वांद्रे इथल्या घटनेप्रकरणी अटक केलेल्या दुबेच्या कोठडीत वाढ

लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आल्यानंतर मुंबईतील वांद्रे इथं १८ एप्रिल रोजी स्टेशनबाहेर मोठ्या प्रमाणात जमाव एकत्र आला होता. लॉकडाऊनचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम धाब्यावर बसवून हे लोक एकत्र आले होते. या लोकांना आपल्या सोशल मीडियातील प्रक्षोक्षक पोस्टद्वारे एकत्र आणल्याप्रकरणी पोलिसांनी विनय दुबे या स्वयंघोषित उत्तर भारतीय नेत्याला अटक केली होती.

त्यानंतर दुबेला कोर्टानं २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. आता कोर्टानं दुबेच्या पोलीस कोठीत २८ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. वांद्रे स्टेशनबाहेर जमलेले लोक हे प्रामुख्याने परप्रांतिय स्थलांतरीत होते आणि आपापल्या राज्यात जाण्यासाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्यात यावी अशी त्यांची मागणी होती.

१४ एप्रिलला लॉकडाऊन संपल्यानंतर पंतप्रधान मोदी रेल्वेबद्दल काहीतरी घोषणा करतील अशी अपेक्षा या लोकांना होती. दरम्यान लॉकडाऊनमुळे अडकलेल्या सर्व परप्रांतिय लोकांना त्यांच्या राज्यात जाऊ द्यावे यासाठी दुबे याने लॉकडाऊनच्या काळात आंदोलनाचा इशारासुद्धा दिला होता.