Home > News Update > कोरेगाव भीमा हे फडणवीस सरकारने घडविलेले षडयंत्र, शरद पवारांचा गंभीर आरोप

कोरेगाव भीमा हे फडणवीस सरकारने घडविलेले षडयंत्र, शरद पवारांचा गंभीर आरोप

कोरेगाव भीमा हे फडणवीस सरकारने घडविलेले षडयंत्र, शरद पवारांचा गंभीर आरोप
X

कोरेगाव भीमा (koregaon bhima) दंगलीमागे माजी मुख्यमंत्री आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचं षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. या संदर्भात शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक दोन पानी पत्र लिहिलं असून या पत्रात या प्रकरणाची कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटीद्वारे चौकशी करावी अशी मागणी केली आहे. या संदर्भात दैनिक लोकमत ने वृत्त दिलं आहे.

काय म्हटलंय पत्रात?

पवारांनी पत्राची सुरुवात १ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगांव येथे २०० वा विजयी दिवस साजरा करण्यासाठी जमलेल्या लाखो दलित बांधावांचा उल्लेख केला आहे. मात्र, काही समाजविघातक घटकांकडून मेळावा उधळण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचे पर्यवसन दंगलीत झाले. मात्र, पोलिसांनी दंगलीस आदल्या दिवशी पुण्याच्या शनिवारवाडा परिसरात झालेल्या एल्गार परिषदेतील चिथावणीखोर वक्तव्यं कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढला. तसेच दंगल घडविण्यात माओवादी संघटनेचा हात असल्याच्या संशयावरून अटकसत्र सुरू केले. माओवाद्यांशी संबंध असल्याचे दाखवून, व्यवस्थेविरूद्ध संघर्ष करणाऱ्या बुद्धीजीवी, प्रतिष्ठित व निरपराध व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले. असं पवारांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

हे ही वाचा..

दंगलीच्या आधी, ३१ डिसेंबर २०१७ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा संस्थेने एल्गार परिषद आयोजित केली होती. परिषदेत पुरोगामी विचाराच्या लोकशाहीवादी, समतावादी वर्णव्यवस्थेविरूद्ध उभ्या ठाकणाऱ्या संघटना व व्यक्ती सहभागी होत्या. असं म्हणत पवार यांनी फडणवीस सरकारने लोकशाहीवादी, समतावादी वर्णव्यवस्थेविरूद्ध काम करणाऱ्या विचारवंताविरोधात कारवाई केली. असं म्हटलं आहे.

पोलिसांच्या मदतीने घडवलेले षड्यंत्र...

परिषदेची संकल्पना माजी न्या. पी. बी. सावंत व माजी न्या. बी. जी. कोळसे-पाटील यांची होती. प्रकृतीच्या कारणामुळे न्यायमूर्ती सावंत हजर राहू शकले नाही, तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडविलेले हे षड्यंत्र होते. तत्कालीन सरकारचे धोरण पुरोगामी, लोकशाही आवाज दडपून टाकण्याचे, सनदशीर संघर्ष चिरडण्याचे व संविधान वाचविण्याच्या चळवळीला खीळ घालण्याचे होते. असा गंभीर आरोप शरद पवार यांनी या पत्रात केला आहे.

या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी व्हावी...

तत्कालिन राज्य सरकारने सत्तेचा बेसुमार गैरवापर केला. प्रसार माध्यमांमध्ये गैरप्रचार करून जनतेत संभ्रम आणि संशयाचे धुके निर्माण केले. पोलीस तपासाची भिस्त इलेक्ट्रॉनिक पुराव्यांवर आधारित होती. पोलिसांनी संगणकीय उपकरणांत छेडछाड करणे, पुरावे नष्ट करणे, खोटे पुरावे तयार करणे अशा बेकायदेशीर गोष्टी केल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी आवश्यक आहे.

केसेस मधील सर्व सामाजिक, आर्थिक, मानवधिकार कार्यकर्त्यांचा उल्लेख...

डॉ. आनंद तेलतुंबडे हे जागतिक दर्जाचे व्यवस्थापन तज्ञ व लेखक आहेत. तर पी.वरवरा हे क्रांतीकारी कवी, साहित्यिक, समीक्षक आहेत, सुधीर ढवळे यांनी जर्मन कवीची क्रांतीकारी कविता वाचली तर सुरेंद्र गडलिंग हे ख्यातनाम वकील, शोमा सेन इंग्रजी प्राध्यापिका, रोमा विल्सन उच्च शिक्षीत दलित तरुण, सुधा भारद्वाज आदिवासी कामगार, अरुण फरेरा प्रसिध्द लेखक तर बर्मन गोन्साल्वीस अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत असे सांगत या सगळ्यांचा उल्लेख केला आहे. डॉ. तेलतुंबडे हे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातजावई तर आयआयटीमध्ये अध्यापन केलेले गौतम नवलखा मानवधिकार कार्यकर्ते आहेत. असेही पवार यांनी म्हटले आहे. यातील अनेकांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारलेला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे व गंभीर वळण लागण्याची शक्यता आहे.

लेखनाचा साहित्यिक अर्थाने बोध घेतला पाहिजे, ढसाळांच्या कवितांचा पत्रात उल्लेख

गोलपिठा कविता संग्रहात नामदेव ढसाळ यांनी संघर्षाचा चूड हाती घेताना, ‘‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, आता या शहरा शहराला आग लावत चला’’ अशा ओळी लिहील्या. अशा लेखनाचा साहित्यिक अर्थाने बोध घेतला पाहिजे. मात्र, पोलिस यंत्रणेने अशा प्रकारच्या वक्तव्यांचा देशद्रोही व समाज विघातक कृतीसाठी होत असल्याचा निष्कर्ष काढल्याचे पवार म्हणतात. त्याचवेळी त्यांनी अटक झालेले सुधीर ढवळे यांनी जेथे अन्यायाविरुध्द कोणी काही बोलत नाही, अशा शहराचा काय फायदा? अशी उद्वीग्नता व्यक्त करणारी एक जर्मन कवीची अनुनादित कविता वाचली, त्या ओळीही पवार यांनी पत्रात लिहील्या आहेत. त्या अशा -

‘जब जुल्म हो, तो बगावत होनी चाहिये शहर में,

और अगर बगावत ना हो,

तो बेहतर है की, रात ढलने से पहले,

ये शहर जलकर राख हो जाये..’

Updated : 24 Jan 2020 8:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top