम करणारे व्यक्ती

न्या. पी. बी. सावंत, डॉ. जनार्दन वाघमारे, उत्तम कांबळे, अभिनेते राजकुमार तांगडे, अभिनेते गिरीश कुलकर्णी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (सिनियर), अच्युत गोडबोले, इंद्रजीत भालेराव, निखील वागळे, विश्वंभर चौधरी, लक्ष्मीकांत देशमुख, उल्का महाजन, अड. सुरेखा दळवी, सुरेश सावंत, अतुल देऊळगावकर, प्रतिमा जोशी, हेरंब कुलकर्णी

सामाजिक कृतज्ञता निधी, विश्वस्त मंडळ पुष्पा भावे (अध्यक्ष), बाबा आढाव (कार्याध्यक्ष), सुभाष वारे (कार्यवाह), काका पायगुडे (कोषाध्यक्ष), अविनाश पाटील, युवराज मोहिते, पौर्णिमा चिकरमाने, विजय दिवाण, जाकीर अत्तार

बँकेच्या खात्याच्या तपशील :

खातेधारकाचे नाव : Samajik Krutadnyata Nidhi

बँकेचे नाव : Bank Of Maharashtra

शाखेचे नाव : Bajirao road, Pune (1)

अकाऊंट नंबर : 20097761032

आय.एफ.सी.कोड : MAHB0000001

सामाजिक कृतज्ञता निधीला मिळणाऱ्या देणग्या 80G नुसार आयकर सवलतीस पात्र आहेत

Updated : 6 Jan 2020 12:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top