Home > News Update > "काँग्रेस म्हणजे कुरकुरणारी जुनी खाट" शिवसेनेचे सामनामधून चिमटे

"काँग्रेस म्हणजे कुरकुरणारी जुनी खाट" शिवसेनेचे सामनामधून चिमटे

काँग्रेस म्हणजे कुरकुरणारी जुनी खाट शिवसेनेचे सामनामधून चिमटे
X

राज्यातील महाविकास आघाडीतील सरकारमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेसला निर्णय प्रक्रियेत घेतले जात नाही अशी खंत राहुल गांधी यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसचे दोन ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनीही जरा आमचेही ऐका, असे म्हटल्याने महाविकास आघाडीत कुरबुरी असल्याचे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनमधून कबूल करण्यात आले आहे. पण त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांना चिमटे काढत राष्ट्रवादी काँग्रेस जसे सहकार्य करत आहे तसे काँग्रेस करत नसल्याची टीका केली आहे. पण असे असले तरी सरकारला धोका नसल्याचाही दावा करण्यात आला आहे.

या अग्रलेखात काय म्हटले आहे ते पाहूया

सरकार तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन बनवले. त्या सरकारचे सुकाणू एकमताने उद्धव ठाकरे यांच्या हाती दिले. राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचाच निर्णय अंतिम राहील हे एकदा ठरल्यावर कोणताही प्रश्न उद्भवत नाही. स्वत: शरद पवार यांनी हे पथ्य पाळले आहे. ते मुख्यमंत्र्यांना अधूनमधून भेटत असतात. त्यांचा अनुभव मोठा. त्यानुसार राज्यासंदर्भात ते काही सूचना करतात. काँग्रेस पक्षाचेही बरे सुरू आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. आघाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठेवली पाहिजे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे कुरकुरणेही तसे संयमी असते. घरात भावाभावांची भांडणे होतात. इथे तर तीन पक्षांचे सरकार आहे. थोडेफार कुरकुरणे होणारच. ‘मुख्यमंत्र्यांना भेटून काय ते बोलू,’ असे थोरातांनी सांगितले. त्याच खाटेवर बसलेल्या अशोक चव्हाण यांनीही ‘इंडियन एक्सप्रेस’ला एक जोरदार मुलाखत दिली व तितक्याच संयमाने कुरकुरत सांगितले की, ‘‘सरकारला अजिबात धोका नाही, पण सरकारमध्ये जरा आमचेही ऐका. प्रशासनातील अधिकारी म्हणजे नोकरशाही वाद निर्माण करीत आहे. आम्ही काय ते मुख्यमंत्र्यांशीच बोलू!’’

समजते की, कुरकुरत्या खाटेवरचे हे दोन मंत्रीमहोदय मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांचे म्हणणे मांडणार आहेत. मुख्यमंत्री त्यांचे म्हणणे ऐकतील व निर्णय घेतील, पण काँग्रेसचे नेमके म्हणणे काय आहे? राजकारणातील ही जुनी खाट महाराष्ट्रात कुरकुरू का लागली आहे? आमचे ऐका म्हणजे काय? यावरही आता झोत पडला आहे. थोरात व चव्हाण हे काँग्रेसचे अनुभवी नेते आहेत व त्यांना सरकार चालविण्याचा दांडगा अनुभव आहे. मात्र त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, असा दांडगा अनुभव श्री. शरद पवार व त्यांच्या पक्षाच्या लोकांपाशीही आहे. तथापि कुरकुर व कुरबुर होताना दिसत नाही. प्रशासनातील काही अधिकारी कारभारी असल्यासारखे वागतात व काँग्रेस नेत्यांशी नीट वागत नाहीत, अशी तक्रार काँग्रेसवाले करीत असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. मुख्य सचिव अजोय मेहता व नागपूरचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविषयी तक्रारीच सुरू आहेत, पण शेवटी अधिकारी कितीही ‘बडा’ असला तरी तो सरकारचा नोकर म्हणून मुख्यमंत्र्यांचेच आदेश पाळतो. मुख्य सचिवांना वारंवार मुदतवाढ मिळत आहे. त्यामुळे प्रशासनातील इतर अधिकार्‍यांत अस्वस्थता आहे, अशी एक तक्रार आहे. यावर चर्चा होऊ शकते, पण प्रशासनाकडून एखादे बेकायदेशीर किंवा नियमबाह्य काम झाल्याची तक्रार नाही. किंबहुना, कोविडच्या संकटात संपूर्ण प्रशासन झुंज देताना दिसत आहे. तरीही चव्हाण-थोरातांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनी ऐकून घ्यायलाच हवे. कारण सरकारचा तिसरा पाय काँग्रेसचा आहे.

बदल्या, बढत्या, आम्हाला हाच सचिव पाहिजे, हा नको हा तर सरकारातला निरंतर चालणारा डाव आहे. या डावात पत्ते पिसणे कधीच थांबत नाही. त्यामुळे सरकारला धोका होईल व राज भवनाचे दरवाजे कुणासाठी पहाटे पुन्हा उघडले जातील या भ्रमात कोणी राहू नये. काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाप लोभ श्री. उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कोणी चिंता करू नये, इतकेच शेवटी सांगायचे!

Updated : 16 Jun 2020 4:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top