#कोरोनाशी लढा – राज्यातील खासगी रुग्णालयांबाबत अखेर सरकारचा मोठा निर्णय

Courtesy: Social Media

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील सर्व खासगी आणि धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण बेडच्या ८० टक्के बेड कोरोना आणि इतर रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय सर्व खासगी रुग्णांलयांवर बंधनकारक असणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मेस्मा, आपत्कालीन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा, बॉम्बे चॅरीटेबल ट्रस्ट आणि बॉम्बे नर्सींग होम कायद्यांमधील तरतुदींनुसार बंधनकारक असेल, अशी माहितीआरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

त्याचबरोबर खासगी रूग्णालये ताब्यात घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. कोरोनाच्या रुग्णांवरील उपचारासाठीचे जे दर सरकारने निश्चित केले आहेत त्यानुसारच खासगी रूग्णालयांना आकारणी करणे बंधनकारक असेल. यानुसार दर आकारणी न केल्यास कारवाईचा इशारा आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.

दरम्यान कोरोनाच्या रुग्णांसाठी दर आकारणीचे तीन स्तर ठरवण्यात आले आहेत. दर दिवसाला जास्तीत जास्त 4 हजार , साडे सात हजार आणि 9 हजार रुपये अशा पद्धतीने दर आकारणी करता येईल. हे आदेश राज्यात ३१ ऑगस्टपर्यत लागू राहणार आहेत.

रुग्णालयांकडून मनमानी पद्धतीने होणाऱ्या दर आकारणी होत असल्यास त्याबाबत नागरिकांनी आपली तक्रार [email protected] या ईमेलवर पाठण्याचे आवाहन करण्यात आले आहे.