Home > News Update > पंतप्रधान मोदींवरील टीकेचा ‘नवाकाळ’

पंतप्रधान मोदींवरील टीकेचा ‘नवाकाळ’

पंतप्रधान मोदींवरील टीकेचा ‘नवाकाळ’
X

रविवार 3 मे रोजी पर्यंतचा लॉकडाऊन आणखी 17 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला. कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता हा निर्णय अपेक्षित होता. त्यामुळे हे वृत्त कळल्यावर निराशा आली तरी मोठा मानसिक धक्का बसला नाही. पण पंतप्रधान मोदींच्या नव्या घोषणेमुळे संताप उफाळून आला आहे.

3 मे रोजी प्रत्येक राज्याच्या एका जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोनाशी लढा देणाऱ्या रूग्णालयांसमोर लढाऊ विमानांचे संचलन, पोलीस स्मृतीस्थळावर मानवंदना, विमानातून रूग्णालयावर पुष्पवृष्टी आणि सायंकाळी नौदलाच्या लढाऊ जहाजांवर रोषणाई करून कोरोनाशी झुंज देणाऱ्या डॉक्टर ते पोलिसांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ही केवळ स्वप्रसिध्दीसाठी जाहीर केलेली नौटंकी आहे.

या नौटंकीच्या कार्यक्रमानंतर कोविड योद्धयांंचे काम शंभरपट वाढणार हे निश्‍चित आहे. याचे कारण हे सर्व कार्यक्रम बघायला ठिकठिकाणी लोक नियम तोडत गर्दी करणार हे उघड आहे. सायंकाळी नौदलाच्या जहाजांची रोषणाई पाहायला लोक धावतील तेव्हा ‘सोशल डिस्टन्सिंग’चा पार फज्जा उडणार आहे. आधी दोनदा हेच प्रकार झाले तरी त्यातून मोदी सरकार बोधच घेत नाही. ज्यांना मानवंदना देण्याच्या नावाखाली या तमाशाचे नियोजन केले आहे त्यांना तुम्ही आणखी कामाला लावणार आहात. एकीकडे गर्दी नको म्हणायचे आणि दुसरीकडे गर्दी होईल असेच कार्यक्रम जाहीर करायचे. प्रत्येकवेळी गर्दी आणि गोंधळ होऊन कोरोना पसरण्याचा धोका आणखी वाढतो. पण कुणी काही बोलायचे नाही कारण मोदी भक्त अंगावर येतात. पण सत्य मांडायलाच हवे. कानात तेल ओतायलाच हवे. डोळे उघडायलाच हवेत. सातत्याने कुणी चुका करीत असेल तर कोरडेे विरोधाचे हाणायलाच हवेत.

हे ही वाचा…


देशभरात आतापर्यंत १० हजारांच्यावर रुग्ण कोरोनामुक्त

LockDown3: मध्ये काय सुरु होणार? काय बंद राहणार? राज्य शासनाची अधिकृत नियमावली…

पुणे शहरात २४ तासात कोरोनाचे ९५ नवे रुग्ण

घरी जायचंय? कोणाची घ्यावी लागणार परवानगी?

3 मे रोजी ही नौटंकी केली जाईल त्यावेळी ती पहायला गर्दी उसळेलच, ती गर्दी आवरताना माझा थकलेला पोलीस पार हतबल होऊन जाईल. लष्करी विमाने आणि जहाजांचे संचलन करायचे तर ही तयारी गेले आठवडाभर सुरू असणार आहे. ज्या जवानांना कोरोनाच्या लढाईसाठी रूजू करायचे त्या जवानांना अशा देखाव्यांसाठी राबविले ही लज्जास्पद गोष्ट आहे. संपूर्ण शासकीय यंत्रणा आणि तिन्ही दल एक दिवसाच्या तमाशासाठी आठवडाभर राबवायचे याहून दुर्दैवाची बाब नाही. तिन्ही दलांच्या प्रमुखांनी या कार्यक्रमाला मनोमनी निश्‍चित विरोध केला असेल, पण उघड बोलणार कोण? मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?

जिथे कोरोनाचे रूग्ण जगण्यासाठी लढत आहेत त्या रूग्णांवर सकाळी आणि संध्याकाळी विमाने घिरट्या घालून प्रचंड आवाज करणार आणि पुष्पवृष्टी करणार हे रूग्णांसाठी धोकादायक आहे हेही कळत नाही? हे सर्व पाहायला इमारतींच्या गच्चींवर लोकं गर्दी करतील आणि कोरोना फैलावतील त्याची जबाबदारी पंतप्रधान घेणार आहेत का? आणि या सगळ्यावर जो प्रचंड पैसा खर्च होणार आहे तो पैसा गरजवंताना दिला असता तर निदान आशीर्वाद तरी मिळाले असते.

पंतप्रधानपदाचा आम्हाला सन्मान आहे, पण त्याचवेळी चूक ते चूक म्हणण्याच्या आमच्या हक्काचा अभिमान आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन लादल्यापासून पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेले सर्व कार्यक्रम फेल गेले. एकही यशस्वी झाला नाही. पहिल्यांदा थाळ्या वाजवायला सांगितल्या तर लोकांनी मोर्चे काढले, दुचाकीचे जलसे निघाले, थाळ्या घेऊन गरबा झाला. हे पाहून पोलीस, डॉक्टर पासून सर्व योद्धयांनी कपाळावर हात मारला. मग दुसऱ्यांदा मेणबत्त्या जाळायला सांगितल्या तर लोकांनी एकत्र येऊन फटाके फोडले. वीज पुरवठा बंद पडायचा धोका निर्माण झाला होता. यातून काही बोध घ्यायला हवा. पण बोध तर घेतलाच नाही, उलट आणखी मोठी चूक करून ठेवली आहे. हे सर्व जगाला दाखविण्यासाठी सुरू आहे. यात देशवासियांची काळजीच दिसत नाही.

3 मे रोजी जो कार्यक्रम जाहीर केला आहे तसा जल्लोष चीनने केला होता. दरवेळी दुसऱ्या देशांची आपण कॉपी केली. यावेळी चीनची करणार आहोत. पण जवळजवळ तीन महिन्याची निकाराची झुंज देऊन चीनने कोरोनाला हद्दपार केले तेव्हा जल्लोष केला होता. आपण अजून रेड झोनमध्ये लडखडतोय, धडपडतोय. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका वाढविणारे हे कार्यक्रम घेणे म्हणजे सरळसरळ आत्महत्या आहे. ही कोव्हिड वॉरीयना मानवंदना नव्हे तर त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. हे तमाशे, ही नौटंकी, हा प्रचार, ही प्रसिध्दी बंद करा! ही बेजबाबदार उधळण थांबवा. बस्स झालं आता!

Updated : 3 May 2020 3:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top