Top
Home > News Update > विश्वसनीय पत्रकारिता जगणारा पत्रकार काळाच्या पडद्याआड

विश्वसनीय पत्रकारिता जगणारा पत्रकार काळाच्या पडद्याआड

विश्वसनीय पत्रकारिता जगणारा पत्रकार काळाच्या पडद्याआड
X

सर हॅरॉल्ड इव्हान्स (९२) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. ते मात्र पत्रकार, संपादक नव्हते. ते एक लिजंड होते. त्यांच्या पत्रकारितेला आदर्श म्हणून पाहिलं जातं. द संडे टाइम्सचे ते संपादक होते आणि तेव्हा त्यांनी अनेक अशा बातम्या केल्या की ज्यांचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले. तत्त्वांशी ते प्रामाणिक होते आणि आपल्या वार्ताहरांना पूर्ण स्वातंत्र्य देत. भारताशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या पत्रकारितेतून खूप काही शिकण्यासारखे आहे. आजच्या काळात त्याची अधिक आवश्यकता आहे. त्यांनी जवळपास ७० वर्ष पत्रकारिता केली.

हॅरॉल्ड इव्हान्स आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सक्रिय होते. शेवटी ते आंतरराष्ट्रीय समाचार संस्था रॉयटरशी संबंधित होते. ब्रिटन येथील द संडे टाईम्सचे ते १४ वर्ष संपादक होते. द संडे टाइम्सनी त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली आणि इव्हान्सनी वर्तमानपत्राला विश्वसनीयता. द संडे टाइम्स त्यांच्या काळात अतिशय लोकप्रिय झालं. त्यांनी अनेक पुस्तके देखील लिहिली. ‘माय पेपर चेस’ नावाच्या आत्मकथेत त्याने काही मोजक्या बातम्या कशा स्वरूपाने मिळाल्या, त्यासाठी काय करावं लागलं आणि त्याचे परिणाम यावर सविस्तर लिहिले आहे.

त्यांच्यासाठी त्यांच्या वर्तमानपत्राची विश्वसनीयता सर्वात महत्त्वाची होती. त्यांनी कधीही सनसनाटी होईल अशा बातम्यांना महत्त्व दिलं नाही. त्यांचा या गोष्टीवर विश्वास होता की तुमच्या वर्तमानपत्राची विश्वसनीयता असेल तर बातम्या तुमच्याकडे आपोआप येतील. त्यांच्याकडे बातम्या अशा स्वरूपात येत होत्या. अशा अनेक बातम्यांचा उल्लेख करता येईल. बातमी हेरॉल्ड इव्हान्सकडे दिली तर काळजी करण्याचं काही कारण नाही, असा विश्वास लोकांना वाटत होता.

ब्रिटनच्या मॅंचेस्टर येथे १९२८ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. ते अकरा वर्षांचे असताना दुसऱ्या विश्व युद्धाची सुरुवात झाली. द एस्टन-अंडर-लीन- रिपोर्टर नावाच्या साप्ताहिकापासून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. नंतर काही काळ त्यांनी रॉयल एअर फोर्समध्ये काम केलं. मॅंचेस्टर इविनिंग न्यूज या वर्तमानपत्रात वार्ताहर आणि संपादकीय लेखक म्हणून नंतर त्यांनी काम केलं. १९६१ मध्ये नोर्धन इको नावाच्या वर्तमानपत्राचे ते संपादक झाले. त्यांच्या कामाची पद्धत आणि बातम्यांची हाताळणी पाहून १९६६ ला द संडे टाइम्सने त्यांना आमंत्रित केलं. पुढच्या वर्षी या प्रतिष्ठित साप्ताहिकाचे ते संपादक झाले. १९८१ पर्यंत या साप्ताहिकाचे ते संपादक होते.

भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा वर्तमानपत्रांचा खप खूप कमी होता आणि तुलनेने वर्तमानपत्रांची संख्यादेखील कमी होती. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना वर्तमानपत्र वाढावी आणि त्यांचा खपही वाढावा, असं वाटत होतं. ते स्वतः साहित्यिक असल्याने त्यांचे जागतिक स्तरावरील अनेक साहित्यिक व पत्रकारांशी व्यक्तिगत संबंध होते. इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्यूटनी (आरटीआय) भारतात पत्रकारांना प्रशिक्षण देण्यासाठी काही कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. आरटीआय ही प्रतिष्ठीत संस्था. पहिल्या कार्यशाळेत एडिटिंग आणि डिझाईन समजून सांगण्याची जबाबदारी हॅरॉल्ड इव्हान्सवर होती. त्यापूर्वी त्यांनी भारतातल्या वेगवेगळ्या भाषा आणि इंग्रजी वर्तमानपत्राचा अभ्यास केलेला. साधारण ३० संपादक त्यांच्या कार्यशाळेत सहभागी झाले होते. वर्तमानपत्रांचा ले-आउट कसा असावा आणि हेडलाईन लोककेंद्री असली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. हेडलाईन्स लहान आणि सोप्या भाषेत असल्या पाहिजेत असं त्यांनी सगळ्यांना शिकवले.

१९७०च्या मध्यास युगांडा आणि इदी अमीन चर्चेत होते. इदी अमीनच्या अत्याचाराने लोक हैराण झाले होते. मूळ भारतीय असलेल्या लोकांना देश सोडावा लागला होता. इदी अमीनच्या विरोधात बोलणाऱ्यांची दिवसाढवळ्या हत्या केली जात असे. ही वस्तुस्थिती असताना देखील १९७५ मध्ये ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटीने‌ इदी अमीनला एकमताने अध्यक्ष निवडले. संयुक्त राष्ट्र आणि कॉमनवेल्थ देखील फारसं बोलत नव्हतं. या पार्श्वभूमीवर द संडे टाइम्स युगांडावर मोठी बातमी करतं होतं. या बातमीचा सोर्स होता इदी अमीनच्या सरकारात मंत्री असणारा हेनरी केम्बा. इदी अमीनला तो वीस वर्षापासून ओळखत होता. काही दिवसांपूर्वी तो हॅरॉल्ड यांच्या कार्यालयात आला आणि म्हणाला," मला जे माहित आहे ते मला जगाला सांगायचं आहे. माझ्यासोबत ते मरता कामा नये." इदी अमीनने हेन्रीची हत्या करण्यासाठी मारेकरी पाठविलेले. एकाला‌ हिथ्रो विमानतळावर पकडण्यात आलेला. हेनरीला ब्रिटनने राजकीय आश्रय दिला होता. इदी अमीनने मंत्रिमंडळातील पाच जणांची हत्या घडवून आणली होती. युगांडातुन पळून जाण्याची हेनरी तयारी करत होता. जागतिक आरोग्य संघटनेची जिनीव्हा येथे बैठक होती. आपल्या दोन मुलांना त्यांनी कम्पाला येथे आपल्या नातेवाइकांकडे पाठवले. तिथून त्यांना‌ केनयाला पोहचवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. जेव्हा त्याला कळालं की त्याची दोन्ही मुलं स्वतःला वाचवत केन्याला‌ पोहचली आहे तेव्हा तो जिनीव्हा येथून लंडनला आला आणि हॅरॉल्ड इव्हान्स यांची भेट घेतली.

द संडे टाईम्सच्या बातमीने खळबळ माजली. इदी अमीनच्या सरकारच्या एका मंत्र्यांनीच सांगितलेल्या या बातमीत अत्याचाराच्या अनेक गोष्टी होत्या. ब्रिटिश पंतप्रधानांनी लगेच इदी अमीनचा निषेध केला. युगान्डाशी असलेले राजकीय संबंध देखील ब्रिटनने तोडले. अमेरिकेचा संयुक्त राष्ट्रातील राजदूत एन्ड्रयु यंगने अतिशय आक्रमक भाषणात इदी अमीनचा निषेध केला. १९७९ मध्ये क्रूर इदी अमीनला सत्ता सोडावी लागली.

अधिक खप असलेल्या वर्तमानपत्रात न जाता हेनरी द संडे टाईम्समध्ये गेला त्याला कारण होतं हेरॉल्ड इव्हान्सची विश्वसनीयता. त्यांनी हेनरीला ऐकून लगेच आपल्या इसेक्स येथील घरी एका वरिष्ठ पत्रकारासोबत त्यांना पाठवलं. शेवटी तुमची विश्वसनीयता असेल तर बातमी येते. नंतर हॅरॉल्ड आणि त्याची पत्नी टीना ब्राऊन अमेरिकेत स्थायिक झालेले.

Updated : 27 Sep 2020 4:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top