Home > News Update > पावसाने ब्रेक घेतल्याने भातशेती संकटात

पावसाने ब्रेक घेतल्याने भातशेती संकटात

पावसाने ब्रेक घेतल्याने भातशेती संकटात
X

पालघर (Palghar) जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली असली तरी हा पाऊस शेतीच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी पुरेसा नाही. जिल्ह्यात साधारणपणे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सलग पाऊस पडतो. पण यंदा पावसाने अधून मधून ब्रेक घेण्यास सुरुवात केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरीवर्ग धास्तावला आहे. पालघर जिल्ह्यातील भातशेती ही प्रामुख्याने पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे.

त्यामुळे शेतकरी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असतो. यंदा संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली व लावणीच्या कामांना चांगलाच वेग आला. लावणीची कामे ७० टक्के पूर्ण झाली असून येत्या दोन ते तीन आठवड्यात सलग पाऊस झाल्यास उर्वरित कामेही पूर्ण होतील,असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.यंदा पावसाने साथ दिली तर जिल्ह्यात भाताचे पीक बऱ्यापैकी हाती लागेल,अशी अपेक्षा ग्रामीण भागात व्यक्त होत आहे.

पालघर जिल्हा हा भाताचे कोठार असून वाडा तालुक्यातील वाडा कोलम तांदळाने जिल्ह्याला जगाच्या नकाशावर नेले आहे. पण गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण सतत कमी होत गेले व भातपीकावर त्याचा चांगला परिणाम जाणवला. शेतीसिंचनासाठी अन्य कोणतेही पर्याय नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी अडचणीत येत असतात. पण त्यावर आजवर एकाही सरकारने उपाययोजना केली नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील भातपीकाचे क्षेत्र कमी होत जाईल,अशी भीती सर्वत्र व्यक्त होत आहे.

Updated : 25 July 2020 10:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top