एक आत्महत्या टळलेली ! – राजेश प्रभाकर वराडकर

Mumbai police । refrain a man from committing suicide
Photo Credit: Rajesh Waradkar

सकाळी साधारण १०. ३० वाजता मित्र राहुलचा मोबाईलवर फोन आला. राजेश, कुठे आहेस? मी म्हटलं घरी आहे. मला म्हणाला, बहुतेक एक व्यक्ती आत्महत्या करण्याच्या विचाराने आमच्या इमारतीच्या गच्चीवर गेली आहे. इमारतीबाहेर पोलीस व अग्निशमन दलाची लोक व गाड्या उभ्या आहेत. हे एकूण लगेच कॅमेराची बॅग उचलून दुचाकीने दादर पूर्व येथील शिवनेरी इमारतीच्या दिशेने निघालो. इमारतीच्या तळमजल्यावर पोहचून राहुलला फोन केला.

राहुल बोलला तडक गच्चीवर ये. मी तसाच इमारतीचे 3 मजले धावत जाऊन गच्ची गाठली आणि समोर पाहिले तर ती व्यक्ती गच्चीच्या बाहेरील बाजूचा कठडा धरून उभी आहे. मी ते दृश्य माझ्या कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र अंतर फारच लांब होते. तसेच टिपताना मध्ये इमारतीच्या पाईपाचा अडथळा येत होता. त्याचवेळी ती व्यक्ती ज्या बाजूस उभी होती, त्याच्या विरुद्ध बाजूस असलेल्या इमारतीमधून त्याचे छायाचित्र काढता येईल.

या विचाराने मी धावतच त्या इमारतीकडे निघालो. ती म्हाडाची पाच माळ्याची लिफ्ट नसलेली इमारत. धावतच पाच माळे चढून गच्चीवर गेलो. समोरच ती व्यक्ती इमारतीच्या बाहेरील बाजूस असलेल्या साधारण एक फूट सज्जावर उभी राहून गच्चीच्या कठड्याला पकडून फेऱ्या मारत होती. ते दृश्य पाहून काळजात धस्स झाले. फक्त काही इंचाचा फरक कोणत्याही क्षणी होत्याचे नव्हते होणार होते. तेथील वातावरणात कमालीचा तणाव जाणवत होता. आजूबाजूच्या इमारतीवर जमा झालेली लोक सातत्याने ओरडून व हातवारे करून सांगत होती असे करू नका. हे करणे चुकीचे आहे , प्रत्येक पावलागणिक त्याचे ओरडणे चालू व्हायचे. ती व्यक्ती थांबली कि त्यांना हायसे वाटायचे.

हे ही वाचा..

आभासी जगण्यात वास्तवातले गुंते – विजय चोरमारे

आत्महत्या का?

#Breaking – अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

काही जण डोळे मिटून हात जोडून देवाचा धावा करत होते. तसेच त्याच वेळी त्या व्यक्तीची वरिष्ठ महिला अधिकारी संगीता पाटील त्याची समजूत काढून त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होत्या. ती व्यक्ती जिथे उभी होती, त्याखालील खिडकीतून एक पोलीस कर्मचारी त्या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न करता होता. जस जशी वेळ पुढे सरकत होती, तसतसा काळ जवळ येतो की काय असे क्षणाक्षणाला वाटत होते. मी माझ्या कॅमेऱ्यात प्रत्येक क्षण बंदिस्त करत असताना ती व्यक्ती वाचावी याकरिता मनातल्या मनात देवाचा धावा करत होतो. त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला वाचवण्यासाठी इमारतीच्या खालील भागात गादया अंथरायला सुरुवात केली. जेणेकरून त्या व्यक्तीचा जीव वाचवता येईल. त्याच वेळी श्रीमती संगीता पाटील याचें त्याला वाचवण्यासाठीचे प्रयत्न सुरूच होते. त्या सतत त्या व्यक्तीशी संवाद साधूनत्याचें मन वळवण्याचा व त्याला बोलण्यात व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या. अनेक वेळा आत्महत्या करणार्या व्यक्तचें विडीओ अथवा सीसीटीव्ही चें चित्रण पाहिले होते पण प्रत्यक्ष तसा प्रयत्न करणारे दृश्य भितिदायक व अंगावर काटा आणणारे होते.

Mumbai police । refrain a man from committing suicide
Photo Credit: Rajesh Waradkar

अशा नाजूक प्रसंगी कमालीचा संयम राखून परिस्थिती हाताळावी लागते. डोके शांत ठेऊन विचार करावा लागतो. एका क्षणात काही हि होऊ शकते. असे म्हणतात कि, आत्महत्या करायचा मनात विचार आल्यानंतर तो प्रत्यक्षात अंमलात आणण्याकरिता मनाची प्रचंड तयारी असावी लागते. ती तयारी झाल्यावरच आत्महत्या कराणाारी व्यक्ती आत्महत्येची कृती अंमलात आणते. त्यावेस त्या व्यक्तीशी त्याच्या कलेनेच घ्यावं लागतं आणि त्याला समजून त्याच्या त्या निर्णयापासून परावृत्त करणे हे फार जिकरीचे काम असते. एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे अघटित घडू शकते.

संगीता पाटील यांच्यासोबत एक वरिष्ठ पोलीस अधिकारी त्या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न करत होते. तू तुझा निर्णय बदल, तुझे काय प्रॉब्लेम आहेत ते आम्हाला सांग, आम्ही सोडवू. पण आत्महत्या करू नको, असे सारखे पोटतिडकीने ओरडून सांगत होते. तरीही ती व्यक्ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. नक्की मनात काय चालले आहे, याच ठाव परमेश्वरालाच माहीत असणार. त्याचे फेऱ्या मारणे सुरूच होते. सर्वांच्या हृदयाचा ठोका क्षणाक्षणाला वाढत होता. त्याच्यासाठी पाणी, बिस्कीट सुद्धा गच्चीच्या कठड्यावर ठेवण्यात आले. मात्र ते घेण्यास त्याने नकार दिला . त्याला कसले नैराश्य आले होते का हे समजण्यास ही काही मार्ग नव्हता.

त्यावेळी असे वाटत होते की त्याचा आत्महत्या करण्याचा विचार पक्का होत आहे. फेऱ्या मारताना तो थोडा वेळ थांबून खाली पाहत असे, मध्येच रडणे व डोळे पुसणे हे सुद्धा करत होता. सर्वांच्याच मनाची घालमेल सुरु होती. मी ज्या इमारतीत होतो. तिथे एका वृत्तवाहिनीचा पत्रकार आपल्या कॅमरामॅन सोबत आला होता. त्याने पण लाईव्ह शूट करण्याचे टाळले. कारण कदाचित ते दृश्य पाहून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या कुटूंबियांना धक्का बसला असता या ब्रेकिंग न्युज मुळे ………

अशातच त्या इमारतीच्या गच्चीवर बहुतेक त्या व्यक्तीच्या परिचयाची माणसे आली. ती सुद्धा त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती. माघारी बोलावत होती , पण तो ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हता. त्यानंतर त्याच्या कुटूंबियाच्या व्यक्तीला फोन लावून त्याचे बोलणे भोंग्यावर ऐकवण्यात आले. तरीही ती व्यक्ती समजण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यादरम्यान सर्व आशा मावळल्या आहेत असे वाटूलागले होते . पोलीस कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानाची सुद्धा कोंडी झाली होती, कारण त्याच्या पर्यंत त्याचे लक्ष न जाता पोहचण्याचा दुसरा मार्गच नव्हता.

संगीता पाटील यांनी त्याच्या कुटूंबियांना फोन करून त्याच्याशी संवाद सुरू ठेवण्यास सांगितले. कुटूंबियातील कोणीतरी व्यक्ती विनंती करत होती कि, तू निर्णय बदलून परत घरी ये. आपण तुझ्या सर्व अडचणी सोडवू , तू परत ये. असे भावनिक आवाहन सुरूच होते. उपस्थित पोलीस कर्मचारी, त्याचबरोबर इतर इमारतीमधील लोकांच्या विनवण्या यांचा कदाचित एकत्रित सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला. आणि त्या व्यक्तीने आत्महत्येचा विचार बदलला. कोरोनाच्या महामारीत सर्वच जण माणुसकी टिकवण्यासाठी लढत असताना, जी व्यक्ती ना नात्यातील , ना ओळखीची अशा व्यक्तीचा जीव वाचवा यासाठी आपल्या परिने प्रयत्न करत होते. देवाकडे प्रार्थना करत होते . त्यावेळी दिसून आले आजही माणसातील माणुसकी जीवंत आहे…

why sushant singh committed suicide, analysis by director mahesh tilekar

आज प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केली. खुपच दुःखद घटना घडली. त्याचा प्रयत्न कोणाच्या नजरेस पडला असता, तर सुशांतलाही समजाऊन आत्महत्येपासून परावृत्त करता आलं असतं. एका उत्तम गुणी अभिनेत्याचा जीव वाचला असता कदाचित..

– राजेश प्रभाकर वराडकर