Home > News Update > इराण- अमेरिका संघर्ष, कुणाचा तोटा, कुणाचा फायदा?

इराण- अमेरिका संघर्ष, कुणाचा तोटा, कुणाचा फायदा?

इराण- अमेरिका संघर्ष, कुणाचा तोटा, कुणाचा फायदा?
X

इराणचे लष्करी अधिकारी मेजर जनरल कासीम सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराण-अमेरिकेमधील संघर्ष चिघळला. सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी इराणने इराकमधील दोन अमेरिकनं लष्करी हवाई तळाला लक्ष्य केलं. १९७९ नंतर हा हल्ला चढवून अमेरिकेला थेट आव्हान दिलंय. मात्र अमेरिकेनं समजूतपणा दाखवत इराणच्या हल्याला प्रत्युत्तर देण्याचं टाळलं. अमेरिकेच्या या कृतीमुळे मध्य-पुर्व आशियातील इराण-अमेरिकेतील थेट संघर्ष तुर्तास टळला आहे. मात्र या संबध घटनाक्रमात कुणाचा फायदा झाला तर कुणाचा तोटा, हे समजून घेवूयात.

१. डोनाल्ड ट्रम्प

युक्रेनमध्ये हस्तक्षेप केल्याप्रकरणी अमेरिकनं काँग्रेसने ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव पारीत केला. तो सिनेमटध्ये दाखल होणार आहे. नेमकी ही वेळ साधून डोनाल्ड ट्रम्प यांनी सुलेमानींच्या हत्येचे आदेश दिले. मात्र सुलेमानी यांची हत्या का केली? याचं स्पष्टीकरण अजूनही ट्रम्प यांना देता आलेलं नाही. सुलेमानीसंदर्भातील हा प्रस्ताव यापुर्वीही माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि जॉर्ज बुश यांच्यापुढं ठेवण्यात आला होता. मात्र त्याचे परिणाम लक्षात घेवून, या दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी तो निर्णय टाळला होता.

इराणच्या क्षेपणास्त्र हल्यानंतर अमेरिकेनं माघार घेण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या दोन देशामधील संघर्षाला विराम मिळालाय. याचं श्रेय ट्रम्प यांना घेता येईल. सुलेमानीसारख्या इराणच्या सर्वोच्च अधिकाऱ्याला ठार केल्यामुळे ट्रम्प यांनी आपण इराणसंदर्भात टफ निर्णय घ्यायला तयार असल्याचा संदेश दिलाय.

मात्र दूसरिकडे इराकमधील अमेरिकनं तळावर किंवा दूतावासावर दहशतवादी हल्ले झाल्यास, सुलेमानी यांना ठार करुन काय मिळवलं, याच उत्तर ट्रम्प यांना द्याव लागणार आहे.

इराणला अण्वस्त्र कार्यक्रमपासून रोखण्यासाठी अमेरिकेनं आतापर्यंत एवढा आटापीटा केला. मात्र सुलेमानींच्या हत्येनंतर इऱाणने अण्वस्त्र करार गुंडाळून टाकला. त्यामुळे इराणला अण्वस्त्र निर्मीतीपासून रोखायचं कस हा नवा प्रश्न ट्रम्प यांच्यापुढं निर्माण झालाय. त्यामुळे ट्रम्प ही परिस्थिती कशी हाताळतील त्यावर त्यांची राजकीय वाटचाल अवलंबून राहणार आहे.

२. अयातुल्ला खोमेनी

सुलेमानी यांच्या हत्येपुर्वी इराणमध्ये खोमेनीविरोधात मोठं जनआंदोलन पेटलं होत. ‘डेथ टू अमेरिका’ हे नारे इराणने नेहमी अनूभवले आहेत. मात्र १९७९ नंतर पहिल्यांदा इराणमध्ये ‘डेथ टू खोमेनी’ अशे नारे लावले गेले. आर्थिक निर्बंधामुळं इराणची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. सर्वसामान्य इराणी नागरिकांचं जगण मुश्कील झालंय. सुलेमानी यांच्या हत्येचा निर्णय घेवून डोनाल्ड ट्रम्प खोमेनी यांच्या मदतीला धावूव आल्यासारखी परिस्थिती आहे.

सुलेमानी यांच्या हत्येमुळे दुभंगलेला इराण सुलेमानींच्या हत्येनंतर एक झालाय. अंतर्गत मतभेद विसरुन सर्व इराण, खोमेनी यांच्या पाठीशी ठामपणे उभा ठाकलाय. त्यामुळे खोमेनी यांची सत्तेवरची सैल झालेली पकड अधिक मजबूत झालीये.

दूसरिकडे अमेरिकनं लष्करी तळावर हल्लाच्या निमीत्तानं इराणला आपली लष्करी ताकत जगाला दाखवण्याची संधी मिळाली. थेट अमेरिकेला आव्हान देण्याची ताकद दाखवल्यामुळे मध्यपूर्वे आशियातील इराणचा दबदबा, प्रभाव अधिक वाढलाय.

सुलेमानींच्या हत्येचं कारण दाखवून अण्वस्त्र करारातून मुक्त होण्याची नामी संधी इराणला मिळाली. भविष्यामध्ये अण्वस्त्र कार्यक्रमावरुन इराण-अमेरिकेत पुन्हा एकदा डिल होवू शकते.

३. कासीम सुलेमानी

इराणमध्ये आतापर्यत सर्वात मोठी अंत्ययात्रा अयातुल्ला खोमेनी यांची निघाली होती. मात्र सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेनं आतापर्यंतच्या सर्व गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

सुलेमानी यांनी ३० वर्षे कूड्स फोर्सचं नेतृत्व केलं. परदेशातल्या इराणच्या सर्व छुप्या लष्करी कारवाया, सुलेमानी यांच्या निर्देशानूसार होत होत्या. आखाती देशामधील या कारवायामुळेचं खरतर इराणला आर्थिक निर्बधं झेलावे लागताहेत. त्यामुळे सुलेमानी यांच्याबद्दलही सर्वसामान्य इराणी नागरिकांमध्ये चांगल मत नव्हत.

सुलेमानी यांच्या जिंवत राहण्याने इराणला जे साध्य करता आलं नाही ते त्यांच्या मरण्यामुळं इराणला साध्य करता आलंय असं म्हणता येईल. त्यामुळे सुलेमानी हे इराणसाठी सर्वोच्च शहिद ठरलेत.

४. इराक

अमेरिका-इराण संघर्षात इराकचं सर्वात जास्त नूकसान झालंय. सुलेमानी यांची हत्येनंतर आणि त्यापाठोपाठ इराणच्या मिसाईल हल्यामुळे इराकच्या सार्मभौमत्वाचा प्रश्न निर्माण झाला. खरतर अमेरिकेमुळे इराकमध्ये सद्दाम हुसेन यांची जुलमी राजवट जावून, पहिल्यांदा शियाबहुल सरकार सत्तेवर आलं. त्यामुळे इराणलाही इराकमध्ये हात पाय पसरता आलेत.

अमेरिकनं लष्करामुळे इराकमधून इसिसला हाकलून लावता आलंय. इसिसच्या पराभवात इराणने महत्वाची भूमिका बजावली. मात्र इसिसचा पाडाव झाल्यानंतर इराकमध्ये दबदबा राखण्यासाठी इराण आणि अमेरिकेमध्ये संघर्ष सुरु झाला.

इराणच्या दबावामुळे इराकी संसदेनं अमेरिकेने इराक सोडून जावं, असा प्रस्ताव मंजूर केला. मात्र या प्रस्तावाला सुन्नी, कुर्द आणि काही शिया नेत्यांचा जोरदार विरोध आहे. सध्याच्या परिस्थितीतं इराकला अमेरिकेची सर्वात जास्त गरज आहे. इराणचा प्रभावही इराकी नागरिकांना नकोसा झालाय, मात्र इराणला आटोक्यात ठेवण्यासाठी अमेरिकनं फौजा महत्वाच्या आहेत. सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराकला दोन्ही देशांना सांभाळून घेण्याची कसरत करावी लागणार आहे.

५. आयसिस

इराण-अमेरिकनं संघर्षाचा इसिसला फायदा होणार आहे. इराण- अमेरिकेतल्या लष्करी समन्वयामुळे आयसिसचा पराभव झाला. मात्र सुलेमानी यांच्या हत्येनंतर अमेरिकेनं इसिसविरोधातली लष्करी मोहीम थांबवली आहे. इराकमधील लष्करी हालचाली सौम्य झाल्या आहेत. इराकमधून बाहेर पडण्याचा विचारही अमेरिका करत आहे. सुलेमानी यांच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी इराकमधील शिया दहशतवादी संघटना भविष्यात अमेरिकनं जवानांना, दूतावासाला टार्गेट करु शकते. तस झाल्यास इराण-अमेरिकेतं पुन्हा संघर्ष उफाळेल. या दोन देशातल्या संघर्षामुळे आयसिस दहशतवादी संघटनेला नवं जिवदान मिळू शकते. त्याचे परिणाम संबध जगाला भोगावे लागतील.

६. इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम

सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराणने अण्वस्त्र करार गुंडाळला आहे. ओबामा सरकारने इराणसोबत अणू-करार केला होता. इराणला अण्वस्त्र तयार करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेनं हा करार केला होता. मात्र ट्रम्प यांनी हा करार मोडला. आणि इराणवर पुन्हा आर्थिक निर्बंध लादले. इराणने अण्वस्त्र कार्यक्रम पुन्हा सुरु केल्यास, इस्त्रायल,अमेरिका, सौदी अरेबीया या देशांना सर्वात मोठा धोका असणार आहे.

या परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांना इराणला रोखण्यासाठी पुन्हा एकदा डिल करावी लागणार आहे. या संघर्षानंतर दोन्ही देशात चर्चेचे दरवाजे खुले असणार आहे. पुन्हा अण्वस्त्र करार झाल्यास इराणला खनिज तेल विकता येईल आणि आर्थिक निर्बधांतून इराणची सुटका होणार आहे.

७. भारत

हा संघर्ष टळल्याने भारताने सुटकेचा निश्वास घेतला. इराण-अमेरिकेतील तणाव निवळल्याने भडकलेल्या तेलाच्या किंमती स्थिर होतील. आणि भारताचं आर्थिक नूकसान टळणार आहे. हा संघर्ष झाला असता तर कुणाची बाजू घ्यायची हा मोठा प्रश्न भारतापुढं निर्माण होणार होता. आखाती देशांमध्ये काम करणाऱ्या लक्षावधी भारतीयांचा सुरक्षेची चिंता सध्यातरी मिटली आहे.

-विनोद राऊत

Updated : 10 Jan 2020 12:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top