Home > News Update > इंदू मिल स्मारक का प्रलंबित राहिलं? अजित पवारांनी सांगितलं ‘हे’ कारण

इंदू मिल स्मारक का प्रलंबित राहिलं? अजित पवारांनी सांगितलं ‘हे’ कारण

इंदू मिल स्मारक का प्रलंबित राहिलं? अजित पवारांनी सांगितलं ‘हे’ कारण
X

दादर येथील इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची उंची वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता हा पुतळा ३५० फुटांचा असणार आहे. तर स्मारकाची उंची ४५० फूट असेल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याच्या सुधारित प्रस्तावाला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पुतळ्याची उंची वाढणार असल्याने आता या स्मारकाच्या खर्चातही वाढ होणार आहे. आधी स्मारकासाठी ७०९ कोटी रुपये प्रस्तावित खर्च होता. आता तो ९९० कोटींवर जाणार आहे. परंतू बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही. असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं आहे.

या स्मारकाचे काम दोन वर्षांत पूर्ण करणार असल्याच्या आपल्या घोषणेचा त्यांनी पुनरूच्चार केला. राज्य सरकारच्या सर्व परवानग्या या प्रत्येक विभागाच्या सचिवांनी ८ दिवसात पूर्ण करायच्या आहेत. असे आदेश अजितदादा पवार यांनी दिले आहेत.

येत्या २१ जानेवारीला खासदार शरद पवार इंदू मिलला भेट देणार असल्याचंही अजितदादा पवार यांनी सांगितले.

पुतळ्याची उंची वाढल्यामुळे यासाठी लागणारे ब्राँझचे व लोखंडाचे प्रमाण वाढणार आहे. स्मारकामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय व प्रदर्शन भरविण्याची सोय असेल, ६८ टक्के जागेत खुली हरीत जागा असेल. तसेच या ठिकाणी ४०० लोकांची आसनक्षमता असलेले व्याख्यान वर्ग व कार्यशाळा घेण्याची सोय असलेले ध्यानगृह असेल. १००० लोकांची आसनक्षमता असलेले अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल, अशी माहितीही अजितदादा पवार यांनी दिली.

Updated : 15 Jan 2020 12:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top