प्रवाशांना रेल्वे स्टेशनपर्यंत सरकार पोहोचवणार

Courtesy: Social Media

लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपून तिसरा टप्पा सुरू होण्याआधी विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांना आपापल्या घरी जाण्याची परवानगी सरकारनं दिली आहे. परराज्यातील स्थलांतरीतांची त्यांच्या त्यांच्या राज्यात जाण्याची सोय राज्य सरकारांनी करण्याच्या सूचना केंद्र सरकारने केल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं स्थलांतरीतांसाठी एक सूचना जारी केली आहे. महाराष्ट्रातून परराज्यात रेल्वेने जाणाऱ्या नागरिकांसाठी स्थानिक नोडल अधिकाऱ्यांमार्फत नाव नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांना रेल्वेने बाहेरगावी जायचे आहे त्यांना रेल्वे स्टेशनपर्यंत आणण्याची सोय राज्य सरकारतर्फे केली जाणार आहे.

त्यामुळे जोपर्यंत संबंधितांकडून कळविले जाणार नाही, तोपर्यंत कोणीही विनाकारण रेल्वे स्टेशनवर गर्दी करू नये आणि कायदा तसंच सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वागू नये अशी सूचना सरकारनं केली आहे.