सरकारच्या अमानुष दडपशाहीचा कोल्हापुरात निषेध

283

जामीया मिलिया आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठात शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष दडपशाहीचा कोल्हापुरात निषेध करण्यात आला. “सरकारच्या चुकीच्या निर्णयाला विरोध करणे हा लोकशाहीतील नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. शांततेने व लोकशाही मार्गाने हा अधिकार बजावणे हा मोदी सरकारला गुन्हा वाटतो” असं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं.

विद्यार्थ्यांचे शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी विद्यापीठ कुलगुरुंची परवानगी न घेता विद्यापीठात प्रवेश केला व विद्यार्थ्यांवर जोरदार लाठीचार्ज केला. तसचं अश्रुधुराचा वापर देखील करण्यात आला. पोलिसांच्या लाठीमारात अलिगड विद्यापीठातील सुमारे ५० विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना इस्पितळात हलवण्यात आले आहे.

दिल्ली परिवहन मंडळाच्या चार बसेस काही समाजकंटकांनी पेटवल्या. त्या घटनेनंतर दिल्ली पोलिस जामिया विद्यापीठात घुसले व त्यांनी विद्यार्थ्यांना जोरदार मारहाण केली. काही विद्यार्थ्यांच्या पायावर गोळ्याही लागल्या आहेत. विद्यार्थी सविधान विरोधी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात अत्यंत शांततेच्या व अहिंसक मार्गानं आंदोलन करत होते. “सविधानाची शपथ घेणाऱ्या सरकारनेच पोलीस यंत्रणेचा वापर करून विद्यार्थ्यांच्या विरोध दर्शवण्याच्या मूलभूत हक्कावर दडपशाही केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.”

या घटनेचा निषेध सर्व परिवर्तनवादी संघटना तर्फे येत असून. यात ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, आंबेडकरवादी विद्यार्थी, संविधान सन्मान युवा प्रतिष्ठाण, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया, जमात ए इस्लामी हिंद कोल्हापूर आदी संघटना यात सहभागी होत्या.