Home > News Update > दिल्लीचं तख्त रिकामं राहिलं तर काय फरक पडतो? : रवींद्र आंबेकर

दिल्लीचं तख्त रिकामं राहिलं तर काय फरक पडतो? : रवींद्र आंबेकर

दिल्लीचं तख्त रिकामं राहिलं तर काय फरक पडतो? : रवींद्र आंबेकर
X

मला वाटतं जीडीपी (GDP) वर फार चर्चा करण्यात तज्ज्ञांनी वेळ घालवू नये. त्यापेक्षा तितका वेळ एखादा अभ्यासगट स्थापन करून थेट लोकांमध्ये जावं. राहुल गांधींनी (rahul gandhi) उगीच मोदींना (Modi) अर्थशिक्षण देऊ नये. त्यापेक्षा कन्याकुमारी ते कश्मिर अशी यात्रा काढावी. तीन वर्षे देश समजून घ्यावा. या देशाला फार बौद्धीक गोष्टी समजत नाहीत, हा भावनांवर चालणारा देश आहे. तसं नसतं तर इतक्या चुका करूनही इतकी वर्षे काँग्रेसला या देशाने मतं दिली नसती.

काँग्रेस (congress) इथल्या लोकांशी भावनिकरित्या जोडला गेला होता तोपर्यंत सत्तेत होता. काँग्रेसका हाथ गरीबोंके साथ अशी डिस्कनेक्ट होणारी घोषणा आणि अच्छे दिन आने वाले हैं अशी मास कनेक्ट असलेली घोषणा, यातला सूक्ष्म अर्थ समजून घेतला पाहिजे. घरात नाही दाणा, मला बाजीराव म्हणा अशी गत इथल्या गरीब वर्गाची आहे. शहरी गरीबांमध्ये आपण मध्यमवर्ग झाल्याची भावना आहे. हा मध्यमवर्ग स्वतःला गरीब या संज्ञेशी जोडून घेऊ इच्छित नाही.

झोपडपट्टीतून झोपड़पट्टी पुनर्विकास योजनेच्या घरात पहिलं पाऊल टाकतो तोच मुळी मध्यमवर्ग म्हणून. अशा वेळी काँग्रेसला नवीन नॅरेटीव्ह शोधावं लागणार आहे. न्याय किंवा तत्सम योजना जरी जिवनोपयोगी असल्या तरी त्याचं ट्रॅक्शन मतदारांना नाही. त्यांना त्यांच्या आशा-आकांक्षांच्या व्यवहाराला फुंकर घालणारा जादूगार हवा आहे. काँग्रेस सध्या अशी जादू करण्यात असमर्थ आहे.

गांधी घराण्याची सोपी प्रश्नपत्रिका सातत्याने नरेंद्र मोदींच्या समोर असल्याने मोदी सातत्याने सर्व आघाड्यांवर अपयशी ठरूनही सुखेनैव राज्य करत आहेत. राहुल गांधी मध्ये-मध्ये चांगले मु्द्दे मांडतात, पण त्यात सातत्य नाही, त्याचबरोबर त्यांना ग्राऊंड लेव्हल वर कार्यकर्त्यांचं पाठबळ नाही. अशा वेळी जीडीपी किंवा इतर विषयांवर गंभीर आकडेवारी युक्त चर्चा करण्याएवजी त्यांनी रस्त्यावर उतरावं. तीन वर्षे भारत फिरावा, आणि त्यानंतरच दिल्लीला परत जावं. तीन वर्षे काँग्रेसचं तख्त रिकामं राहिलं तरी काही फरक पडत नाही.

घसरलेला जीडीपी मोदी जादूगाराप्रमाणे सावरतील, कोरोना मुळे जीडीपी कोसळला त्याला मोदी एकटे काय करणार असं नॅरेटीव्ह आधीच लिहिलं गेलं आहे. त्याला प्रत्युत्तर देण्याची ताकद सध्या विरोधी पक्षात नाही. जो पक्ष आपलं घसरतं संघटन वाचवू शकत नाही तो पक्ष जीडीपी काय वाचवणार, असा ही लोकांमध्ये समज पक्का झालेला आहे. त्यामुळे आता अतिचर्चा करण्याएवजी लोकांच्या दरबारात हा विषय नेणेच योग्य ठरेल.

Updated : 2 Sep 2020 7:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top