Home > News Update > एच एम टी वाण शोधणारा संशोधक मेल्यावरही उपेक्षितच

एच एम टी वाण शोधणारा संशोधक मेल्यावरही उपेक्षितच

एच एम टी वाण शोधणारा संशोधक मेल्यावरही उपेक्षितच
X

अनेकांना पद्मश्री मिळाल्याच्या बातम्या ऐकताना सातत्याने दादाजी खोब्रागडे डोळ्यासमोर येतात. दादाजी खोब्रागडे गडचिरोलीतील शोधग्राम मध्ये त्यांनी ३ जून २०१८ ला शेवटचा श्वास घेतला होता. एका कृषी संशोधकाचा शेवट शोधग्राम मध्ये झाला.

दादाजी खोब्रागडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत तांदळाचे तब्बल नऊ वाण शोधून काढले. ते आपल्या तीन एकर शेतीत सातत्याने तांदूळ पिकावर संशोधन करत गेले. मोठ मोठ्या विद्यापीठात सो कॉल्ड एक्स्पर्ट ना जे जमले नाही. ते त्यांनी करून दाखवले. पंजाबराव विद्यापीठाने त्यांनी शोधलेले तांदळाचे वाण चोरल्याचा आरोप देखील झाला. त्यात तथ्य असल्याचे पुन्हा समोर आले.

एच एम टी ही संपूर्ण भारतभर पोहोचलेली तांदळाची जात त्यांनी शोधली. हा तांदूळ मार्केट मध्ये नेल्यावर व्यापाऱ्याने याचे नाव विचारले. दादाजींनी याबाबत विचार केलेला नव्हता. त्यांनी एच एम टी घड्याळ पाहिलं आणि तांदळाचे नाव एच एम टी पडले. हा तांदूळ घराघरात पोहोचला आहे. या बियाण्यामुळे अनेक शेतकरी आणि व्यापारी श्रीमंत झाले.

मात्र, दादाजींचं आयुष्य अधिकाधिक खडतर होत गेले. त्यांचे नाव फोर्ब्स यादीत आल्यानंतर ते उजेडात आले. महाराष्ट्र सरकारने कृषी भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते. आणि दुसरीकडे मुलाच्या आजारपणासाठी त्यांना तीन एकर जमीन विकावी लागली. आणि संशोधन काम पूर्ण थांबले.

सुनेच्या वडिलांनी पुन्हा त्यांना शेती दिली व त्यामध्ये प्रयोग करून त्यांनी पुढील संशोधन केले. तांदळाचे संशोधन करणाऱ्या या अवलियावर आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे सुवर्ण पदक विकायची वेळ आली. बाजारात गेल्यावर ते नकली असल्याचे समजले. सरकारने पुन्हा ते बदलून दिले. त्यांचे शेवटचे आयुष्य अतिशय हलाखीत गेले.

अगदी उपचारासाठी पैसे मिळाले नाहीत. दादाजी उपचारासाठी तडफडत राहिले. गंभीर आजारी झाल्यावर डॉ अभय बंग यांनी पुढाकार घेऊन त्यांच्यावर शोधग्रामला उपचार सुरू केले. पण फार उशीर झाला होता. दादाजी गेले.

भारत एका मोठ्या संशोधकाला मुकला. त्यांनी या देशासाठी इतकं मोठं काम केलं. पण आपण त्यांना काय दिलं? दारिद्र्य दुःख. त्यांच्याकडे अगोदरच लक्ष दिले असते तर ते अजूनही जगले असते.

आज तांदूळ पाहिलं की, तांबूस रंगाचा चष्मा घातलेले दादाजी दिसतात. या माणसाची जिवंतपणी उपेक्षा झाली. ती झाली आणि मेल्यावरही होतेय. दादाजींच्या नावाने कृषी विद्यापीठ काढून सरकारने आता तरी त्यांचा सन्मान करायला हवा.

विदर्भातील हा अस्सल हिरा त्यांचे अध्यासन वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये सुरू व्हायला पाहिजे. दादाजींच्या कुटुंबियांना सरकारने आता तरी मदत करून त्यांचे जीवन सुसह्य करायला पाहिजे. त्यांच्या संशोधनाचा इतिहास पाठ्यक्रम मध्ये समाविष्ट करायला हवा. भारतीय समाजाने त्यांना विसरण्या अगोदर सरकारने अशा प्रकारे त्यांचा सन्मान करावा. अशी मागणी आता केली जात आहे.

Updated : 9 Jun 2020 9:02 AM GMT
Next Story
Share it
Top