Home > News Update > अखेर ‘त्या’ शेतकऱ्यांचे पंचनामे झाले!

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यांचे पंचनामे झाले!

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यांचे पंचनामे झाले!
X

महाराष्ट्रात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सरकारने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र, अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचला का? या संदर्भात मॅक्समहाराष्ट्र ने 14 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट पाहणी केली होती. तर धक्कादायक वास्तव समोर आलं होतं.

अनेक शेतकऱ्यांचे अद्यापपर्यंत पंचनामे झाले नसल्याचं समोर आलं होतं. या वर मॅक्समहाराष्ट्र ने ‘शेतकऱ्यांच्या मदतीचं सोडा, पंचनामेच नाही !’ या आशयाचं वृत्त दिलं होतं. त्यानंतर प्रशासनानं त्याची तात्काळ दखल घेतली आहे. सुधागड तालुक्यातील नेणवली ग्रामपंचायत हद्दीतील खडसांबळे येथील शेतकरी हनुमंत बेलोसे यांचे चार हेक्टर लागवडीखालील भातशेतीचे मोठे नुकसान झालं होतं.

मात्र, सदरचे क्षेत्र पंचनाम्यापासून डावळललं असल्याचं शेतकरी हनुमंत बेलोसे यांनी सांगितलं. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करुनही त्यांच्या नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा झाला नव्हता. शेवटी त्यांनी प्रशासनाला उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मॅक्समहाराष्ट्र ने दिलेल्या वृत्ताची दखल घेत पाली तहसिलदार दिलीप रायन्नावार यांनी बैठक घेतली. या बैठकीत शेतकरी हनुमंत बेलोसे यांनी ग्रामपंचायत, महसूल विभाग, व कृषी विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यासाठी शेतीच्या बांधावर पोहचलेच नसल्याचे सांगत संताप व्यक्त केला.

प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामेच केले नाहीत. तर शासनाकडून नुकसानभरपाई कशी मिळणार? असा सवाल हनुमंत बेलोसे यांनी बैठकीत उपस्थित केला. तसंच तलाठी यांच्या अखत्यारीत असलेल्या काही प्रशासकीय कामात बाहेरील व्यक्ती हस्तक्षेप करीत असल्यानं प्रशासकीय कामात अनेक त्रृटी होत असल्याचं बेलोसे यांनी या बैठकीत निदर्शनास आणून दिलं होतं.

नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळले आहे. अशातच हतबल झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला या नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, प्रशासकीय यंत्रणा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचली नसल्यानं शेतकरी शासनाच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहत असल्याचे बेलोसे यांनी म्हटले. तसेच आतोणे तलाठी यांना भातशेतीचे नुकसान झाले असून पंचनामे करण्याची मागणी केली असता यांच्याकडून आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळाली असल्याचे बेलोसे यांनी म्हटले. त्यामुळे संबंधित तलाठी यांची बदली करण्यात यावी अशी मागणी बेलोसे यांनी केली होती.

हनुमंत बेलोसे यांची खडसांबळे गावच्या हद्दीत सर्वे नं. 25(5), सर्वे नं 17 (1), 19(1) अ, 19(1) ब अशी एकूण 4 हेक्टर क्षेत्रात भातशेतीची लागवड केली आहे. अतिवृष्टी व परतीच्या पावसाने लागवडीखालील 80 टक्के पिकांची नासाडी झाली असल्याचं शेतकरी बेलोसे यांनी म्हटलं आहे. आतोणे तलाठी सजा यांच्याकडे पंचनाम्याबाबत विचारणा केली असता कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई मिळणार नसल्याचं शेतकऱ्याला सांगितले गेले. त्यामुळं आंदोलनाची भुमिका घेत आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला असल्याचं शेतकरी बेलोसे यांनी सांगितलंय.

आतोणे तलाठी सजा वाय. बी.टवले बहुतांश वेळा कार्यालयात बसत नसल्याने सातबारे व अन्य महत्वाच्या शासकीय कागदपत्रांसाठी किमान 25 किलोमीटर खर्चिक व कष्टप्रद प्रवास करुन पाली तहसिल कार्यालयात यावे जावे लागत असल्याची बाब देखील हनुमंत बेलोसे यांनी पाली तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिली. हनुमंत बेलोसे यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी तलाठी यांची बदली करणार असल्याचे आश्वासीत केलं.

तसंच सुधागड तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे झाले असून अजूनही कुणी शेतकरी वर्गाचे पंचनामे होणे राहिले असतील. अशा सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना शासनाची नुकसान भरपाई मिळेल. एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही. असं तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी स्पष्ट केले. अन्य प्रश्न व मागण्या वरिष्ठांकडे चर्चा करून मार्गी लावल्या जातील. असं तहसीलदार रायन्नावार यांनी आश्वासीत केले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी पुकारलेल्या लढ्याला यश आल्याचं सांगत या आंदोलनाला पाठींबा दर्शविणाऱ्या शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांचे हनुमंत बेलोसे यांनी आभार मानले. या बैठकीस पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार, शेकाप नेते तथा जि.प सदस्य सुरेश शेठ खैरे, शेतकरी हनुमंत बेलोसे, सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष गणपतराव सीतापराव, रायगड जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरिच्छंद्र शिंदे, नथुराम बेलोसे, आरिफ मणियार, संजय फाळे, नरेश खाडे, शिवराम पवार, मंगेश पालांडे, पांडुरंग कोंडे, गणेश शेडगे, दिनेश बेलोसे, सुधीर सावंत, घायले हे शेतकरी उपस्थित होते.

Updated : 31 Dec 2019 7:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top