Home > News Update > जेव्हा गणेश देवींना अश्रू अनावर होतात...

जेव्हा गणेश देवींना अश्रू अनावर होतात...

जेव्हा गणेश देवींना अश्रू अनावर होतात...
X

रामू रामनाथन लिखित, अतुल पेठे दिग्दर्शित 'शब्दांची रोजनिशी' हा नाट्याविष्कार मुलुंडच्या वझे-केळकर महाविद्यालयात सादर झाला आणि प्रयोग संपल्यावर डाॅ. गणेश देवींना अश्रू अनावर झाले. सारं सभागृह स्तब्ध झालं. त्यावेळी कित्येकांचे डोळे डबडबले होते.

अस्मि प्रतिष्ठान, अनुष्टुभ प्रतिष्ठान आणि वझे-केळकर महाविद्यालय यांनी ह्या प्रयोगाचे आयोजन केले होते. साहित्यिक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते, प्रकाशक, प्राध्यापक असा बुध्दिजिवी, संवेदनशील वर्ग उपस्थित होता. नाटककार प्रेमानंद गज्वी, दिग्दर्शक रवीन्द्र लाखे, कवयित्री प्रज्ञा दया पवार, कवयित्री नीरजा, सामाजिक कार्यकर्ते संजय मंगला गोपाळ, संदेश भंडारे इ. मान्यवरांनी ह्या नाट्याविष्काराचं कौतुक केलं.भाषा अभ्यासक, विचारवंत पद्मश्री डाॅ. गणेश देवींची उपस्थिती हे सर्वांसाठी लक्षवेधी होतं.

भाषा नष्ट होत आहेत मिनिटा-मिनिटाला, आणि भाषा नष्ट होत आहे मिनिटा-मिनिटाला. बहुवचनी नष्ट होणाऱ्या भाषा नष्ट होत आहेत कारण त्या बोलणारे आदिवासीच नष्ट होत आहेत, त्यांचा समाज, त्यांची संस्कृती नष्ट होत आहे. आणि एकवचनी भाषा नष्ट होत आहे कारण ती बोलणारेच ती नष्ट करत आहेत, जे व्यक्त करायाचे त्याचे साधन म्हणून ती कोलमडून पडत आहे. ही दोन सूत्रे आहेत. त्याच्याशी निगडित दोन कथानके. त्यांच्या आडव्या-उभ्या धाग्यांमधून नाटक विणले गेले आहे.

शब्दांची रोजनिशी हा एक विलक्षण आणि अचाट नाट्यानुभव आहे. कुठल्याही नाटक पाहणाऱ्याने या अनुभवाला मुकू नये. अतुल व केतकी यांची कामे भन्नाट आहेत. केतकीचे काम तर भन्नाट आहेच, पण तिचे गाणे, तेही निरनिराळ्या भाषांंमध्ये, निरनिराळ्या बाजांमध्ये. कंप्युटर ग्राफिक्स, प्रकाश योजना, नेपथ्य, ध्वनी आणि मंचन यांची जुळणी अप्रतिम आहे.

आज कितीतरी भाषा लुप्त होत चाललेत. मृत होतायत. भूत-भविष्यातले आपण आणि भाषा ह्याभोवती ही रंगावृत्ती गुंफली आहे. एक माणूस गेला की भाषा मरते आणि भाषा मेली की संस्कृती संपते. अशा कित्येक संस्कृती नष्ट होत असतील. शब्द हरवत चाललेत. हे सगळंच अस्वस्थ करणारं होतं. डाॅ. गणेश देवी भाषेचे अभ्यासक आहेत. जे खऱ्या अर्थाने भाषा जगतात, त्यामुळेच त्यांना प्रयोगानंतर अश्रू अनावर झाले. अतुल पेठे यांनी डाॅ. गणेश देवींना मिठी मारली. हा क्षण उपस्थित प्रत्येक संवेदनशील मनाला भावूक करणारा होता. रोज झोपण्यापूर्वी ज्या चिंतेत असतो, नाटकात तेच पाहिलं. अशी भावना डाॅ. गणेश देवींनी व्यक्त केली.

Updated : 29 Feb 2020 6:53 PM GMT
Next Story
Share it
Top