Home > News Update > कोकण दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या या १९ मागण्या

कोकण दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या या १९ मागण्या

कोकण दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या या १९ मागण्या
X

निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणचा दोन दिवसांचा दौरा केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. हेक्टरी मदतीच्या निकषामध्ये बदल करण्यात यावा, मासेमारांसह शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात यावी, मासेमारांना डिझेलचे परतावे तत्काळ देण्यात यावे, वीज नसल्याने बँकांचे व्यवहार ठप्प असल्याने तातडीची मदत रोखीने देण्यात यावी अशा विविध 19 मागण्या त्यांनी या निवेदनातून केल्या आहेत.

  1. बँकेचे व्यवहार सुरू होत नाही, तोवर रोखीने मदत देण्याची व्यवस्था करण्यात यावी.
  2. शेड/पत्रे इत्यादींचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होतो आहे. ते नागरिकांना तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावेत.
  3. अन्नधान्य हे ओले झाले असल्याने त्याला कोंबं फुटली आहेत. त्यामुळे नागरिकांना रेशनचे धान्य तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे.
  4. नागरिकांना केरोसिन तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे.
  5. नागरिकांची तात्पुरत्या निवार्‍याची चांगली व्यवस्था तत्काळ उभी करण्यात यावी. कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग हे एकमात्र औषध आज उपलब्ध आहे. तात्पुरत्या निवार्‍यांची जागा वाढविण्यात याव्यात. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत लोक राहू शकतील, यासाठीची काळजी घेण्यात यावी. ते राहत असलेल्या ठिकाणी मास्क, सॅनेटायझर, औषधी, भोजन इत्यादींची सुविधा करून द्यावी.
  6. वीज व्यवस्था पूर्ववत करण्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. वीज वितरण व्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यभरातून मनुष्यबळ, सामुग्री आणि कंत्राटदारांची यंत्रणा कोकणात कार्यान्वित करणे, हे फार कठीण काम नाही. ते तत्काळ करण्यात यावे.
  7. मासेमार बांधवांना तातडीच्या मदतीसोबतच डिझेल परतावे तत्काळ दिल्यास त्यांच्या हाती काही पैसे उपलब्ध होतील.
  8. वाड्यांमध्ये नारळ, सुपारी, आंबा इत्यादी झाडं मोठ्या प्रमाणात उन्मळून पडली आहेत. त्यांच्या सफाईसाठी कटर्सची आवश्यकता आहे. वनविभागाचे कर्मचारी व रोजंदारी कामगार यांच्यामार्फत मनरेगाअंतर्गत ही सफाई होऊ शकेल. अर्थात यातून शेतकर्‍यांना सुद्धा मदत मिळेल. बरेच शेतकरी हे अंर्तपीक म्हणून मसाल्याचे पीक घेतात, त्याचाही विचार मदतीच्यावेळी करावा लागेल.
  9. बागायतदारांना 50 हजार रूपये हेक्टरी मदत ही अतिशय कमी आहे. मदतीचे निकष बदलण्यात यावेत. कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती विचारात घेऊन त्यानुसार, मदत देण्यात यावी. शंभर टक्के अनुदानातून फळबाग लागवड योजना या संपूर्ण बाधित भागासाठी सुरू करण्यात यावी.
  10. यंदाची परिस्थिती लक्षात घेता कोकणातील चालू कर्ज माफ करण्यात यावेत तसेच नवीन दीर्घमुदतीचे कर्ज व्याज अनुदानासह कसे देता येतील, याचा विचार करावा. पुढचे 5 ते 10 वर्ष उत्पन्न मिळणे शक्य होणार नाही, ही बाब विचारात घेणे नितांत गरजेचे आहे.
  11. पर्यटन व्यावसायिकांना कर्ज पुनर्बांधणी तसेच अतिरिक्त भांडवल मिळण्यासाठी थकहमीची योजना सरकारने आणावी व त्यांना दिलासा द्यावा.
  12. छोटे स्टॉलधारक यांना कोणतीच मदत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यांचेही अतोनात नुकसान झालेले असल्याने छोट्या स्टॉलधारकांना सुद्धा मदत द्यावी.
  13. घरबांधणीसाठी दिलेले अनुदान दीड लाख रूपये हे अतिशय कमी आहे. ग्रामीण भागात 2.50 लाख रूपये व शहरी भागात 3.50 लाख रूपये अनुदान देण्यात यावे.
  14. मासेमारांच्या बोटींचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना दुरूस्तीसाठी लाख-दीडलाख रूपये खर्च येणार आहे. ताडपत्रीचा खर्च सुद्धा 25 हजार रूपये आहे. त्यामुळे मासेमारांचीही जुनी कर्ज माफ करण्यात यावीत. त्यांना नव्याने भांडवल प्राप्त होईल, यासाठी मदत करावी.
  15. जनावरांच्या चार्‍याचा मोठा प्रश्न तयार झाला आहे. सुका चार्‍याची उपलब्धता करून देण्यात यावी.
  16. शाळा/समाजभवन/वाचनालये असे अनेक सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. त्यांनाही तातडीने मदत करण्यात यावी.
  17. कोकण कृषी विद्यापीठाच्या मदतीने वाड्यांच्या रेस्टोरेशनचे काही मॉडेल्स तयार करण्यात यावेत. यापूर्वी लाखाची बाग ही संकल्पना तयार करण्यात आली होती. त्याच धर्तीवर कृषी विद्यापीठाने पुढाकार घेऊन कलमं पुरविण्यापासून ते पुनरूज्जीवनापर्यंत मदत आणि मार्गदर्शन करण्यात यावे.
  18. केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत मासेमारी आणि फळबाग यासाठी अनेक योजना घोषित केल्या आहेत. त्याचा लाभ प्राधान्यक्रमाने कोकणाला कसा मिळेल, यादृष्टीने तातडीने नियोजन करण्यात यावे.
  19. पेण येथील गणेश मूर्तिकारांच्या सुद्धा समस्या मोठ्या आहेत. त्यांना तातडीने मदत कशी देता येईल, याचा शासनस्तरावर विचार करण्यात यावा.

Updated : 13 Jun 2020 4:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top