Home > News Update > मीडिया विकला गेला आहे का?

मीडिया विकला गेला आहे का?

मीडिया विकला गेला आहे का?
X

प्रसारमाध्यमांवर पक्षपातीपणा करण्याचा आरोप गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे. त्याचबरोबर केंद्रातील मोदी सरकारच्या दबावामुळे अनेक प्रसारमाध्यमे वास्तव लोकांपुढे मांडत नाहीये असाही आरोप होत आहे. असाच गंभीर आरोप पी एम केअर फंडावरून माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलेला आहे.

"पंतप्रधान कार्यालयातर्फे पी एम केअर फंडातून खरेदी करण्यात आलेल्या व्हेंटिलेटरच्‍या घोटाळ्याबाबत प्रसारमाध्यमांनी चकार शब्दही काढू नये असे आदेश सरकारने दिल्याची दिल्याची माहिती सूत्रांनी आपल्याला दिली आहे" असं साकेत गोखले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

साकेत गोखले यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने PTI च्या हवाल्याने दिलेल्या एका बातमीचे उदाहरण दिले आहे. काँग्रेसने व्हेंटिलेटर आणि पी एम केअर फंडाचा गैरवापर यासंदर्भात घेतलेल्या एका पत्रकार परिषदे संदर्भातली ही बातमी आहे.

पत्रकार परिषदेतील खरी बातमी ही पीएम केअर फंडाचा गैरवापर होत असून त्या माध्यमातून निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर खरेदी केला गेल्याचा आरोप काँग्रेसने केल्याची आहे. त्याचबरोबर जून महिन्याच्या अखेरपर्यंत 60 हजार व्हेंटिलेटर उपलब्ध होतील अशी माहिती जे पी नड्डा यांनी दिली होती, पण प्रत्यक्षात २२ जूनपर्यंत फक्त तेराशे व्हेंटिलेटर उपलब्ध झाल्याचा आरोप देखील काँग्रेसने या पत्रकार परिषदेत केला. पण या गंभीर आरोपाची मुख्य बातमी न करता ती खाली घेण्यात आलीये. त्याऐवजी "कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक- काँग्रेस" असा मथळा देऊन बातमी करण्यात आली आहे.

याला साकेत गोखले यांनी आक्षेप घेतला आहे. इंडिया टुडे व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही माध्यमाने व्हेंटिलेटर बद्दल चकार शब्द काढलेला नाही, असंही गोखले यांनी म्हटलंय. "माझ्यासह अनेकांनी काही वास्तव गोष्टी बाहेर काढल्या. त्यावर विरोधकांनी देखील आवाज उठवला, पण विरोधक काहीच करत नाही असे ज्यावेळी जनता म्हणते तेव्हा एक लक्षात ठेवा की मीडिया या बातम्या तुमच्यापर्यंत येऊ देत नाहीये. " असंही गोखले म्हणतात.

"सध्या इंटरनेटवर काही स्वतंत्र मीडिया हाऊसेस आहेत, जे सरकारला प्रश्न विचारण्याची हिंमत करत आहेत, पण मुख्य प्रवाहातील मीडिया सरकार विरोधात भूमिका घ्यायला घाबरतोय"

असे देखील साकेत गोखले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे साकेत गोखले यांच्या ट्विटवर आलेल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहूया...

Updated : 6 July 2020 6:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top