उत्तर प्रदेश मधील लोकांना घेण्यास योगींची टाळाटाळ: नवाब मलिक

महाराष्ट्र व मुंबईत असलेल्या उत्तरप्रदेशच्या कामगारांना परत घेण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ टाळाटाळ करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
महाराष्ट्रात व मुंबईत उत्तरप्रदेश मधील २५ – ३० लाख लोक आहेत. अन्य राज्याप्रमाणे युपी सरकारला आपले लोक परत नेण्यासाठी विनंती राज्यसरकारने केली आहे.

मात्र, योगी सरकार अटी व शर्ती ठेवून कोरोना पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टेस्ट करुन पाठवा. असे सांगत आहेत. ३० लाख लोकांच्या टेस्ट करायला वर्ष दीड वर्ष लागू शकते. योगी जी इथल्या लोकांना घ्यायला तयार नसल्याने ते अडचण निर्माण करत आहे. अन्य राज्ये आपल्या लोकांना घ्यायला तयार झाले त्या पध्दतीने युपी सरकारनेही परवानगी द्यावी. अशी विनंती पुन्हा एकदा सरकारच्यावतीने करण्यात आल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

अन्य राज्यातील प्रवासी व मजूर आहेत. त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची तयारी राज्यसरकारने केली आहे. आज यासंदर्भात पोलीस, मनपाचे आयुक्त, रेल्वे विभागाचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते. बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश येथील लोकांना पाठवण्याची तयारी झाली असून लवकरच ट्रेनही सोडल्या जातील. असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.