#कोरोनाशी_लढा – लोकल वाहतूक आजपासून सुरू

local trains to start from today only for persons in essential services

देशाच्या आर्थिक राजधानीची जीवनवाहिनी म्हणजे लोकल ट्रेन…. कोरोनाच्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी गेल्या अडीच महिन्यांपासून लोकल सेवा ठप्प आहे. पण आता अत्यावश्यक सेवांमधील लोकांच्या सोयीसाठी पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर काही प्रमाणात लोकल वाहतूक आजपासून सुरू झाली आहे.

सर्वसामान्य प्रवाशांना मात्र या लोकलने प्रवास करता येणार नाहीये. राज्य सरकारने अत्यावश्यक सेवांच्या यादीत समाविष्ट केलेल्या लोकांना या लोकल मधून प्रवास करता येणार आहे. अत्यावश्यक सेवेसाठी सरकारी ओळखपत्र असलेल्यांनाच रेल्वे स्टेशनवर प्रवेश दिला जाणार आहे, त्यासाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर इतरांनी स्टेशनवर गर्दी करु नये असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.

प्रवासासाठी नियम

सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे यासाठी लोकलच्या क्षमतेपेक्षा निम्मे म्हणजे फक्त ७०० लोकांना एका लोकलने प्रवास करता येणार आहे. सरकारी ओळखपत्र दाखवल्यानंतर तिकीट दिले जाणार आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात ज्यांच्या पासची मुदत संपली आहे, त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णयही रेल्वेने घेतला आहे.

दररोज किती लोकल फेऱ्या ?

पश्चिम रेल्वेतर्फे चर्चगेट ते विरार ७८ लोकल फेऱ्या धावतील. तर विरार डहाणू दरम्यान ८ लोकल फेऱ्या चालवल्या जातील. मध्य रेल्वे मार्गावर २०० लोकलफेऱ्या सुरू होणार आहेत. यात सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, कसारा, ठाणे अप आणि डाऊन मार्गावर १३० तर सीएसएमटी ते पनवेल मार्गावर ७० लोकल चालवल्या जाणार आहेत.

लोकलची वेळ

दररोज सकाळी ५.३० ते रात्री ११.३० या वेळेत लोकल चालवल्या जाणार आहेत. दर पंधरा मिनिटांनी एक लोकल सोडली जाणार आहे. दोन्ही मार्गांवर मिळून सुमारे १ लाख २५ हजार प्रवासी प्रवास करणार आहेत.