धक्कादायक! पुण्यात आरोग्य निरिक्षकांडूनच कोरोना पसरण्याची भीती

22

पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याचाच एक भाग म्हणून संपूर्ण पुणे शहरात सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये येरवडा विभागात काम करणारे आरोग्य निरीक्षकास व बिबवेवाडी परिसरात काम करणाऱ्या मुकादम अशा दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

मात्र, त्यांच्या बरोबर सर्व्हेक्षणाचे काम करणारे शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांना अजुनही क्वारंटाइन करण्यात आलेले नाही. सर्व्हेक्षण करणारे शिक्षक दररोज किमान १०० कुटुंबांना भेटी देऊन त्यांची माहिती गोळा करण्याचे काम करीत आहेत. हे शिक्षक परिसरात असल्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन कर्मचाऱ्यांना लागण झाल्यानंतर यातील काही शिक्षकांनी स्वखर्चातून कोरोना टेस्ट करुन घेतली आहे.

अपंग कर्मचारी, गरोदर तसेच स्तनदा मातांनाही ऑर्डर:

कोरोना काम करण्यासाठी शहरात स्टाफ अपुरा पडत असून यामध्ये अपंग कर्मचारी, गरोदर महिला, त्याचबरोबर स्तनदा माता, ब्लड प्रेशर, शुगर त्याचबरोबर बायपास झालेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनाची कामे देण्यात आली आहेत.

महिनाभर सर्व्हेक्षण करतोय तोच स्टाफ…

पुणे शहरात कोरोना रुग्ण आढळल्यापासून सर्व्हेक्षण करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. सुरुवात झाल्यापासून सतत तोच स्टाफ सर्व्हेक्षण करत आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्यास तो कोरोना पसरविण्याचे काम करणार आहे. यामध्ये शंकेला जागाच नाही. रस्त्यावर काम करणारे पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.

सुरक्षात्मक साधनांचा अभाव

शहरात सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी पुरेशी साधनेच नाहीत. अशा परिस्थितीत सुद्धा कर्मचारी सर्व्हेक्षण करीत आहेत. प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना फक्त साधा मास्क व सॅनिटायझर दिले जात आहे.

सॅनिटायझर हे पाच दिवसातून एकवेळ ५० मिली दिले जात आहे. ज्या कुटुंबात कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्या ठिकाणी जाऊन हे कर्मचारी सर्व्हेक्षण करीत आहेत. अशा वेळी त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा सुरक्षेची सर्व साधने पुरविली जाणे गरजेचे आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष:

पुणे महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे अनेक मागण्या केल्या आहेत. त्या मागण्यांकडे प्रशासन दूर्लक्ष करीत आहे.

या संदर्भात अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याशी बातचित केली असता, त्यांनी एका आरोग्य निरिक्षकास कोरोना ची लागण झाल्याचं मान्य केलं. मात्र, त्यांच्या सोबत जे इतर कर्मचारी होते. त्यांची देखील तात्काळ आम्ही टेस्ट केली आहे. शासनाच्या गाइडलाईन प्रमाणे त्यांची तात्काळ टेस्ट करण्यात आली आहे. तसंच त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे लो रिस्क किंवा हाय रिस्क अशी लक्षण आढळली नाहीत. असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळं आम्ही सर्व कर्मचाऱ्यांची काळजी घेत आहोत. त्यांची अजून एकदा टेस्ट केली जाणार आहे.

मात्र, या कर्मचाऱ्यांसोबत काम करणाऱ्या व्यक्तींना कोरोना ची लागण झाल्यानंतर त्यांना क्वारंटाईन का केले नाही? असा प्रश्न विचारला असता. हे लोक त्यांच्यासोबत काम करत होते. ते त्यांच्या सोबत राहत नव्हते. जेव्हा हे एकमेकांसोबत काम करत होते. त्यांनी सर्वांनी मास्कचा वापर केला होता. त्यातच यांच्यामध्ये कुठलीही लक्षण आढळलेली नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच पुढील कारवाई करण्यात आली असल्याचं अग्रवाल यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितलं आहे.

Comments