Corona in Maharashtra Live: सावधान! राज्याची शतकाकडे वाटचाल…

Courtesy : Social Media

राज्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही संख्या आज 74 वरुन आज 97 वरती गेली आहे. तर आत्तापर्यंत मुंबईतील तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. आजची आकडेवारी पाहता राज्यात एका रात्रीत 23 रुग्णांची वाढ झाली आहे. तर देशात आतापर्यंत ४९९ जणांना करोनाची लागण झाली असून आतापर्यंत एकूण ९ जणांचा बळी गेला आहे.

करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि खासगी केंद्रांच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत करोना तपासण्यांची क्षमता १००हून २२००पर्यंत वाढविण्यात येत आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी दिली.

मुंबईत आतापर्यंत ४१, पुणे १६, पिंपरी-चिंचवड १२, नागपूर ४, यवतमाळ ४, कल्याण ४, नवी मुंबई ४, सांगली ४, नगर २ आणि पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी आणि साताऱ्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधीत करत संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. राज्यात केवळ लाँक डाऊन आणि जमाव बंदीने फरक पडत नसल्याने राज्य सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहेत.

राज्यात कलम १४४ लागू केल्यानंतर आता राज्यात पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वाहतुक करण्यास त्यानुसार मनाई करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

काय सुरु राहणार काय बंद राहणार?

-राज्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत.
-जीवनावश्यक वस्तूची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
-अन्न धान्य, औषधं, बेकरी, पशू खाद्य, पशू दवाखाने उघडे राहतील.
-कृषी उद्योग, कृषी दुकानं उघडी राहतील.
-देशातील विमानतळ बंद करण्याचा प्रयत्न, पंतप्रधानांना विनंती केली आहे.
-सर्वधर्मीयांचे प्रार्थना स्थळ बंद करण्यात आली आहेत.
-खाजगी वाहतूक करताना रिक्षा चालकाला आणि त्याच्या बरोबर एकालाच परवानगी देण्यात येईल.
-टॅक्सीमध्ये चालक आणि दोन व्यक्तीलाच परवानगी देण्यात आली आहे.
-माझी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, उदयोगमंत्री -सुभाष देसाई यांच्यासोबत बैठक झाली. यामध्ये काही निर्णय घेण्यात आले.
-वैद्यकीय सेवेत गरज पडल्यास आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांनी ट्रेनिंग देऊन त्यांचा मदतीसाठी उपयोग  केला जाणार.
-गरज पडल्यास होमगार्ड चा देखील उपयोग केला जाईल. तशी ट्रेनिंग दिलं जात आहे.
-आवश्यकता असेल तेव्हाच बाहेर पडा…
-परदेशातून जे लोक राज्यात आले आहेत. अशा लोकांपासून लांब राहिलं पाहिजे. त्या व्यक्तीने घरातील व्यक्ती पासून लांब राहिलं पाहिजे.
-सरकार कठोर पाऊल टाकत आहे. ही कठोरता राज्यातील जनतेसाठी आहे.