अखेर ‘सारथी’ साठी सरकारचा मोठा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सारथी संस्थेबाबत गुरूवारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी स्थापन झालेली सारथी संस्था कदापि बंद होणार नाही, संस्थेची स्वायत्तता कायम राहील असं अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसंच या संस्थेला तातडीने ८ कोटींचा निधी देण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला. त्याचबरोबर सारथीकडून ‘व्हिजन २०२०-३०’ हा दहा वर्षाचा आराखडा तयार केला जाईल आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या आर्थिक, प्रशासकीय अडचणी दूर होण्यासाठी दोन्ही संस्था नियोजन विभागांतर्गत काम करतील असंही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान या बैठकीत छत्रपती संभाजी राजे हेसुद्धा उपस्थित होते. पण त्यांना तिसऱ्या रांगेतले स्थान दिले गेल्याने काहींनी आक्षेप घेतला. पण बैठक संपल्यानंतर संभाजीराजे यांनी सरकारने सारथीबाबत निर्णय घेतल्याचे स्वागत केले आणि मानापमानापेक्षा समाजाचे हित महत्त्वाचे असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here