Home > News Update > बाळासाहेब ठाकरेंचं नाव देऊन समृध्दीचा घोळ सुटेल काय?

बाळासाहेब ठाकरेंचं नाव देऊन समृध्दीचा घोळ सुटेल काय?

बाळासाहेब ठाकरेंचं नाव देऊन समृध्दीचा घोळ सुटेल काय?
X

नागपूर ते मुंबई तयार होणा-या महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत येणार असून त्याला तत्वता मान्यता देण्यात आल्याचे संकेत मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. महत्वाचे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने हा महामार्ग गतीने पुढे गेला आहे. पण त्याच बरोबर या महामार्गाच्या कामात मोठा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पुढे करून समृद्धीचा घोटाळा दाबण्याचा तर प्रकार नाही ना? असा सवाल आता विचारला जात आहे.

मुंबई-नागपूर या शहरांमधील ७१० किलोमीटरचा प्रवास सहा तासांवर आणणाऱ्या ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’ची बांधणी तीन वर्षांत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी तब्बल 56 हजार कोटी रूपये खर्च येणार आहे. १२० मीटर रुंदीचा हा महामार्ग ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या १० जिल्ह्य़ांतून २७ तालुके पार करत ३५० गावांमधून जाणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणा केली होती.

महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दयावे. यासाठी मागच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांनी आग्रह केला होता. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात पहिला एक्सप्रेस वे बांधण्याचे स्वप्नं पाहिलं आणि ते पूर्णही झालं. त्यामुळे या महामार्गाला ठाकरे यांचं नाव असा शिवसेनेचा आग्रह होता. पण माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी तो फेटाळला होता. पण आता सत्तातर झाल्यावर मात्र, मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. या निर्णयानंतर भाजप नेत्यांच्या काय प्रतिक्रिया येतायेत हे पहाणंही महत्वाचं असणार आहे.

महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त ३५०० कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. तसंच महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या विविध वित्तीय करारांना मुद्रांक शुल्क माफी देण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणीवीस यांनी समृद्धी महामार्गसाठी मोठे प्रयत्न केले आहेत. यासाठी हजारो एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्याच बरोबर फडणवीस यांनी अनेक वेळा हा प्रकल्प माझा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं म्हटलं आहे.

महामार्गासाठी जमीन संपादित केली जात असताना शेतक-यांचं आंदोलनही झालं होतं. त्यासाठी पराकोटीचा विरोध झाला होता. पण एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन समृध्दी महामार्गातील अडथळे दूर केले. शहापूर नाशिक आणि ठाणे परिसरातील अनेक जमिनी मंत्रालयातील अधिका-यांनी विकत घेतल्या आणि त्या समृध्दी महामार्गात विकून करोडो रूपये कमावले आहेत असा आरोप करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे आल्यानंतर त्यांनी समृध्दी महामार्गासंदर्भातल्या सर्व फाईल आपल्याकडे मागवून घेतल्या असून त्याची तपासणी करण्याचे संकेत दिले आहेत. हीच बाब लक्षात घेऊन या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. आणि त्याला तत्वता मान्यताही देण्यात आली आहे.

आमदार अनिल गोटे यांनी समृद्धी महामार्गात घोटाळा झाला असून त्याची चौकशी करावी. अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यातच समृध्दी महामार्गाला नाव देण्याची चर्चा आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Updated : 11 Dec 2019 2:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top