Home > News Update > 'भारतीय अर्थव्यवस्था आज संकटात'- यशवंत सिन्हा

'भारतीय अर्थव्यवस्था आज संकटात'- यशवंत सिन्हा

भारतीय अर्थव्यवस्था आज संकटात- यशवंत सिन्हा
X

भारतीय अर्थव्यवस्था आज संकटात आहे. कारण तिच्यावर मंदीचे सावट आहे. देशाच्या संपत्ती वृद्धीचा दर मोठ्या प्रमाणावर घसरून तो आज केवळ पाच टक्क्यावर येवून पोहचला आहे. या आर्थिक संकटाचे सखोल विश्लेषण भारताचे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी एका मुलाखतीमध्ये मुंबईत २२ सप्टेंबर रोजी मुंबईत केले. मुलाखत मिलिंद मुरुगकर आणि अजित जोशी यांनी घेतली आणि हा कार्यक्रम फ्रेंड्स ऑफ डेमॉक्रासी या संस्थेतर्फे आयोजित केला होता.

यशवंत सिंन्हानी आज भारतीय अर्थव्यवस्थेपुढे असलेल्या मोठ्या आर्थिक संकटाचे सविस्तर विश्लेषण केले. यात त्यांनी भारताच्या विविध क्षेत्रातील उत्पादनांच्या विक्रीमध्ये कशी मोठी घट झाली आहे याची आकडेवारीच सादर केली. त्यांच्या मते या सगळ्याचे मूळ भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पडझडीमध्ये आहे. शेतीक्षेत्राचा आर्थिक वृद्धीचा दर मोदी सरकारच्या काळात खूप घसरला आणि त्याला नोटाबंदीचा तडाखा बसला. त्यात पुन्हा चुकीच्या जीएसटीमुळे देशाच्या असंघटीत उद्योगक्षेत्रावरदेखील मोठे गंडांतर आले. या सर्वांचा परिणाम म्हणून देशातील बहुसंख्य श्रमिक आणि शेतकरी शेतमजुरांच्या मिळकतीत मोठी घट झाली. पण दुर्दैवाने सरकारने ही सर्व आकडेवारी प्रकाशीतच होवू दिली नाही.

https://youtu.be/NULbtQURH2I

असंघटीत क्षेत्रात झालेली ही पडझड आता संघटीत क्षेत्रात देखील शिरली आहे. आता जेंव्हा या क्षेत्रावर मंदीचे सावट पसरले तेंव्हा सरकारला आता याची दखल घ्यावीच लागली. सरकारकडे या संकटावर मात करण्यासाठी एकाच उपाय आहे तो म्हणजे देशातील सर्वसामान्य लोकांची क्रयशक्ती (विकत घेण्याची क्षमता) वाढवणे. पण दुर्दैवाने हे करण्यासाठी सरकारकडे पुरेशी साधनसामुग्रीच नाही आणि आवश्यक इच्छा शक्तीच नाही. सरकारने मोठ्या मोठ्या कंपन्यांना एक लाख पंचेचाळीस हजार कोटींची सवलत दिली आहे. पण आज गरज आहे ग्रामीण श्रमिक, शेतकरी आणि असंघटीत क्षेत्राला मदत करण्याची. दुर्दैवाने सरकारचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. यशवंत सिन्हांनी देशाची लोकशाही धोक्यात असल्याचे देखील सांगितले आणि आर्थिक प्रगतीसाठी देशाची लोकशाही वाचवण्याची आज कधी नव्हे एव्हढी गरज असल्याचे देखील सांगीतले.

Updated : 26 Sep 2019 5:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top