Home > News Update > उत्तर प्रदेश पोलिसांनी खरंच प्रियंका गांधींचा गळा पकडला का?

उत्तर प्रदेश पोलिसांनी खरंच प्रियंका गांधींचा गळा पकडला का?

उत्तर प्रदेश पोलिसांनी खरंच प्रियंका गांधींचा गळा पकडला का?
X

सध्या देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. सर्वसामान्य जनतेसोबतच साहित्यिक, कलाकार, माजी अधिकारी यांनी देखील या कायद्याचा विरोध केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये या कायद्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. माजी पोलीस अधिकारी एस. आर. दारापुरी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध केला म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे.

या माजी पोलिस अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची कॉंग्रेस (Congress) नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी भेट घेण्याचा नुकताच प्रयत्न केला. त्यांच्या निवासस्थानी जाताना त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना वाटेतच अडवलं यावेळी पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केल्याचा दावा प्रियंका गांधी यांनी केला आहे.

प्रियंका गांधी यांनी या संदर्भात फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. काय म्हटलंय प्रियंका गांधी यांनी?

"उत्तर प्रदेश पोलिसांचं हे काय सुरूय? आता आम्हाला कुठेही येण्या-जाण्यापासून रोखलं जातंय. निवृत्त पोलीस अधिकारी आणि आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते एस. आर. दारापुरी यांच्या निवासस्थानी जात होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना NRC आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला शांततेनं विरोध केल्यानं घरातून उचलून नेलं."

"बळाचा वापर करून मला रोखण्यात आलं आणि महिला पोलीस अधिकाऱ्यानं माझ्या गळ्याला पकडून खेचलं. मात्र माझं ध्येय निश्चित आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या दडपशाहीला बळी पडलेल्या प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी मी उभी आहे. हा माझा सत्याग्रह आहे," असं प्रियंका गांधी यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर म्हटलं आहे.

तर पोलिसांनी प्रियंका गांधी यांच्या गळ्याला धरुन आपण खेचलं नसल्याचं म्हटलं आहे. या संदर्भात उत्तर प्रदेश पोलिसांनी एक पत्र जाहीर केलं आहे. या पत्रात "प्रियंका गांधी यांच्या सुरक्षेची दखल घेत त्यांचा ताफा रोखण्यात आला आणि पुढील मार्गांची सविस्तर माहिती मागण्यात आली. मात्र, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याची माहिती दिली नाही. शिवाय, सोशल मीडियावरून धक्काबुक्कीच्या ज्या गोष्टी पसरवल्या जातायत, त्या पूर्णपणे असत्य आहेत," असं या पत्रात म्हटलं आहे.

विभागीय अधिकारी डॉ. अर्चना सिंह यांनी हे पत्र लिहिलं असून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा लखनऊ दौरा होता. मात्र, प्रियंका गांधी यांनी आपला नियोजित मार्ग बदलला, त्यामुळं, दुसऱ्या रस्त्यानं असताना त्यांना रोखण्यात आल्याचं या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान प्रियंका गांधी यांच्या या दाव्यानंतर उत्तरप्रदेश मध्ये कॉंग्रेस आक्रमक झाली आहे.

Updated : 29 Dec 2019 7:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top