Home > News Update > ‘त्या’ जाणीवेतूनच माझी कविता आकारते - गुलजार

‘त्या’ जाणीवेतूनच माझी कविता आकारते - गुलजार

‘त्या’ जाणीवेतूनच माझी कविता आकारते - गुलजार
X

गायतोंडे हे अस्सल कलावंत होते आणि असे कलावंत समाजाला नेहमीच समृद्ध करत असतात,

असं कवी, गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार यांनी आज सांगितलं. भारतातील अमूर्त चित्रकलेचे पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वासुदेव गायतोंडे यांची शैली, आयुष्य आणि त्यांचा अमूर्त कलेमागचा विचार चितारणाऱ्या 'गायतोंडे' या हिंदी पुस्तकाचं प्रकाशन गुलजार यांच्या हस्ते, आज गुढीपाडव्याचा मुहूर्तावर मुंबईतल्या नॅशनल गॅलरी फॉर मॉडर्न आर्ट अर्थात एनजीएमएच्या सभागृहात करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. थोर अमूर्तनवादी चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या कला आणि आयुष्यावर आधारित ‘गायतोंडे ‘ या मराठी गौरवग्रंथाचा हा हिंदी अनुवाद डॉ. स्मिता दाते यांनी केलेला आहे.

मला चित्रकलेचं फारसं ज्ञान नाही. मात्र मी चित्रकला जाणीवेच्या पातळीवर समजून घेऊ शकतो आणि त्या जाणीवेतूनच माझी कविता आकारते, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी आपल्या चित्रकलेवर आधारित काही कवितांचं वाचनही केलं.

गायतोंडे यांच्यासारख्या विलक्षण प्रतिभावंताच्या कार्याचा आढावा घेणारा हा ग्रंथ हिंदीत अभूतपूर्व असून या ग्रंथासाठी चिन्हचे संपादक सतीश नाईक यांनी घेतलेले कष्ट पाहिले की बाबा आमटे यांची आठवण होते, असं सुप्रसिद्ध अनुवादक प्रकाश भातंब्रेकर यावेळी म्हणाले. हा ग्रंथ म्हणजे एक महत्वाचा दस्तऐवज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

हा ग्रंथ जगातल्या अनेक भाषांमध्ये अनुवादित होण्याची गरज असून त्याचा इटालियन भाषेत अनुवाद करण्याची इच्छा, यावेळी उपस्थित इटालियन भाषेच्या प्राध्यापक डॉ. प्रतिष्ठा सिंह यांनी व्यक्त केली. हा महत्वाचा ग्रंथ हिंदीत आणल्याबद्दल त्यांनी चिन्ह’चे आभार मानले.

या पुस्तकाच्या निमित्तानं गायतोंडेंसारख्या प्रतिभावंताला चाळीस वर्षांनंतर योग्य ती प्रसिद्धी मिळत आहे याबद्दल चिन्ह प्रकाशन चे संपादक नाईक यांनी समाधान व्यक्त केलं. आपण गेली वीस वर्षं या ग्रंथावर काम करत होतो,हा प्रवास अतिशय रोमहर्षक होता, असंही ते म्हणाले.

ललित कलांना प्रोत्साहन आणि नव्या कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याबरोबरच ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान करणं ही ललित कला अकादमीची जबाबदारी आहे. त्यामुळे या ग्रंथाचं प्रकाशन करताना आपल्याला आनंद होत आहे, असं ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांनी यावेळी सांगितलं. ‘गायतोंडे’ या ग्रंथाच्या हिंदी अनुवादामुळे वासुदेव गायतोंडे यांच्यासारख्या लोकोत्तर कलावंताची कलादृष्टी देशभरातल्या रसिक आणि कला-विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावी हा या ग्रंथाच्या प्रकाशनामागचा उद्देश आहे, या शब्दांत पाचारणे यांनी अकादमीची भूमिका स्पष्ट केली.

या कार्यक्रमाला देशभरातले अनेक चित्रकार, विद्यार्थी आणि कलारसिका उपस्थित होते. मनीषा कोरडे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.

अकादमीतर्फे साठावं राष्ट्रीय कला प्रदर्शनही नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आणि शिवाय जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये भरविण्यात आलं असून, 16 एप्रिलपर्यंत ते सर्व कलाप्रेमींसाठी खुलं राहणार आहे.

Updated : 7 April 2019 12:24 PM GMT
Next Story
Share it
Top