लॉकडाऊनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुख्यमंत्र्यांशी संवाद
X
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपणार आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. याआधीही नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याआधी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. आताही देशात दररोज कोरोनाबाधीत रुग्ण वाढत असले तरी सर्व व्यवहार पुन्हा सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
सध्या महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे काही राज्यांमधून लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची मागणीही होऊ शकते. दरम्यान केंद्र सरकारने ज्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे तिथे आपली १० पथकं तैनात केली आहेत. दरम्यान स्थलांतरीत मजुरांसाठी सरकारने विशेष ट्रेन सोडल्यानंतर आता रेल्वे सेवा अंशत: सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यात १५ मार्गांवर रेल्वे सुरू करण्यात येणार असून त्यासाठीचे आरक्षण सोमवारपासून सुरू होणार आहे. एकूणच आजच्या बैठकीत पंतप्रधान मोदी काय बोलणार आणि राज्यांतर्फे काय भूमिका मांडली जाते ते पाहणे महत्त्वाचे आहे.