गोपीनाथगडावरून आज माधवचं चक्र उलटं फिरेल ?

1892
Courtesy- Social Media
काॅंग्रेसमधील मराठा वर्चस्वाच्या राजकारणाला काटशह देण्यासाठी सुमारे ४० वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या राजकारणात माधव ही राजकीय संकल्पना अस्तित्वात आली. जिच्यात माळी, धनगर आणि वंजारी समाजाची राजकीय मोट बांधण्यात आली. भाजपमधील ना स फरांदे, आण्णा डांगे, गोपीनाथ मुंडे यांचं नेतृत्व हा माधवचाच परिपाक आहे. ओबीसी राजकारणाचा दोर धरूनच महाराष्ट्रात वाढलेल्या भाजपाने अलिकडील काळात ओबीसी नेतृत्वाचेच दोर कापायला घेतल्यावर आता पुन्हा एकदा भाजपांतर्गत माधवचा प्रयोग सुरू आहे. एकतर हा प्रयोग भाजपातील वर्चस्वावर तडजोड करेल किंवा सरळ बंड करेल. गेल्या काही दिवसांतील भाजपांतर्गत राजकीय हालचाली पाहता बंडाची शक्यता अधिक आहे, म्हणूनच आज गोपीनाथगडाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.
गोपीनाथ गडावर भाजपाचे दिवंगत नेते व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेंची जयंती साजरी होणार आहे. पंकजा मुंडेंनी या दिवसाला स्वाभिमान दिन म्हटलं आहे, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांतच पंकजा मुंडेंनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून भाजपाचा उल्लेख काढून टाकला आणि एका भावनिक आवाहनाद्वारे १२ डिसेंबरला पुढचं पाऊल ठरवू, असं घोषित केलं. तेव्हापासून राजकीय वर्तुळात उलटसुलट आडाखे सुरू आहेत. पंकजा मुंडे शिवसेनेत जातील, अशी अटकळ आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज आवर्जून गोपीनाथगडावर येताहेत. त्यामुळे या चर्चेला जोर आहे.
देवेंद्र फडणवीसांमुळे भाजपात राजकीय कोंडी होतेय आणि धनंजय मुंडेंमुळे राष्ट्रवादीचा मार्ग सोयिस्कर नाही. अशावेळी पंकजा मुंडेंकडे शिवसेनेचा पर्याय आहे. तो त्यांनी त्यांच्या समर्थकांकडे चाचपूनही पाहिला आहे. “ताईसाहेब म्हणणार, तेच होणार” अशी कार्यकर्त्यांचीही मानसिकता असल्याने पंकजांना कोणताही निर्णय घेण्यात फारशी अडचण नाही. आपल्या कार्यकर्त्यांना उद्देश्यून पंकजा यांनी वापरलेला “मावळे” हा शब्दही पुरेसा बोलका आहे.
विधानसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंनी भाजपात केवळ विधानपरिषद सदस्यत्व नव्हे, तर परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी दबाव निर्माण केला होता, असं सूत्रं सांगतात. पण पंकजा मुंडेंच्या पराभवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही हात असल्याची चर्चा असल्याने व सद्या पक्षात त्यांचं वजन असल्याने पंकजांना पक्षातून दिलासा मिळालेला दिसत नाही. २०१४ च्या तुलनेत आताच्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात भाजपाला मोठा फटका पडलाय.
मागच्या निवडणुकीत जिल्ह्यातील बीड वगळता उर्वरित पाचही मतदारसंघ भाजपाकडे होते. यंदा गेवराई आणि केज वगळता इतर चारही राष्ट्रवादीकडे आहेत. मुंडेंचा जिल्ह्यातील प्रभाव संपल्याचंच हा निकाल दर्शवतो. त्यामुळे भाजपाने पंकजा यांची समजूत काढण्याची फक्त औपचारिकता केली असून, एकप्रकारे त्यांना मोकळं सोडलं आहे, जेणेकरून मुंडे परिवाराच्या बाहेर नवं नेतृत्व उभं करता यावं. याचा फायदा घेऊन मुंडे परिवाराशी असलेल्या स्नेहसंबंधांच्या जोरावर शिवसेना बीडमध्ये उभी राहू पाहतेय.
पंकजा मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनाची संधी त्यातूनच निर्माण झालीय. जोडीला एकनाथ खडसे, महादेव जानकर आहेत. त्याशिवाय भाजपातील अन्य ओबीसी नेत्यांच्याही कुरबुरी सुरू आहेत. ओबीसींच्या ज्या जातीय राजकारणाने भाजपाला महाराष्ट्रात उभारी दिली, तेच मोदी-शहा-फडणवीसांसाठी डोकेदुखी ठरलं आहे. माधवचं चक्र जर उलटं फिरलं तर भाजपाचीही महाराष्ट्रातून उलटी गिनती सुरू व्हायला वेळ लागणार नाही. महाराष्ट्र म्हणूनच आज गोपीनाथगडाकडे डोळे लावून आहे.‌