Home > Election 2020 > साताऱ्यात राजे फुस्स, दोस्ती जिंकली!

साताऱ्यात राजे फुस्स, दोस्ती जिंकली!

साताऱ्यात राजे फुस्स, दोस्ती जिंकली!
X

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शरद पवारांची नजर तगड्या उमेदवाराकडे लागलेली होती. त्याचवेळी त्यांच्यापुढे त्यांचा जिगरी दोस्त श्रीनिवास पाटील हे नाव पुढे आले. एकेकाळी एस पी कॉलेजच्या रूम नंबर १४ मध्ये राहत असलेले हे मित्र. दोघांचे स्वप्न राजकारणात जायचे हेच होते. शरद पवारांना ही संधी वयाच्या सव्वीसाव्या वर्षी विधानसभेवर मिळाली. यशवंतराव चव्हाण ,यशवंतराव मोहिते, आनंदराव चव्हाण या मात्तबर मंडळींनी शरद पवारांना संधी दिल्यानं पवार विधानसभेपर्यंत पोहोचले होते. मात्र, श्रीनिवास पाटील प्रशासकीय सेवेत गेले. पुढे ते एम पी एस सी करून जिल्हाधिकारी आणि नंतर पुढे सचिव झाले. पण शरद पवार यांनी सांगितल्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन मित्राच्या सोबत राजकारणात आले.

कोण आहेत श्रीनिवास पाटील?

श्रीनिवास पाटील हे माजी खासदार आहेत. सनदी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. यासोबतच ते सिक्कीमचे राज्यपालही राहीलेले आहेत. पाटील शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. तसा जर विचार केला तर श्रीनिवास पाटील हे सातारा जिल्ह्यातीलच पाटण तालुक्यातील मारुल हवेली गावचे. त्यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1941 साली शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच लहान-मोठ्या माणसांत ते मिसळत होते. कर्मवीर भाऊराव पाटील आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सहवास पाटील यांना लाभला.

दरम्यान श्रीनिवास पाटील यांना लोकसभेच्या निवडणुकीतच उमेदवारी दिली जाणार होती. मात्र, उदयनराजे यांनी पुन्हा एकदा संधी देण्यात आली. उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

लोकसभेचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून येण्यास दम लागतो अशा प्रकारे एका अर्थाने पवारांनाच आव्हान दिले. सातारा लोकसभेचे वातावरण हळूहळू तापू लागले होते. शरद पवारांनी आपल्या या जुन्या मित्राला उदयनराजेंच्या विरोधात मैदानात उतरवले. मात्र, अनेक राजकीय विश्लेषक ही लढाई उदयनराजे जिंकणार असं समीकरण मांडत असताना शरद पवार उतारवयात आपल्या मित्रासाठी आणि पर्यायाने पक्षाला उभारी देण्यासाठी शड्डू ठोकून मैदानात उतरले. एखाद्या तरुणाला लाजवेल असा उत्साह घेऊन शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले.

साताऱ्यात उदयनराजेंच्या लीड कमी होणार अशा चर्चा सुरू झाल्या. कितीही जोर केला तरी लोक साताऱ्याच्या गादीलाच मत देणार अशा वावड्या साताऱ्यात उठत होत्या. प्रचाराचे जोर वाढला होता आणि हळूहळू उदयनराजे पडू शकतात अशी कुजबूज साताऱ्यात सुरू झाली. हे आतापर्यंत साताऱ्यात कधी घडलेले नव्हते. उदयनराजे यांना ही चर्चा होईल असेही कधी वाटले नव्हते.

‘काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपला कोलतो’ अशी विधानं माध्यमांसमोर करणार उदयनराजे इतके हवेत होते की, ‘आमच्या साताऱ्यात मोदी पेडेवाला आहे’ असं म्हणत मोदींनाही त्यांनी ठनकावले होते. याच उदयनराजेंना साताऱ्यातील विरोधात जाणाऱ्या वातावरणाशी संतुलन राखण्यासाठी मोदींचा आधार घेण्याची गरज वाटली. सातारच्या आभाळात घिरट्या घालत मोदींची हेलिकॉप्टर्स आली. झालेल्या सभेने पुन्हा उदयनराजेंना अनुकूल वातावरण झालेले होते. मात्र, उदयनराजे यांची बॉडी लँग्वेज बदललेली होती. साताऱ्याच्या जनतेत पवारांचा अंडर करंट होता.

दोन दिवसात साताऱ्याच्या मैदानात शरद पवार यांची सभा होणार होती. त्यानुसार सभेला कोयनेच्या खोऱ्यापासून ते मान खटावपर्यंत विशेषतः ग्रामीण भागातील जनतेचा प्रतिसाद मोठा मिळाला. स्टेजवर अनेक नेत्यांची भाषणं झाली आणि शरद पवारांच्या भाषणाच्या वेळी पावसाच्या सरी वेगाने बरसायला लागल्या. सुजलेले पाय घेऊन उभा राहिलेले शरद पवार काही मिनिटातच पावसासोबत बरसू लागले.

"बंधू भगिनींनो

या सभेला वरून राजानेही हजेरी लावली, हा सातारा जिल्हा त्याच्या आशीर्वादाने चमत्कार करणार आहे आणि त्याची सुरवात २१ तारखेला होणार आहे.

असे सूतोवाच शरद पवारांनी करताच समोरच्या कार्यकर्त्यांमध्ये भर पावसात उत्साह संचारला. पवारांनी पावसात भिजत केलेले हे भाषण सोशल मीडियातून गावागावात फिरले. आणि शेवटच्या क्षणाला ही निवडणूक श्रीनिवास पाटील यांच्याकडे पूर्णपणे झुकली.

शरद पवारांची साथ त्यांच्या सहकाऱ्यांनी साथ सोडली होती. अनेकजण सोडून गेले. राष्ट्रवादीला संपण्या संपवण्याचे वारे महाराष्ट्रात वाहू लागले. शरद पवार मात्र, या विरोधात झुंज देत लढत राहिले.

आज या निवडणुकीचा निकाल लागला आहे. .यात उदयनराजे यांचा दारुण पराभव झाला आहे. या निकालानंतरही साताऱ्यात उदयनराजे यांच्या पराभवापेक्षाही जास्त चर्चा आहे ती म्हणजे शरद पवार यांच्या साथीला धाऊन आलेल्या श्रीनिवास पाटील यांच्या दोस्तीची. साताऱ्याच्या आसमंतात उधळण होत असलेला गुलाल फक्त लोकसभा निवडणुकीच्या विजयचाच नाही तर या वयात एकमेकांच्या साथीला आलेल्या अजरामर दोस्तीचा आहे.

Updated : 24 Oct 2019 4:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top