दुरुस्तीच्या नावाखाली महानगरपालिकेचे रुग्णालय ८ महिने बंद; रुग्णांचे हाल

20

मुंबईतील गोरेगावमधील सिध्दार्थनगर भागात महापालिकेचे ५ मजली रुग्णालय आहे. २७ एप्रिल २०१९ रोजी दुरुस्तीच्या नावाखाली हे रुग्णालय बंद करण्यात आले. ८ महिने उलटूनही या रुग्णालयाची दुरूस्ती होताना दिसत नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप आहे.

या रुग्णालयामध्ये अतीदक्षता विभाग, रक्त तपासणी, स्त्री प्रस्तूती, जनरल वॉर्ड, आयसीयू, सोनोग्राफीसारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत. मात्र त्या बंद असल्याने गरिब रुग्णांचे हाल होत आहेत. तात्पुरत्या स्वरुपात महानगरपालिकेने ओपीडी (बाह्यविभाग रुग्णालय) सुरु केली आहे. त्या ओपीडीमध्ये आवश्यक सुविधा मिळत नसल्यामुळे तेथील नागरिकांमध्ये रोष आहे. अनेक नागरिकांना सिध्दार्थ रुग्णालय बंद झाल्याची कल्पना नाही. आजही अनेक रुग्ण उपचासाठी या रुग्णालयात येत आहेत आणि माघारी जात आहेत.

महापालिकेतर्फे सुरू केलेली ओपीडी काहीच कामाचं नाही असं, परिसरातील नागरिकांनी ‘मॅक्स महाराष्ट्र’शी बोलताना सांगितलं. स्थानिक नागरिकांनी रुग्णालय कधी सुरू होणार यासाठी वारंवार विचारना करूनही महापालिकेकडे त्याचं उत्तर नाही. लोकांच्या जीवाशी, आरोग्याशी खेळू नये याकरिता लोकांसाठी ‘आरोग्य बचाव समिती’ देखील स्थापन करण्याचा निर्णय स्थानिक लोकांनी घेतलाय.

या संदर्भात आम्ही मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारले असता त्यांनी सांगितलं की, मुबंईचे उपमहापौर सुहास वाडकर हे गोरेगावमधील महानगर पालिकेच्या रुग्णालयवर लक्ष ठेवून आहेत. येत्या महिनाभरात टेंडर निघणार आहे आणि लवकरात लवकर बांधकाम सुरु करुन रुग्णालय नागरिकांसाठी खुलं करू, असं पेडणेकर यांनी ‘मॅक्स महाराष्ट्र’शी बोलताना सांगितलं.

सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी किती सक्षम आहे हे दाखवण्याचं काम महापौरांनी केलं खरं. परंतु गरीब रुग्ण आता सध्या आवश्यक उपचार सुविधापासून वंचित आहे त्याचं काय? आधीच ८ महिन्यांहून अधिक काळ होऊन गेला आहे. त्यात आता रुग्णालय दुरूस्त होऊन पुन्हा कार्यान्वित होईपर्यंत रुग्णांचे हाल अटळ आहेत.

Comments