Home > News Update > कोकणातल्या चिपी विमानतळाचं भवितव्य अधांतरीच !!!

कोकणातल्या चिपी विमानतळाचं भवितव्य अधांतरीच !!!

कोकणातल्या चिपी विमानतळाचं भवितव्य अधांतरीच !!!
X

सिंधुदुर्गातील परूळे चिपी विमानतळ आधी गेल्या वर्षी मार्चमध्ये लोकांसाठी खुला व्हायचा होता. पुढे विमानतळाचं उद्घाटन आॅक्टोबरपर्यंत पुढे गेलं. केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय म्हणतंय, एप्रिलपर्यंत चिपी धावपट्टीवरून विमानं उडू लागतील, पण काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठकीनंतर १ मे रोजी महाराष्ट्र दिनी कोकणवासीयांच्या विमान प्रवासाला सुरूवात होईल, याचं सूतोवाच केलं आहे. प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर कोकण, गोवा, उत्तर कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातला हवाई दुवा म्हणून काम करू लागणारं चिपी विमानतळ महाराष्ट्रातील १४ वं विमानतळ असणार आहे.

विमानतळ कोकणवासियांच्या प्राधान्यावर नाही !

पण मूळात विमानतळाचा विषय कोकणवासियांसाठी प्राधान्याचा आहे का की शेती, मासेमारी, पर्यटनासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांवर आधी लक्ष द्यायला हवं, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विमानतळाच्या उभारणीत कोकणातला माणूस डोळ्यासमोर नसून उलट कोकणावर बाहेरून होणाऱ्या आक्रमणाचा वेग विमानतळामुळे वाढणार असल्याचा आरोप श्रमिक सहयोग संघटनेचे संस्थापक सदस्य राजन इंदुलकर यांनी केलाय. ‌

विमानतळ नेमकं कोणासाठी ?

आगमन आणि प्रस्थान करणाऱ्या २०० प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असलेलं, २५०० मीटर लांब धावपट्टी असलेलं आणि ५२० कोटी रूपये खर्चून उभारलेलं चिपी विमानतळ सिधुदुर्गात परूळे चिपी इथं आहे. गोव्यातील दाबोलिम विमानतळापासून रस्तेमार्गाने काही तासांचं अंतर असलेलं ते एक पर्यायी विमानतळ असणार आहे. त्यामुळे चिपी विमानतळ कोकणवासियांसाठी की गोव्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी असाही प्रश्न विचारला जात आहे.

तांत्रिक बाबींच्या पूर्ततेचा अभाव

सप्टेंबर, २०१८ मध्ये १० आसनी फाल्कन२००० विमानाच्या उड्डाणाची यशस्वी या विमानतळावरून झालेली आहे. कोकणातील नेते दीपक केसरकर यांनी तर लोकसभा निवडणुकीपूर्वीच ५ मार्चला विमानतळ कार्यान्वीत होईल, अशी घोषणाही केली होती. दोनवेळा विमानतळाचं उद्घाटन झालंय, पण फक्त नेत्यांचीच विमानं उडताहेत. तांत्रिक बाबींच्या पूर्ततेच्या अभावी विमानतळाचं संपूर्ण कार्यान्वयन अजून प्रश्नचिन्हांकीत आहे.

खाजगी कंपन्यांचा प्रतिसाद नाही

चिपी आणि रत्नागिरी हे दोन्ही विमानतळं नीम दुर्गम श्रेणीतील आहेत. त्यामुळेच या विमानतळांवरून सेवा देण्यासाठी कंपन्या फार उत्सुक दिसत नाहीत. या विमानतळांवरून प्रवासी मिळतील की नाही, याची कंपन्यांना धास्ती वाटत आहे. त्यामुळेच अद्याप कंपन्यांची घोषणा होऊ शकलेली नाही', असं सांगण्यात येत आहे.

जमीनीवरच्या सोयीसुविधांचं काय?

पर्यटन विमानातून जलदगतीने येतील जातील, पण इथे उतरल्यावर जमीनीवरच्या सोयीसुविधांचं काय? दळणवळणाचं, परिवहनचं काय? पर्यटनाला दिशा काय? असा इंदुलकर यांचा सवाल आहे. जैतापूरसारखे प्रकल्प आणि इतर आर्थिक हितसंबंध डोळ्यासमोर ठेवून विमानतळाचा विषय राजकारण्यांकडून रेटला जात आहे, असा इंदुलकरांचा आरोप आहे.

‌दरम्यान, काल दुपारी ट्वीट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठकीची माहिती दिलीय. "मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधूदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ हवाई वाहतूक सुरू करण्याबाबत विमानतळ येथे आढावा बैठक सुरू आहे. विमानतळास सर्व पायाभूत सुविधा युद्धपातळीवर उपलब्ध करून देउन १ मे पर्यंत विमानतळ सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश" अशा आशयाचं ते ट्वीट होतं.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1229701771058204673?s=19

कोकण आणि अडथळ्यांचं घट्ट नातं

अर्थात, विमानतळ ज्या कारणांमुळे रखडलंय, त्या कारणांची पूर्तता बरीचशी केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. सद्यस्थितीत राज्य आणि केंद्र सरकारात सुरू असलेला संघर्ष पाहता, महाराष्ट्र दिनी तरी कोकणातून विमानं उडू लागतील का, हे सद्यातरी केंद्राच्याच भुमिकेवर अवलंबून आहे. कोकण रेल्वे साकारण्यात डोंगरातून बोगदे काढण्याचं आव्हान होतं. आता डोंगराच्या वरून उड्डाणं करायचीत, तरी अडथळे आहेतच. एकंदरीत, कोकणविकास आणि अडथळे यांचं एक घट्ट नातं होऊन बसलंय.

आमदार वैभव नाईक सकारात्मक

यासंदर्भात आमदार नितेश राणेंशी अनेकदा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही, पण आमदार वैभव नाईक यांनी मॅक्समहाराष्ट्र ला सांगितलं की वीजपुरवठा, पाणीपुरवठा, रस्ता रूंदीकरण, सुरक्षा यंत्रणा इत्यादीज्ञआवश्यक संरचनेच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना आदेश दिलेले असून एकंदरीत प्रतिसाद पाहता ठरल्याप्रमाणे महाराष्ट्र दिनी प्रवासी वाहतुकीला सुरूवात होईल.

Updated : 19 Feb 2020 6:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top