#missionbeginagain : दुसरा टप्पा आजपासून, मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा

एमएमआर क्षेत्रातील महापालिका तसेच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिकांमधील कंटेनमेंट झोन वगळून इतर ठिकाणी ३ जूनपासून मोकळ्या जागांमध्ये सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, वॉकिंग अशा शारीरिक व्यायामांना सशर्त परवानगी देण्यात आली होती. पण आता हे करताना बगिच्यांमधील व्यायामाचे साहित्य, ओपन एअर जीममधील साहित्य, खेळाच्या मैदानावरील स्विंग्ज, बार्स यासारखे साहित्य यांचा वापर करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

आजपासून सुरु होणाऱ्या ‘मिशन बिगिन अगेन’ टप्पा २ मध्ये या महापालिका क्षेत्रांमधील कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणचे रोड, गल्ली, भाग यांच्या एका बाजुची दुकाने एका दिवशी त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील, तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजुची दुकाने नियमित वेळेत सुरु राहतील. सोशल डिन्टन्सिंगचे सर्व नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.

८ जूनपासून सुरु होणाऱ्या ‘मिशन बिगिन अगेन’ टप्पा ३ मध्ये या महापालिका क्षेत्रांमधील कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी खाजगी कार्यालयांना १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह कामकाज करण्यास संमती देण्यात आली आहे. इतर कर्मचारी घरुन कामकाज करु शकतील. तर कार्यालयात येणारे कर्मचारी घरी परतल्यानंतर त्यांनी स्वच्छतेची संपूर्ण काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

७ जूनपासून या महापालिका क्षेत्रांमधील कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी वृत्तपत्रांची छपाई तसेच होम डिलिवरीला परवानगी देण्यात आली आहे. पेपर वाटणाऱ्यांनी मास्क, सॅनिटायजर यांचा वापर करणे तसेच शारीरिक अंतर पाळण्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

वरील महापालिका क्षेत्र सोडून राज्याच्या इतर भागात विविध उपक्रमांना काही अटींवर परवानगी देण्यात आली होती. यामध्ये आता विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, शैक्षणिक संस्थांची कार्यालये, कर्मचारी यांना काही अशैक्षणिक कामांसाठी परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये ई – मजकूर तयार करणे, उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन तसेच निकाल जाहीर करणे यांचा समावेश आहे. सध्या नागरिकांचा आंतरराज्य तसेच आंतरजिल्हा प्रवासाला मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. पण आता एमएमआर क्षेत्रामधील महापालिकांमध्ये नागरिकांच्या आंतरजिल्हा प्रवासाला कोणत्याही निर्बंधाशिवाय परवानगी देण्यात येत आहे. अडकलेले श्रमिक, स्थलांतरीत श्रमिक, यात्रेकरु, पर्यटक यांचा प्रवास मात्र आधीच्या अटींनुसार होणार आहे.

आजपासून काय सुरू होणार?

सर्व मार्केटस्, मार्केट क्षेत्र आणि दुकाने (मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सशिवाय) ही पी – १, पी – २ बेसिसवर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहतील.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने कपड्यांच्या किंवा तत्सम दुकानांमध्ये ट्रायल रुमचा वापर करता येणार नाही. सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) राहील याची दुकानदारांनी खबरदारी घ्यायची आहे. ग्राहकांना उभे राहण्यासाठी जमिनीवर चिन्ह तयार करणे, टोकन पद्धती, होम डिलीव्हरी आदींना प्रोत्साहन द्यावे.

खरेदीसाठी लोकांनी पायी जावे किंवा सायकलचा वापर करावा. शक्यतो जवळची दुकाने, मार्केटमध्ये खरेदी करावी. बिगर अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी लांबच्या प्रवासाला अनुमती नाही. खरेदीसाठी वाहनांचा वापर करण्यात येऊ नये.

सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत दुकान, मार्केट हे प्रशासनाकडून बंद करण्यात येईल.

टॅक्सी, कॅब, ॲग्रीगेटर यांना अत्यावश्यक सेवेकरिता १ अधिक २ प्रवासी, रिक्षासाठी अत्यावश्यक सेवेकरिता १ अधिक २ प्रवासी, चारचाकी वाहनासाठी अत्यावश्यक सेवेकरिता १ अधिक २ प्रवासी तर मोटारसायकलसाठी अत्यावश्यक सेवेकरिता १ प्रवासी याप्रमाणे परवानगी असेल.