मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत घोटाळा? ‘ईडी’चे चौकशीचे आदेश

Courtesy : Social Media

राज्यात शिष्यवृत्ती घोटाळा? बोगस विद्यार्थ्यांची नोंदणी करून हजारो कोटी उचलले, ‘ईडी’ (ED) करणार चौकशी

समाजकल्याण विभागातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती वितरणात बेकायदेशीर व्यवहारप्रकरणी पुण्यासह राज्यातील सर्व शिक्षणसंस्थांच्या शिष्यवृत्ती वितरणाची चौकशी करण्याचे आदेश सक्तवसुली संचलनालयाने म्हणजेच ईडीने दिले आहेत. प्रिव्हेंशन ऑइ मनीलॉंड्रींग ऍक्ट, २००२ अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाशी यासंर्दभात पत्र व्यव्हार केला आहे.

शिक्षण संस्थांनी बोगस विद्यार्थ्यांची नोंद करुन २ हजार कोटींहून अधिक रकमेचा फेरफार केला असल्याचं निदर्शनास आलं आहे. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने जिल्हानिहाय शिष्यवृत्ती संदर्भात व्यवहारांचा अहवाल सादर करण्याची आदेश दिले आहेत. ही कारवाई राज्यातील सर्व शिक्षण संस्थांवर केली जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घोटाळे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे जिल्ह्यातील खाजगी तसेच शासकीय शैक्षणिक संस्था, विद्यापीठ आणि महाविद्यालयात २०१० ते २०१७ या काळात विद्यार्थ्यांना दिलेल्या विविध शिष्यवृत्त्यांमध्ये करोडो रुपयांचा अपहार झाला असल्याची शक्यता आहे. याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील एकूण १ हजार ६०९ महाविद्यालयांना १ ते १४ नोव्हेंबर दरम्यान शिष्यवृत्ती संदर्भात व्यवहारांचा अहवाल सादर करण्याची आदेश दिले आहेत.

“एक महिन्यापासून ईडीने माहिती मागवली आहे. एकूण ७ विभागांची ही माहिती असून मागवलेल्या माहितीचा तपशील देणे चालू आहे. घोटाळा किती कोटींचा झालाय त्याचा आकडा निश्चित सांगता येणार नाही. २०१० पासून शिष्यवृत्ती ऑनलाईन पद्धतीने दिले जाते, यामध्ये विद्यार्थ्यांचा पैसा विद्यार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये जमा होतो, तर कॉलेजचे पैसे कॉलेजच्या अकाउंटमध्ये जमा होतात. यामध्ये महाविद्यालयापासून ते पोस्ट ग्रज्युएटपर्यंतच्या संस्थांचा समावेश आहे. जी माहिती मागवण्यात येते आहे ती माहिती आम्ही देत आहोत” अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे सहसंचालक माधव वैद्य यांनी दिली आहे.