Top
Home > News Update > नायर हॉस्पीटलमध्ये अतिदक्षता विभागात रुग्णांवर जमीनीवर उपचार!

नायर हॉस्पीटलमध्ये अतिदक्षता विभागात रुग्णांवर जमीनीवर उपचार!

नायर हॉस्पीटलमध्ये अतिदक्षता विभागात रुग्णांवर जमीनीवर उपचार!
X

मुंबई हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं चौथ्या क्रमांकाचं शहर आहे. या शहरात सुमारे 2.2 कोटी लोक राहतात. त्यामुळं या शहरात नागरी सुविधांचं नियोजन करण्याची पुन्हा एकदा गरज आहे का? असा सवाल आता उपस्थित होतो.

मुंबईमध्ये देशभरातून लोक पोट भरण्यासाठी येतात. हातावरचं पोट असलेल्या लोकांना या मुंबईत राहण्यासाठी घर नसेल तर झोपडपट्टीत राहतात. तर कोणी पुलाखाली, फुटपाथवर आपलं जीवन जगत असतात. मुंबई सर्वाचं पोट भरते असं म्हणतात. मात्र, आरोग्या सारख्या सुविधेचं काय? जेवायला एक वेळ नसेल तर माणूस कसं तरी जगू शकतो. मात्र, कोणी आजारी पडलं तर काय करणार?

हातावर पोट असलेले लोक मुंबईतील मोठ मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेऊ शकतात का? तर निश्चितच नाही. त्यामुळं ते सरकारी दवाखान्यात उपचार घेतात.

मुंबईत आरोग्य सुविधा पुरवण्याचं काम मुंबई महानगरपालिका करते. मुंबई महानगर पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या नायर हॉस्पिटल मध्ये जाऊन आम्ही आरोग्य व्यवस्था जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याच हॉस्पिटल मध्ये सर्वसामान्य लोक उपचार घेण्यासाठी येतात.

हे ही वाचा...

नायर हॉस्पिटलमध्ये आम्हाला अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या. अतिदक्ष (emergency) वॉर्ड मध्ये 40 रुग्णांची उपचार घेण्याची सोय आहे. मात्र, या अतिदक्ष विभागात वॉर्ड क्रमांक 21, 22, आणि 23 वॉर्ड मध्ये 40 पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत असल्याचं दिसून आलं. साधारण पणे एका वॉर्ड मध्ये 80 पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.

त्यामुळे डॉक्टरांना सर्वच रुग्णांकडे हवं तसं लक्ष देता येत नाही. त्यातच हा अतिदक्षता विभाग असल्यानं या विभागात मृत्यू होण्याची संख्या जास्त असल्याचं समोर आलं.

विशेष म्हणजे अतिदक्षता विभागात काही रुग्णांना ऍडमिट करण्यासाठी खाट आहेत. तर काही रुग्णांना खाट खाली ऍडमिट केलं जातं. म्हणजेच त्यांना जमिनीवरच उपचार घ्यावा लागतो.

जे रुग्ण जमिनीवर उपचार घेत असतात, त्यांना खूपच जवळ जवळ उपचार घ्यावा लागतो. त्यामुळे शेजारच्या रुग्णाचा संसर्ग दुसऱ्या रुग्णाला होऊ शकतो. याची भीती कायम आहे. रुग्णांमध्ये ठराविक अंतर असत नाही.

22 नंबर वॉर्ड मध्ये स्त्री - पुरुष एकाच शौचालयाचा वापर करतात. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी या ठिकाणी वेगळं शोचालय नाही. त्यामुळं महिलांची मोठी गैरसोय होते. त्यातच हे शौचालय अत्यंत अस्वच्छ असल्याचं पाहायला मिळालं.

अतिदक्षता विभागात जे रुग्ण उपचार घेत आहेत. त्या वॉर्डमध्ये भीतींना निटसं प्लास्टर देखील नाही. यावरूनच ज्या रुग्णांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. अशा रुग्णांची कशा प्रकारे काळजी घेतली जाते. ते तुमच्या लक्षात आलेच असेल. रुग्णांच्या नातेवाईकांना देखील त्या ठिकाणी आपल्या रुग्णांपर्यँत पोहोचता येत नाही. त्या ठिकाणी जास्त प्रमाणात गर्दी असते.

याबाबत आम्ही अडमिस्ट्रेशन मेडिकल ऑफिसर वंदना तावडे यांना विचारले असता त्यांनी माध्यमांसमोर बोलण्यास नकार दिला, नायर हॉस्पिटल मध्ये वेगवेगळ्या डॉक्टर अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न देखील केला. परंतू आपल्या हास्पिटल मध्ये अशी वाईट परस्थिती आहे याची त्यांना कल्पना देखील नाही, तर काही अधिकाऱ्यांनी अपुरा स्टाफ असल्याचं कारण सांगून आपल्यावरील जबाबदारी झटकून टाकण्याचा प्रयत्न केला.

या सर्व हॉस्पिटलची परिस्थिती पाहिल्यानंतर एक बाब प्रकर्षाने समोर आली ती म्हणजे अपुऱ्या सुविधेबरोबरच मुंबई सारख्या शहराचं कोलमडलेलं नियोजन. महानगरपालिकेला एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या शहराचं नियोजन अद्यापपर्यंत करता आलेलं नाही. कारण डॉक्टर आणि रुग्णांचं प्रमाण, त्याचबरोबर उपलब्ध जागा. या सर्व बाबी कोलमडलेलं नियोजन दर्शवतात.

विशेष बाब म्हणजे हे आज घडत नाही. हे नेहमीचंच असल्याचं इथले रुग्ण सांगतात. मात्र, आमच्याकडं इतका पैसा नाही. की आम्ही बाहेर जाऊन उपचार घेऊ. नाईलाजाने इथं यावं लागतं. असं रुग्ण सांगतात. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ही बाब माहित नाही का? झोपेत असलेल्यांना जागं करता येतं, मात्र, झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागं करता येत नाही.

नायर हॉस्पिटल प्रमाणेच मुंबईतील बहुतांश पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये हीच स्थिती पाहण्यास मिळते. त्यात आरोग्याच्या अर्थसंकल्पामध्ये 15 टक्के वाढ करण्यात आली आहे. ही वाढ कुठं गेली? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतो.

एकदरींत जोपर्यंत गोरगरीब जनतेच्या आरोग्याच्या सुविधेबाबत आपण विचार करत नाही. तोपर्यंत प्रत्येक रुग्णालयात अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेत आणि आता नव्यानं सत्तेत आलेल्या सरकारनं नव्यानं विचार करणं गरजेचं आहे.

Updated : 14 Dec 2019 3:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top