कोरोनाविरोधातील लढाईत औषधतज्ज्ञ मात्र दुर्लक्षित ! आजपासून औषधविक्रेते फक्त अर्धा दिवस उपलब्ध !

238

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने लाॅकडाऊनचा उपाय शोधला आणि अख्खा देश ठप्प झाला. पण अत्यावश्यक सेवांतील लोक मात्र जीवावर उदार होऊन आपलं कर्तव्य बजावत राहिले. डाॅक्टर्स, नर्स, पोलिस अशा सगळ्यांचंच कौतुक होत असताना एक घटक मात्र दुर्लक्षित राहिला. तो म्हणजे औषधतज्ज्ञ ; अर्थात औषध दुकानचालक.

काल उल्हासनगरात त्यातीलच एकजण कोरोनाबाधीत असल्याचं निष्पन्न झाल्यावर सर्व दुकानचालक सतर्क झाले असून आजपासून केवळ संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच औषध दुकाने खुली ठेवण्याचा निर्णय उल्हासनगर केमिस्ट असोसिएशनने घेतला आहे. एका बाजूला दारूची दुकानं खुलण्याच्या मार्गावर आहेत, तर औषधदुकानं सेवा आटोपशीर घेताहेत.

कोरोनाविरोधातल्या लढाईत आमच्याकडे शासनसंस्थांचं लक्षच नाहीये, असा आरोप उल्हासनगर केमिस्ट असोसिएशनचे सेक्रेटरी मनोज पाटील यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना केला आहे. मनोज पाटील यांचं म्हणणं असं की कोरोनाच्या संकटकाळात अत्यावश्यक सेवांत काम करणाऱ्या सगळ्यांच कौतुक होतंय. ते व्हायलासुद्धा हवं. पण मेडिकल स्टोअर्स चालवणारे लोक दुर्लक्षित का ? आमचा संपर्क हा कोणाही सर्वसामान्य नागरिकांशी येत नसून तो कुठल्या ना कुठल्या कारणाने आजारी माणसांशी देत असतो आणि आजघडीला आजारी माणूस हा कोरोनाची संभाव्य शिकार आहे; तरीही आम्ही अत्यावश्यक वैद्यकीय सेवा म्हणून जोखीम असूनही दुकाने खुलु ठेवून आहोत; परंतु सरकारच्या उपाययोजनांच्या घटकांत आमचा समावेश नाही, याचा मात्र खेद वाटतो.

मनोज पाटील यांनी अशी माहिती दिली की उल्हासनगरात औषधएजन्सी व विक्रेते असे मिळून साडेतीनशेच्या आसपास दुकाने आहेत.या सर्व ठिकाणी मिळून जवळ जवळ एक हजाराच्या आसपास लोक कार्यरत आहेत. ही सगळी मंडळी आपापल्या स्तरावर खबरदारी घेऊन काम करतायेत. आम्ही स्वतः पुढाकार घेऊन सर्व दुकानदारांसाठी शिर्डी मास्क तसेच ग्लोज आणि इतर प्रतिबंधात्मक साधनांची व्यवस्था केली. सरकार मात्र आमच्या बाबतीत उदासीन आहे. परंतु आता आमच्यातीलच एकाला कोरोनिची बाधा झाल्यानंतर आम्हाला स्वतःचा आणि परिवाराचा विचार करणं अपरिहार्य झालं आहे. त्यामुळे फक्त अर्धा दिवस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

लाॅकडाऊनमुळे अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले आहेत; तसेच रुग्णालयांनी सेवा मर्यादित केल्या आहेत. अशावेळी किरकोळ आजारांसाठी लोक औषधविक्रेत्यांवर अवलंबून आहेत. शिवाय विविध आजारांवर सुरू असलेली औषधे मिळवण्यासाठी औषधदुकानांचाच आधार आहे. पण औषधविक्रेते सरकारच्या उदासीनतेवर नाराज आहेत. त्यातच एका औषध दुकानदारास कोरोनाची बाधा झाल्यावर आता इतरही दुकानदार चिंताग्रस्त आहेत. त्यामुळेच दुकाने अर्धा दिवसच चालवण्याचा निर्णय घेण्यात आला असून,, आजपासून आता उल्हासनगरात औषधांसाठीही लोकांची गैरसोय होणार आहे.