मुस्लीम आरक्षणावरून शिवसेनेचा ‘यू-टर्न?’

Courtesy : Social Media

राज्य सरकार मुस्लिमांना शैक्षणिक संस्थांमध्ये ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेणार असून लवकरच या संदर्भातील अध्यादेश काढणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी २८ फेब्रुवारीला दिली. त्यावरून आता राजकारण तापायला लागलंय. या निर्णयावरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

महाराष्ट्र सरकार मुस्लिमांना धर्माधारित आरक्षण देणार असल्याची माहिती चिंताजनक आहे. शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकारने मुस्लीमांच्या मुद्द्यावरून राजकारण करायला नको, ही हिंदूंची आपेक्षा आहे असं विश्व हिंदू परिषदेचे महासचिव मिलींद परांडे यांनी म्हटलं. त्याबाबतचं ट्विट विहिंपकडून करण्यात आलं. त्याला उत्तर देताना शिवसेना माध्यम विभागाने, असा कोणताही विषय चर्चेला आला नसल्याचं सांगितलंय. त्यामुळे मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं यू-टर्न मारला का असा प्रश्न उपस्थित होतोय.


विश्व हिंदू परिषदेने मुस्लिमांच्या ५ टक्के आरक्षणाला कडाडून विरोध केला आहे. धर्माच्या आधारावर ठाकरे सरकारने आरक्षण देऊ नये, जर आरक्षण दिल्यास आंदोलन करु, असा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिलाय. हिंदुत्ववादी शिवसेना मुस्लिम आरक्षणाचा विचार करते हे दुर्भाग्यपूर्ण आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीचा असर व्हायला लागला आहे. जर राज्यात मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण दिलं, तर विश्व हिंदू परिषद आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.