५ वर्षांत ५ लाख घरं; जितेंद्र आव्हाडांची घोषणा

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचं गृहनिर्माण धोरण जाहीर केलं. यावेळी महाराष्ट्रातील गरिबांना घरे कसे मिळतील त्याची मांडणी केली. येत्या ५ वर्षांत ५ लाख घरं बनवण्याचा त्याचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर ठाण्यामध्ये ३० हजार घरं उपलब्ध केली जातील आणि ती रास्त दरात दिली जातील असेही ते म्हणाले.

मुंबईमधल्या मोकळ्या जागा सरकार पुन्हा ताब्यात घेऊन त्यावर गृहनिर्माण योजना राबवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. गरिब आणि मध्यमवर्गीयांना घर देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुंबईतील ज्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहत होते, त्याठिकाणी बाबासाहेबांचे स्मारक तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासंदर्भातील कारवाई सुरू असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.