Top
Home > News Update > राफेल विमान खरेदी : कॅगच्या ठपक्यामुळे मोदी सरकारची कोंडी

राफेल विमान खरेदी : कॅगच्या ठपक्यामुळे मोदी सरकारची कोंडी

राफेल विमान खरेदी : कॅगच्या ठपक्यामुळे मोदी सरकारची कोंडी
X

भारताची हवाई ताकद वाढवणाऱ्या राफेल विमानांची पहिली तुकडी काही दिवसांपूर्वी सेवेत दाखल झाली. त्यामुळे देशाची संरक्षण सिद्धता वाढली आहे. पण आता मोदी सरकारच्या राफेल विमान खरेदीच्या व्यवहारावर कॅगने ठपका ठेवल्याने मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहेत.

३६ राफेल विमानांच्या व्यवहाराच्या ऑफसेट कंत्राटानुसार विमान विक्रेता दसॉल्ट एव्हिएशन कंपनी डीआरडिओला तंत्रज्ञान हस्तांतरीत करणार होती. म्हणजे ३० टक्के ऑफसेट पूर्ण होईल असं कॅगच्या अहवालात म्हटलेले आहे. पण तंत्रज्ञान हस्तांतरीत झाले आहे की नाही याची पुष्टी झालेली नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. डीआरडीओला हे तंत्रज्ञान स्वदेशी तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टचं इंजिन विकसित करण्यासाठी लागणार आहे.

दसॉल्ट एव्हिएशन कंपनीने राफेलची निर्मिती केली असली तरी त्यातील मिसाईल सिस्टम ‘एमबीडीए’नं बसवली आहे, अशी कोणतीही माहिती सापडलेली नाही. त्यामुळे परदेशी विक्रेता भारतात मोठं तंत्रज्ञान हस्तांतरीत करत असेल, असं या माहितीवरुन वाटत नाही असंही संसदेत सादर केलेल्या अहवालात कॅगनं म्हटलं आहे.

ऑफसेट नियमानुसार कोणत्याही परकीय कंपनीला कराराच्या ३० टक्के निधी भारतात संशोधन किंवा उपकरणांवर खर्च करावा लागतो. यासाठी तंत्रज्ञानाचं मोफत हस्तांतरण किंवा भारताकडील उत्पादनांचीही खरेदी करता येते. पण राफेलबाबत तसे झालेले नाही असे कॅगने म्हटलेले आहे.

थेट विक्रेता, भारतीय कंपनीला विनामूल्य तंत्रज्ञान हस्तांतरित करून किंवा भारतात बनवलेल्या वस्तू खरेदी करून विक्रेता कंपनी ही ऑफसेट जबाबदारी पूर्ण करू शकतो. ऑफसेट म्हणजेच कराराची काही रक्कम परतफेड केली जाईल किंवा भारतातच समायोजित केली जाईल. लेखा परीक्षकांनी नमूद केले की विक्रेते त्यांची ऑफसेट वचनबद्धता पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले तरी त्यांना दंड ठोठावण्याचा कोणताही प्रभावी मार्ग नाही. जर विक्रेता ऑफसेट जबाबदाऱ्या पूर्ण करत नसेल, विशेषत: जेव्हा मुख्य खरेदीच्या कराराचा कालावधी पूर्ण होतो, अशात विक्रेत्याला थेट नफा होत असल्याचंही कॅगनं म्हटलं आहे.

अनेक परदेशी कंपन्या मोठे कंत्राट मिळवण्यासाठी ऑफसेटमध्ये मोठमोठी आश्वासने देतात, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही, असे अनेकवेळा घडते असा ठपका ठेवत कॅगने राफेलचे उदाहरण दिले आहे.

Updated : 24 Sep 2020 6:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top