Home > News Update > ‘या’ मुलींचा विनयभंग करण्याची कुणाची हिंमत नाही

‘या’ मुलींचा विनयभंग करण्याची कुणाची हिंमत नाही

‘या’ मुलींचा विनयभंग करण्याची कुणाची हिंमत नाही
X

हिंगणघाट मध्ये एका शिक्षिकेला पेटवण्यात आलं. औरंगाबाद मध्येही एक घटना घडली. दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वृत्तपत्रांच्या जागा व्यापत आहेत. टीव्हीवरील डीबेट शो मध्ये महिला सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रात महिला सुरक्षिततेबाबत संतापाची लाट आहे. या सर्व घटनांमुळे मुलींच्या मनात सध्या भीतीनं घर केलं आहे.

मात्र, हे सगळं घडत असताना महाराष्ट्र आणि मुंबईत अशा अनेक जागा आहेत. जिथे महिलांवर अत्याचार काय पण साधं वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिम्मत होत नाही. जर कोणी छेडछाड केली तर त्याची काही खैर नसते. माहूर येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने कोळी आणि आगरी समाज यांच्यातील वेगळी माहिती मला मिळाली.

महाराष्ट्रात होणाऱ्या घटनेसंदर्भात कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील यांच्याशी चर्चा केली. तेव्हा ते म्हणाले ‘आमच्या कोळी समाजात महिला असे अत्याचार कदापी खपवून घेत नाही. इतक्या वर्षात आमच्या महिलांचा कधीही कोणी विनयभंग केला नाही. महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या तीन राज्याच्या किनारपट्टीवर कोळी समाजाची वस्ती आहे. समुद्रात जाळी लावून मासेमारी करण्याचं काम हा कोळी समाज करत आला आहे.

मुंबई सात बेटांची होती. माहीम, कुलाबा, वरळी ज्या ठिकाणी बहुतांश कोळी समाज आहे. कोळी लोकांचं जीवन समुद्रावर चालते. समुद्रातून पकडलेले मासे म्हणजे त्यांचे आयुष्य समुद्र म्हणजे त्यांची शेती. पकडलेले मासे भाऊच्या धक्क्यावर किंवा खुलदाबाद येथे विकायचे आणि त्यातून आपला रोजगार निर्माण करायचा. हा त्यांचा दिनक्रम. कोळी आगरी समाजातील पुरुष मासे पकडण्यासाठी समुद्रात जातात. ते पंधरा-पंधरा दिवस समुद्रात असतात.

त्यामुळे घरी सर्व कामकाज महिलांवर येऊन पडते आणि यातूनच महिलांचं सक्षमीकरण घडत जाते. मासेमारी करण्यासाठी गेलेला पुरुष जोपर्यंत येत नाही. तो पर्यंत तो नाहीच अशी भावना घेऊन महिला कुटूंब चालत असतात. पुरुषाने पकडलेले मासे साफ करणे आणि बाजारात विकणे हा मुख्यतः कोळी महिलांचा व्यवसाय आहे.

प्रत्येक कार्यक्रमांमध्ये महिलांना विशेष मान आहे. असं राजाराम पाटील सांगतात इतकच नाही तर कोळी समाजात लग्नाच्या वेळी महिलांना विशेष मान असतो. एखाद्या घरात लग्न असेल तर लग्नाचा सर्व कारभार महिलेच्या हाती दिला जातो. लग्न मुलाचं असो अथवा मुलीचं त्यांना तयार करण्याची जबाबदारी पुरोहितांऐवजी महिलावरच असते. असं पाटील यांनी सांगितलं.

जी स्त्री लग्नाची तयारी करते, तिला ढवलारीन म्हणतात. ज्याचे लग्न ठरलं आहे. किंवा जीचे लग्न आहे. त्यांची तयारी करण्याची जबाबदारी महिलांवर असते. पूजेचा मानही महिलांवर असतो त्यामुळे या समाजात महिलांना किती सन्मान आहे हे दिसून येतं.

भानू गावातील आगरी समाजाचे नेते सुरेश कोपरकर यांच्याशी आम्ही बातचीत किती तेव्हा त्यांनी ‘आगरी समाजात महिलांना मानाचे स्थान आहे. इतकंच नाहीतर पुरुषांपेक्षा ही महिलांचा शब्द अधिक चालतो. असं ते म्हणाले आगरी समाजातील मुलींकडे कुणी नजर वर करून पाहत नाही. त्यांचा विनयभंग करण्याची हिम्मत कोणी करत नाही. याचं कारण सांगताना कोपरकर म्हणतात की, ‘लहानपणापासून मुलीला मुलासारखाच मान असतो. इतकंच नाही तर घर कामापासून ते घरातील व्यवसायापर्यंत त्यांच्या शब्दात वजन असतं.

घरातील अनेक व्यवहार ही मुलीच करतात. त्यामुळे लहानपणापासून प्रत्येक कामात हातभार लावायची तयारी होत राहते. आगरी समाज मासे पकडून ठेवतो. तो विकून आपला उदरनिर्वाह चालतो.

मासे विकण्यापासून ते घर चालवण्यापर्यंत जबाबदारी महिलांवर असते. बाजारात मासे विकायला गेल्यानंतर आगरी समाजातील महिला अत्यंत स्पष्ट आणि बेधडक असतात. मासे विकत घेणाऱ्या शी बोलताना त्या एखाद्या व्यवसायंकाप्रमाणे बोलतात. ही शिकवण मुलींच्या मनावर बिंबवली जाते आणि मुलगी सक्षम होऊ लागते.

सोबतही कोळी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. एखादा मोठा कार्यक्रम असेल तर वर्सोवा हे नेहमीच अग्रेसर असते. कोळी समाजातील महोत्सव किंवा सी फूड फेस्टिवल असेल तर या ठिकाणी महिला अग्रेसर दिसतात.

गणपती विसर्जनाच्या वेळी वर्सोवा गजबजलेलं असतं. त्यावेळी सर्वच महिला नटून थटून विसर्जनासाठी आलेल्या भाविकांचे स्वागत करतात. या वेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे कोणत्याही प्रकारचा विनयभंग या ठिकाणी होत नाही. महिलांच्या अंगावर मोठ्या प्रमाणावर दागिने दिसतात. ते कधी चोरीला गेल्याचं फारसे ऐकत नाही. असं कोळी समाजाचे आणि वर्सोव्याची रहिवाशी श्याम कोळी यांनी सांगितले.

लग्नसमारंभात लग्नाच्या आधी हळदीचा कार्यक्रम होतो. या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी महिलांवर असते आणि कोळी समाजातील महिलाही मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी होतात. एकूणच महाराष्ट्रात किंवा देशभरात महिला सक्षमीकरण अशी चर्चा सुरू आहे. निर्भया प्रकरणानंतर ही देशभरात महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटना कमी झाल्या नाहीत. हिंगणघाट मधील घडलेली घटना ही तर माणुसकीला काळिमा फासणारी आहे. हिंगणघाट येथील शिक्षिका होती. पण तरीसुद्धा तिच्यावर हल्ला करण्यात आला.

समाजामध्ये मुलींना पुढील समस्यांना तोंड देण्यासाठी शिक्षण दिलं जाते. मुलींनी मानसिकरित्या सक्षम व्हावं यासाठी प्रयत्न केले जातात. पण प्रत्यक्षात मात्र, आयुष्यात अनेक महिलांवर अत्याचाराचे प्रसंग होतात. या सर्वांपासून कोळी आणि आगरी समाज मात्र दूर आहे. वर्षानुवर्ष महिलांच्या हातात कारभार असल्यामुळे वाढणाऱ्या मुलींमध्ये आत्मविश्वासाची जाणीव लहानपणापासून होते. आणि हाच आत्मविश्वास त्यांना पुढच्या काळात उपयोगी येतो.

कोळी आणि आगरी समाजातील ही व्यवस्था संपूर्ण देशभरातील समाजामध्ये पसरली तर निर्भया सारखे प्रकरण कमी होतील. यात कोणतीही शंका नाही. पण त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा एवढे मात्र नक्की…

Updated : 8 Feb 2020 6:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top