Home > News Update > सरपंचांनी ग्रामसभेतून काढला पळ; संतप्त गावकरी बसले उपोषणावर

सरपंचांनी ग्रामसभेतून काढला पळ; संतप्त गावकरी बसले उपोषणावर

सरपंचांनी ग्रामसभेतून काढला पळ; संतप्त गावकरी बसले उपोषणावर
X

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात अडुळसे ग्रामपंचायतीची ग्रामसभा वादळी ठरली असल्याचं समोर आलं आहे. ग्रामसभेला रंग चढला, ग्रामस्थांनी एकामागून एक विकासाचे मुद्दे व विषय हाताळले. अशातच ग्रामसभा सुरू असताना अडुळसे ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसभेचे अध्यक्ष भाऊ मालू कोकरे यांनी ग्रामसभा समाप्त झाली असल्याचे लगबगीने सांगत ग्रामपंचायतीतून निघून गेले. यावेळी विकास कामावरील चर्चा खोळंबली असल्याचा संताप व्यक्त करीत ग्रामसभेला उपस्थित नागरिकांनी सरपंचाच्या या कृतीवर नाराजी दर्शवित ग्रामपंचायत कार्यालयात आमरण उपोषण सुरू केले. याबाबत पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना तक्रारी निवेदन दिले.

गावकऱ्यांनी पाली तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अडुळसे सरपंच भर सभेतून निघून गेल्याने गावाच्या विकासाबाबत घेतले जाणारे महत्वाचे ठराव घेता आले नाहीत. याबरोबरच सन 2017 पासून 14 वित्त आयोगातून खर्च करण्यात आलेल्या निधीत अनियमितता, भ्रष्टाचार झाला असल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केलाय. सरपंचांच्या मनमानी कारभाराबाबत सखोल चौकशी करण्यात यावी. सन 2017 पासून खर्च करण्यात आलेला निधी कोणत्याही प्रसिद्धी पत्रकाशिवाय व कोणत्याही सभेच्या मान्यतेशिवाय सरपंच यांचे कुटुंब व मर्जीतील व्यक्तींना ठेका देऊन निधीचा अपहार करण्यात आला असल्याचा आरोप गावकरी करतायत. जनसुविधामार्फत झालेल्या कामातही भ्रष्टाचार झाला असून पूर्ण निधी खर्च झाला नाही. त्यामुळे ही कामे ई-टेंडरिंग पद्धतीने आणि सक्षम ठेकेदारांकडून करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण थांबणार नाही असा इशारा ग्रावकऱ्यांनी दिला आहे.

“ग्रामस्थांनी भ्रष्टाचाराचे केलेले आरोप हे केवळ राजकीय आकसापोटी व सूडबुद्धीने केलेले आहेत. यात काही एक तथ्य नाही. आजपर्यंत झालेल्या सर्व मासिक सभा, ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या आहेत. आजच्या ग्रामसभेत अजेंड्यावर असलेले विषय संपले होते. याव्यतिरिक्त गावाच्या हिताचे विषय मी चर्चेत घेतले. आयत्या वेळचे विषय ग्रामसभेत घ्यायचे असतील तर दोन ते तीन दिवस आधी लेखी देणे गरजेचे होते. अजेंड्यावरील विषय संपल्यानंतर ग्रामसभा समाप्त झाल्याचे जाहीर करून मी निघून गेलो.” असं स्पष्टीकरण सरपंच भाऊ कोकरे यांनी दिलं आहे.

Updated : 11 Feb 2020 2:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top